कर्नाटकमध्ये १० सहस्र ८८९ मशिदींना भोंगा लावण्याची अनुज्ञप्ती

केवळ ३ सहस्र मंदिरांवरच भोंगे लागणार !

बेंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटकातील भाजप सरकारने राज्यातील १० सहस्र ८८९ मशिदींना भोंगा लावण्यास पुन्हा अनुमती दिली आहे. राज्यातील पोलिसांकडे राज्यभरातील मंदिर, मशीद, चर्च आदींकडून १७ सहस्र ८५० अर्ज आले होते. त्यातील वरील १० सहस्र ८८९ मशिदी, ३ सहस्र मंदिरे आणि १ सहस्र ४०० चर्च यांना भोंगे लावण्यास अनुज्ञप्ती देण्यात आली आहे. ही अनुज्ञप्ती केवळ २ वर्षांसाठी देण्यात आली आहे.
या वर्षीच्या प्रारंभी हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून मशिदींवर पहाटे मोठ्या आवाजात भोंग्यांवरून अजान ऐकवण्यात येत असल्याच्या विरोधात आंदोलन करण्यात आले होते. मशिदींकडून नियमभंग करण्यात येत असल्याचे सांगत मशिदींवरील भोंगे काढण्याची मागणी करण्यात आली होती. तसेच हिंदूंच्या मंदिरांवर पहाटे ५ वाजल्यापासून भोंगे लावून मंत्रजप, आरती आदी लावण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानंतर राज्य सरकारने सर्व धार्मिक स्थळांना अनुज्ञप्ती घेण्याचा आदेश दिला होता. नंतर पोलिसांकडे यासाठी मोठ्या प्रमाणात अर्ज करण्यात आल्याने पोलिसांनी त्यांना अनुज्ञप्ती दिली आहे. सकाळी ६ ते रात्री १० या वेळेतच भोंगे लावण्याची अनुमती असणार आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आवाजाची मर्यादा ठेवावी लागणार आहे.

ध्वनीच्या पातळीची कार्यवाही व्हायला हवी ! – भाजप

भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस सी.टी. रवि म्हणाले की, आम्ही सांगितले आहे की, नियमाचे पालन केले पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाने भोंग्यांच्या वापराविषयी मार्गदर्शक तत्त्वे निश्‍चित केली आहेत. अनुज्ञप्ती दिली असली, तरी डेसिबल (ध्वनी मोजण्याचे एकक) पातळी किती आहे ? या गोष्टींची कार्यवाही व्हावी, अशी आमची इच्छा आहे.

संपादकीय भूमिका

  • देशात बहुसंख्य हिंदू आणि त्यांची धार्मिक स्थळेही अधिक असतांना अल्पसंख्यांक मुसलमानांच्या मशिदीच्या तुलनेत मंदिरांवरील भोंग्यांची संख्या अल्प कशी काय ? असा प्रश्‍न हिंदूंना पडतो !
  • ‘अनुज्ञप्ती मिळाल्यानंतर मशिदींकडून त्या संदर्भातील नियमांचे पालन होत आहे कि नाही ?’, याकडे पोलीस लक्ष ठेवणार आहेत का ? असा प्रश्‍न उपस्थित होतो ! जर लक्ष ठेवले नाही, तर हिंदूंच्या संघटनांना याकडे लक्ष देणे अपरिहार्य ठरील !