गीता आणि श्रीकृष्ण यांचा अपमान करणारे देशाचे माजी गृहमंत्री शिवराज पाटील यांना अटक करा ! – डॉ. विजय जंगम (स्वामी), अखिल वीरशैव लिंगायत महासंघ

डावीकडून श्री. महादेव जंगम, डॉ. विजय जंगम (स्वामी) आणि श्री. बळवंत पाठक

मुंबई – दीर्घयुगे, दीर्घ कालखंड उलटून, तसेच दीर्घ युगांचे धक्के पचवूनही हिंदु धर्माची अस्मिता असलेल्या आणि आजही हिंदूंच्या मनामनात जिवंत असलेल्या ‘गीता’ या ग्रंथाविषयी वादग्रस्त वक्तव्य करतांना भारताचे माजी गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील (चाकूरकर) यांनी गीतेमधून जिहादची शिकवण दिली जात असल्याचा जावईशोध लावला आहे. त्यामुळे सर्वत्र संतापाची लाट निर्माण झाली असून त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर हिंदु धर्माचा वारसा सांगणार्‍या लिंगायत समाजात संभ्रमाचे वातावरण निर्माण करण्याचा सुलतानी प्रयत्न केला आहे. या प्रकरणी शिवराज पाटील यांच्यावर गुन्हा नोंद करून त्यांना तात्काळ अटक करावी, अशी मागणी अखिल वीरशैव लिंगायत महासंघाचे कार्याध्यक्ष डॉ. विजय जंगम (स्वामी) यांनी केली. ते मुंबई येथील मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. या वेळी महासंघाचे नवी मुंबई शहर संघटक श्री. महादेव जंगम यांच्यासह सर्वश्री प्रकाश जंगम, पद्माकर जंगम, सुभाष स्वामी आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. बळवंत पाठक उपस्थित होते.

शिवराज पाटील चाकूरकर हे जरी लिंगायत असतील, तरीही ज्या विचारांचा पगडा त्यांच्या मनामनात रुजलेला आहे, त्याचेच प्रतीक म्हणजे हे वक्तव्य असल्याचा आरोप डॉ. विजय जंगम (स्वामी) यांनी केला आहे.

शिवराज पाटील चाकूरकर हे लिंगायत समाजाचे जरी असले, तरीही आजपर्यंत समाजासाठी त्यांनी काय केले ? हिंदु धर्माविषयी आणि कोट्यवधींची अस्मिता असलेल्या गीतेविषयी अपशब्द वापरल्याने चाकूरकर हे हिंदु धर्मासाठी खलनायक ठरतात. याच अनुषंगाने ते लिंगायत समाजासाठीही खलनायक ठरत आहेत, या वृत्तीचा अखिल वीरशैव लिंगायत महासंघाच्या वतीने तीव्र निषेध करण्यात येत आहे, असे महासंघाच्या वतीने काढलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.


शिवराज पाटील यांचा डी.एन्.ए. मोगलांचाच निघेल ! – तुषार भोसले, प्रमुख, भाजप आध्यात्मिक आघाडी

श्रीकृष्णाने अर्जुनाला केलेल्या पवित्र उपदेशाला ‘जिहाद’ संबोधणार्‍या शिवराज पाटील यांचा ‘डी.एन्.ए.’ पडताळला गेला पाहिजे. तो १०० टक्के मोगलांचा निघेल. यासाठीच त्यांना काँग्रेसने देशाचे गृहमंत्री केले होते. हिंदुद्वेष्ट्यांना मोठ्या पदावर बसवायचे हाच काँग्रेसचा नियम आहे. यासाठी महाराष्ट्राच्या नावाला कलंक असलेल्या शिवराज पाटील यांच्या सर्व सुविधा सरकारने काढून घेतल्या पाहिजेत आणि त्यांना महाराष्ट्राच्या बाहेर हाकलले गेले पाहिजे.


शिवराज पाटील यांचे वक्तव्य हिंदु, हिंदुत्व आणि हिंदुस्थान यांचा अवमान करणारे ! – आचार्य पवन त्रिपाठी, उपाध्यक्ष, भाजप

माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांचे वक्तव्य म्हणजे हिंदु, हिंदुत्व आणि हिंदुस्थान यांचा अवमान करणारे आहे. ‘भगवद्गीता सांगत असतांना ‘श्रीकृष्ण अर्जुनाशी ‘जिहाद’विषयी बोलतात’, हे पाटील यांचे विधान काँग्रेसची संस्कृती दाखवणारे आहे. हे विधान काँग्रेसच्या हिंदुविरोधी विचारांनी प्रेरित आहे, जे त्यांच्या नेत्यांनी वेळोवेळी सांगितले आहेत, असे प्रतिपादन भाजपचे उपाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

या पत्रकात पवन त्रिपाठी यांनी म्हटले आहे की,

१. भगवान श्रीरामाच्या सैन्याने बांधलेला रामसेतू काल्पनिक असल्याचा दावा काँग्रेसनेच केला होता.

२. काँग्रेसनेच हिंदु आतंकवाद आणि भगवा आतंकवाद यांचा सिद्धांत मांडला आणि काँग्रेस नेते अन् माजी मंत्री सलमान खुर्शीद यांनी, तर हिंदुत्वाची तुलना ‘बोको हराम आणि इस्लामिक स्टेट’ या आतंकवादी संघटनांशी केली होती.

३. पाटील यांनी हे विधान करून काँग्रेसची हिंदुविरोधी मानसिकता आणि परंपरा पुन्हा एकदा दाखवून दिली आहे.

४. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास’विषयी सांगून देशाची एकात्मता आणि विकास यांचे काम करत आहेत, तर दुसरीकडे पाटील यांच्यासारखे काँग्रेसचे नेते फालतू विधाने करून त्यांचे संस्कार दाखवत आहेत.

५. पाटील यांचे वक्तव्य दुर्दैवी आणि अक्षम्य आहे. हा हिंदूंचा अवमान आहे. पाटील यांनी समस्त हिंदु समाजाची क्षमा मागावी. देश हिंदु, हिंदुत्व आणि हिंदुस्थान यांचा अवमान कदापि सहन करणार नाही.

संपादकीय भूमिका

भगवद्गीता आणि श्रीकृष्ण यांचा अवमान करून हिंदुविरोधी मानसिकता दर्शवणारे काँग्रेसी !