वीराग्रणी डॉ. नारायण दामोदर सावरकर – एक चाणाक्ष आणि जहाल क्रांतीकारक !

आज १९ ऑक्टोबर या दिवशी डॉ. नारायण दामोदर सावरकर यांचा स्मृतीदिन आहे. त्या निमित्ताने….

आपल्या देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात लोकमान्य टिळक यांचे एक युग होते. चापेकर बंधूंनी आपल्या राष्ट्राच्या रक्षणार्थ मृत्यूला कवटाळले. त्यांचाच आदर्श समोर ठेवून स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा लढा देण्यासाठी शपथ घेतली आणि राष्ट्राच्या स्वातंत्र्यलढ्याला आरंभ केला. हळूहळू त्यांची ‘अभिनव भारत’ ही सशस्त्र क्रांतीकारकांची संघटना महाराष्ट्रात पसरू लागली. गणेश दामोदर सावरकर (बाबाराव सावरकर), विनायक दामोदर सावरकर (स्वातंत्र्यवीर सावरकर) आणि डॉ. नारायण दामोदर सावरकर (वीराग्रणी सावरकर) या ३ भावंडांनी भारतमातेला परदास्याच्या शृंखलेतून मुक्त करण्यासाठी आपल्या परिवारासह झोकून दिले. हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात संपूर्ण परिवार स्वतःला झोकून देतो, ही घटनाच अत्यंत दुर्मिळ आहे.

डॉ. नारायण दामोदर सावरकर

१. ब्रिटिशांनी स्वातंत्र्यलढ्याला खीळ घालण्यासाठी अनेक क्रांतीकारकांना राजद्रोहाची शिक्षा ठोठावत कारागृहात धाडणे

ब्रिटीश सरकार या देशाची राजकीय, ऐतिहासिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि धार्मिक परंपरा नष्ट करत होते. त्यासह या सुवर्णभूमीची ब्रिटिशांनी आर्थिक लूटही चालवली होती. वर्ष १९०८ ते १९११ ही ४ वर्षे म्हणजे इंग्रजांचे अन्याय आणि अत्याचार यांची काळीकुट्ट कारकीर्द होती. याच ४ वर्षांच्या कालखंडात हिंदुस्थानचा इतिहास रक्तरंजित झाला. ब्रिटीश सरकारने लोकमान्य टिळक यांना ६ वर्षांची कारावासाची शिक्षा देण्यासाठी मंडालेच्या कारागृहात बंदिस्त केले. बंगालमध्ये कन्हैयालाल दत्त, सुत्येंद्रनाथ बसू यांना फाशीची शिक्षा देण्यात आली. बाबाराव सावरकर यांना अंदमानच्या काळकोठडीत कोंडून ठेवले. मदनलाल धिंग्रा आणि अनंत कान्हेरे या २ समिधांची हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यलढ्याच्या यज्ञकुंडात आहुती पडली. त्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर यांना दोन जन्मठेपांची म्हणजे ५० वर्षांची अमानुष शिक्षा ठोठावण्यात आली. ब्रिटिशांनी भाषण आणि लेखन स्वातंत्र्य यांवर निर्बंध घातले. स्वातंत्र्याचा उच्चार करणार्‍याला राजद्रोहाची शिक्षा ठोठावत कारागृहात धाडण्यात आले.

श्री. दुर्गेश परुळकर

२. नारायण सावरकर यांनी ब्रिटीश सत्तेला न जुमानता ‘अभिनव भारत’ संघटनेचे सशस्त्र क्रांतीकार्य अविरत चालू ठेवणे

ब्रिटीश सरकारच्या या पाशवी दडपशाहीला ‘अभिनव भारत’च्या तरुण क्रांतीकारकांनी भीक घातली नाही. अभिनव भारतचे नेतृत्व डॉ. नारायणराव सावरकर करत होते. ब्रिटीश सत्तेच्या जाचाला न घाबरता त्यांचे क्रांतीकार्य चालूच राहिले. देशासाठी हसत हसत फासावर जाण्याची मानसिक आणि शारीरिक सिद्धता सर्व क्रांतीकारक तरुणांनी केली होती. त्यामुळे ब्रिटीश सरकारने या क्रांतीकारकांवर कारवाई करण्यास आरंभ केला. न्यायालयात खटले भरण्यात आले. डॉ. नारायणराव सावरकर यांनी वरिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाला न घाबरता तोंड दिले. दोन मोठ्या भावांच्या (बाबाराव आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या) अनुपस्थितीत अभिनव भारताचे कार्य तसेच पुढे चालू ठेवले.

त्यांना राजद्रोहाच्या अपराधाखाली ब्रिटीश सरकार अंदमानात पाठवू शकेल, अशी परिस्थिती निर्माण झाली. तरीही त्यांनी सशस्त्र क्रांतीचा मार्ग सोडला नाही.

