‘दिवाळी’ आणि ‘फटाके’ यांचा शास्त्रीय संबंध नाही, असे असूनही प्रत्येक वर्षी दिवाळीत फटाके वाजवले जातातच. फटाक्यांमुळे प्रदूषण होते; म्हणून त्यावर ‘हरित फटाक्यां’चा पर्याय उपलब्ध आहे, असे सांगितले जाते. त्याला भुलून कित्येक जण ते फटाके खरेदी करतात. त्याही पुढे जात ते फटाके फोडत ‘आम्ही यंदा प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी केली’, अशा बढाया मारतात.
‘ज्या फटाक्यांमुळे प्रदूषण अल्प होते, जे फटाके पर्यावरणपूरक आहेत, त्यांना ‘ग्रीन क्रॅकर्स’ किंवा ‘हरित फटाके’, असे म्हणतात. ते नेहमीच्या फटाक्यांप्रमाणे दिसतात. यामध्येही ‘फुलबाजी’, ‘फ्लॉवरपॉट’, ‘स्काय शॉट’, असे प्रकार मिळतात, तसेच ते काडेपेटीच्या साहाय्याने उडवले जातात. याखेरीज यांत सुगंध असणारे आणि ‘वॉटर’ फटाके असतात. हे फटाके उडवण्याची पद्धत वेगळी असते. ‘नेहमी फोडण्यात येणार्या फटाक्यांपेक्षा या फटाक्यांतून सरासरी ३० ते ४० टक्के न्यून प्रदूषण होऊ शकते’, असा दावा केला जातो. यांत प्रदूषण वाढवणारी हानिकारक रसायने नसतात. एकंदरीत या सूत्रावरून लक्षात येते की, हरित फटाकेही १०० टक्के प्रदूषणमुक्त नाहीत. असे असूनही फटाके फोडण्याचा हट्ट करणे म्हणजे स्वतःसह इतरांचेही आरोग्य धोक्यात घालणे होय. फटाके ‘दिवाळी’ असो अथवा ‘२५ डिसेंबर’, ‘३१ डिसेंबरला मध्यरात्री’, ‘नेत्यांच्या सभांच्या आरंभी वा त्यांच्या स्वागतासाठी’, आदी प्रसंगीही ते न फोडणे महत्त्वाचे !
दिवाळीच्या तोंडावर मुंबई, ठाणे आणि पुणे येथे डोळ्यांचे विकार, सर्दी, खोकला यांची साथ जोरात आहे. अजूनही पडत असणार्या पावसामुळे वातावरणात पालट होऊन आरोग्यावर परिणाम होत आहे. त्यामुळे सामाजिक आरोग्य टिकवण्यासाठी तरी फटाके फोडू नये. हिंदूंना धर्मशिक्षण नसल्यामुळे सण आणि उत्सव शास्त्रोक्तपणे कसे साजरे करावेत ? हे समजत नाही. कथित पुरो(अधो)गामीवाल्यांनी हिंदूंचे सण आणि प्रदूषण असे गणित जुळवून आणले आहे. त्यामुळे कायम हिंदूंनाच पर्यावरण रक्षणाचे उपदेश केले जातात. केवळ हिंदूंच नव्हे, तर समाजातील प्रत्येक पंथीय पर्यावरणाशी बांधील आहे. हे लक्षात घेत आपल्याकडून होणारी पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे आणि निसर्गाशी असलेली बांधिलकी जपली पाहिजे.
– श्री. जयेश राणे, भांडुप, मुंबई.