सर्वांत वजनदार रॉकेट ‘एल्.व्ही.एम्. ३’चे इस्त्रोने केले यशस्वी प्रक्षेपण !

बेंगळुरू – भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच ‘इस्रो’ने दिवाळीच्या मुहूर्तावर ऐतिहासिक कामगिरी केली आहे. २३ ऑक्टोबरच्या रात्री १२ वाजून ७ मिनिटांनी आंध्रप्रदेशातील श्रीहरिकोटामधून सर्वांत वजनदार रॉकेट असलेल्या ‘एल्.व्ही.एम्. ३’द्वारे त्याने पहिले व्यावसायिक प्रक्षेपण केले. याद्वारे ‘वन वेब’ या आस्थापनाचे ३६ उपग्रह अवकाशात सोडण्यात आले.

१. ‘वन वेब’ हे एक ब्रिटीश खासगी उपग्रह आस्थापन असून तिचे ३६ उपग्रह प्रक्षेपित करण्यात आले आहेत. या कामगिरीच्या माध्यमातून इस्रोने ‘जागतिक व्यावसायिक प्रक्षेपण सेवा’ देण्याच्या शर्यतीमध्ये प्रवेश केला आहे.

२. इस्रोचे अध्यक्ष एस्. सोमनाथ यांनी दिलेल्या माहितीनुसार ‘एल्.व्ही.एम्. ३’ हे रॉकेट ४३.५ मीटर लांब असून त्यात ८ सहस्र किलोपर्यंत उपग्रह वाहून नेण्याची क्षमता आहे. वर्ष २०२३ मध्येही ‘एल्.व्ही.एम्. ३’द्वारे ‘वन वेब’चे आणखी ३६ उपग्रह अवकाशात सोडले जाणार आहेत.

३. ब्रिटनसमवेत झालेल्या १०८ उपग्रहांच्या करारांतर्गत पहिल्या टप्प्यात ३६ उपग्रह प्रक्षेपित करण्यात आले.