वाराणसीमध्ये रुग्णालयात डॉक्टर आणि कर्मचारी यांना मारहाण : उपकरणांची तोडफोड

वाराणसी – येथील भिखारीपूर येथील ‘एपेक्स हॉस्पिटल’च्या अतीदक्षता विभागात घुसून एका रुग्णाच्या अनुमाने १७ ते १८ नातेवाइकांनी डॉक्टर आणि कर्मचारी यांना मारहाण केली. तसेच या आक्रमणकर्त्यांनी तेथील उपकरणांची तोडफोड केली. रुग्णालयाच्या वैद्यकीय सेवा संचालक अनुपमा सिंह यांनी या घटनेशी संबंधित ‘सीसीटीव्ही फुटेज’ चिताईपूर पोलीस ठाण्याच्या अधिकार्‍यांकडे सुपुर्द केली असून १७ आरोपींच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचे अन्वेषण करून योग्य ती कारवाई करण्याचे आश्‍वासन दिले आहे.

१. रुग्णालय संचालकांनी दिलेल्या माहितीनुसार ७ ऑक्टोबर या दिवशी प्रतापपट्टी (बारागाव) येथील रहिवासी सौरभचंद्र मिश्रा याला बेशुद्ध अवस्थेत रुग्णालयात भरती करण्यात आले होते.

२. १० ऑक्टोबरला रुग्णाला त्याच्या नातेवाइकांनी घरी नेले. त्याच दिवशी सायंकाळी नातेवाइकांनी त्याला पुन्हा रुग्णालयात आणले असता त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले.

३. नातेवाइकांच्या अनुमतीने रुग्णाला परत अती दक्षता विभागात भरती करून त्याच्यावर उपचार चालू करण्यात आले. रात्री उशिरा रुग्णाची प्रकृती खालावली. तो मृत झाला. या वेळी रुग्णाच्या १७ -१८ नातेवाइकांनी अतीदक्षता विभागात प्रवेश केला आणि डॉक्टर आणि कर्मचारी यांना मारहाण केली. यानंतर सर्वांनी बलपूर्वक रुग्णाचा मृतदेह कह्यात घेतला आणि तेथून निघून गेले. तेथील सुरक्षा रक्षकाला जिवे मारण्याची धमकी देण्यात आली.

संपादकीय भूमिका

सध्या रुग्णांच्या नातेवाईकांकडून डॉक्टरांवर आक्रमण होण्याचे प्रमाण वाढले आहे. हे रोखण्यासाठी ठोस पावले उचलणे आवश्यक !