धोकादायक (अ)सामाजिक माध्यमे !

सर्वेक्षण : ५८% मुलींना ऑनलाइन छळाचा सामना करावा लागतो !

भारतात मुलींचा हक्क आणि समानता यांसाठी काम करणार्‍या एका स्वयंसेवी संस्थेकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. ती म्हणजे ५८ टक्क्यांहून अधिक मुलींना ‘ऑनलाईन’ गैरवर्तन आणि मानसिक छळाचा सामना करावा लागला अन् त्यातून त्यांनी सामाजिक माध्यमे वापरणे सोडले आहे. सामाजिक माध्यमांद्वारे होणार्‍या फसवणुकीची प्रकरणे दिवसेंदिवस वाढत आहेत. ‘फेसबुक’ या सामाजिक माध्यमावर अशा घटना सर्वाधिक घडत आहेत. काही प्रकरणे ही मानसिक छळाची, तर काही आर्थिक अपहाराची आहेत. बनावट (खोटे) खाते सिद्ध करून संबंधितांच्या मित्रांना पैसे मागणे, पैसे न दिल्यास ‘तुमच्या छायाचित्रांचा अपवापर करू’, असे धमकावणे, या सर्व प्रकरणांमधून पुण्यातील २ युवकांनी आत्महत्या केली.

सर्वेक्षणात असे आढळून आले की, पाचपैकी एका तरुणीने सामाजिक माध्यमांवर होणार्‍या छळामुळे ते वापरणे थांबवले, तर निम्म्या मुलींना शारीरिक किंवा लैंगिक हिंसाचाराची धमकी देण्यात आली. त्यांच्यापैकी बर्‍याच जणींनी सांगितले की, त्यांच्यावर याचा मानसिक परिणाम झाला. जगभरातील काही मुलींनी एक खुले पत्र सामाजिक माध्यमांच्या आस्थापनांना लिहिले आहे, ज्यात त्यांनी गैरवर्तनाची तक्रार नोंदवण्यासाठी अधिक प्रभावी मार्ग सिद्ध करण्याचे आवाहन केले आहे. असे असले, तरी ‘हे सामाजिक नव्हे, तर असुरक्षित असामाजिक माध्यम आहे’, असे म्हटल्यास चुकीचे ते काय ? ही एक विकृत विचारांची लढाई असून ती छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे आध्यात्मिक अधिष्ठानाने लढावी लागेल. छत्रपती शिवरायांच्या काळात महिलांवर अत्याचार करण्याचा प्रयत्न जरी केला, तरी त्याचा चौरंगा व्हायचा; परंतु आताची स्थिती पाहिल्यास गुन्हेगारांच्या मनात भीती नाही.

यामध्ये पालट होण्यासाठी सरकारने सामाजिक माध्यमांविषयीचे कायदे कठोर करण्यासह त्याची प्रभावी कार्यवाही कशी होईल, याविषयीची उपाययोजना काढायला हवी. फसवणूक करणार्‍या ऑनलाईन सामाजिक माध्यमांवर बंदी आणून त्यात सहभागी असणार्‍यांनाही कठोर शिक्षा करायला हवी, तरच हे प्रकार थांबतील. एखाद्या ॲपवर बंदी आणली, तरी त्याचे आस्थापन त्यात अनेक पळवाटा शोधून पुन्हा नवीन फसवणुकीला सिद्ध होतात. त्यामुळे सरकारने याविषयी कठोर धोरण अवलंबून या असामाजिक मंडळींचा बाजार उठवावा, हीच सामान्य नागरिकांची अपेक्षा !

– श्री. जयेश बोरसे, पुणे