दत्तावतार श्रीपाद श्रीवल्लभ

आज २२ ऑक्टोबर (गुरुद्वादशी) या दिवशी ‘श्रीपाद श्रीवल्लभ लुप्तदिन’ आहे. त्या निमित्ताने…

दत्तावतार श्रीपाद श्रीवल्लभ

‘आश्विन कृष्ण द्वादशी तिथीच्या दिवशी चौदाव्या शतकातील प्रसिद्ध दत्तावतार श्रीपाद श्रीवल्लभ लुप्त झाले. महाराष्ट्राच्या संस्कृतीचा र्‍हास होत असतांना ज्या धर्म-संप्रदायांनी विशेष प्रकारची कामगिरी केली, त्यात दत्तसंप्रदायाचे वैशिष्ट्य फार मोठे आहे. या पंथाचे मुख्य प्रणेते श्री नृसिंहसरस्वती आहेत. महाराष्ट्रात त्या काळी हिंदु प्रजेला इस्लामी शासकांचा फार जाच सहन करावा लागत होता, अशा समयी आचारधर्माचा योग्य उपदेश करणार्‍या गुरुचरित्रावर सर्वजण वेदाइतकीच भक्ती ठेवत होते. श्रीपाद श्रीवल्लभ यांचे चरित्र याच ग्रंथात पाचव्या आणि नवव्या अध्यायात वर्णिलेले आहे. श्रीपाद श्रीवल्लभ हे दत्तात्रयांचे अवतार म्हणून प्रसिद्ध आहेत. लहानपणीच ते सर्वज्ञ होते. मुंजीच्या प्रसंगी त्यांनी चारही वेद मुखाने म्हणून दाखवले. त्यांची बुद्धीमत्ता अलौकिक होती. त्यांनी लग्न करण्याचे नाकारले; कारण आधीच त्यांचे लग्न विरक्तीशी झाले होते. काशी, बद्रिनारायण, गोकर्ण ही ठिकाणे झाल्यावर ते निजामाच्या राज्यांत कुरवपूर (कुरगड्डी) येथे आले. तेथे एका स्त्रीस आशीर्वाद दिला, ‘पुढील जन्मी तुला अलौकिक असा पुत्र होईल.’ त्याप्रमाणे ती स्त्री पुढच्या जन्मी करंजनगरीत जन्मास आली आणि तिच्या पोटी श्री नृसिंहसरस्वती यांचा जन्म झाला. श्रीपाद श्रीवल्लभ यांचाच हा अवतार असे मानण्यात येते. पहिल्या जन्मातील अवतार कार्य संपल्यावर श्रीपाद श्रीवल्लभ आश्विन कृष्ण द्वादशीला अदृश्य झाले.’

(साभार : ‘दिनविशेष’ (भारतीय इतिहासाचे तिथीवार दर्शन))