३. गव्हर्नर जनरल लॉर्ड हार्डिंग याचा बाँबस्फोटात मृत्यू होणे आणि त्यावरून कारागृह अधिकार्‍याने स्वातंत्र्यवीर सावरकर यांना नारायणराव यांच्याविषयी विचारणा केल्यावर त्यांनी गौरवोद्गार काढून सडेतोड प्रत्युत्तर देणे ! 

‘माझी जन्मठेप’ या पुस्तकात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी त्यांच्या लहान भावाविषयी अत्यंत अभिमानाने कौतुकास्पद उद्गार काढले. तो प्रसंग असा….

‘वर्ष १९१२ मध्ये देहलीला एक मोठा राजसमारंभ आयोजित करण्यात आला होता. त्या प्रसंगी चतुरंग दलासह हत्तीवरील राजवैभवाच्या अंबारीत त्या वेळचे गव्हर्नर जनरल लॉर्ड हार्डिंग यांच्यावर बाँब फेकण्यात आला. त्यात त्यांचा मृत्यू झाला. ही वार्ता अंदमानच्या कारागृहापर्यंत पोचली. अंदमान कारागृहाचे अधिकारी तिथल्या राजकीय बंदिवानांना मानसिक यातना देण्यासाठी खोट्या बातम्या पसरवत होते. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी हेतूत: देहलीच्या बाँबची बातमी कारागृहातील सर्व क्रांतीकारकांना कळली असल्याचे बारीला (अधिकार्‍याला) सांगितले. त्यानंतर बारीने क्रांतीकारकांना आपापसात बोलण्यास बंदी घातली. सावरकरांवर मानसिक दडपण यावे आणि त्यांचा मानसिक छळ करावा या हेतूने कारागृहात अशी बातमी पसरवण्यात आली की, सावरकरांचा धाकटा भाऊ देहलीच्या बाँबस्फोट प्रकरणात पकडला गेला. ही बातमी खरी आहे कि खोटी ? हे काढण्याचा प्रयत्न सावरकरांनी केला. पर्यवेक्षक सावरकरांना म्हणाला, ‘‘तुमचा धाकटा भाऊ अजून बाहेर आहे. तोही आता लवकरच इथे येईल.’’

सावरकर म्हणाले, ‘‘तोच काय; पण हिंदुस्थानातील कुणीही मनुष्य इथे येऊ शकेल. तुम्ही ब्रिटिशांनी हिंदुस्थान आणि आयर्लंड यांना एक प्रचंड बंदीशाळा बनवले आहे.’’ सावरकरांनी हे विधान हेतूत: केले होते; कारण बारी हा आयर्लंडचा नागरिक होता. सावरकरांची ही मात्रा लागू पडली. पर्यवेक्षक म्हणाला, ‘‘तुमचा भाऊ इथे येईल कि नाही ? ते मला ठाऊक नाही; कारण तो जरा भित्रा आहे.’’ सावरकरांनी विचारले, ‘‘कशावरून ?’’ पर्यवेक्षक म्हणाला, ‘‘त्याने देहलीची बातमी ऐकताच स्वतःच घाबरून पोलिसांना एक तार केली, मी कलकत्त्याला आहे. पुढे मागे माझ्यावर तुम्ही आळ घ्याल; म्हणून तुम्हाला आधीच सांगून ठेवतो.’’

सावरकर म्हणाले, ‘‘असे असेल, तर मग कलकत्त्यामध्ये रहाणारा तोच एकमेव चाणाक्ष मनुष्य आहे. त्याने बाँब फेकला नाही, हे उघडच आहे; पण त्याने तो फेकला असता, तरीसुद्धा त्याने अशीच तार पोलिसांना करून कळवले असते. तो भित्रा नाही. जो दुष्ट शत्रूवर आघात करून पुन्हा निसटून जाण्याचा प्रयत्न करतो, तोच खरा शूर !’’

४. ब्रिटिशांनी डॉ. नारायण सावरकर यांना अनेकविध प्रकरणात अटक केल्यावर त्यांनी पुरावे देऊन स्वतःची सुटका करून घेणे

वीराग्रणी डॉ. नारायण सावरकर हे खरोखरच चाणाक्ष होते. प्रत्येक क्रांतीकार्यात, हत्येच्या वेळी, बाँबस्फोटांच्या घटनेत त्यांना पकडले जात होते. प्रत्येक वेळी सरकारला न्यायालयात त्यांनी पुरावे देऊन स्वतःची सुटका करून घेतली. अशा प्रकारे नारायणरावांनी ब्रिटीश सरकारने केलेल्या आरोपांवर प्रत्येक वेळी मात केली. अभिनव भारतची गुप्तकामे त्यांनी बुद्धीचातुर्याने तडीस नेली. आपल्या दोन मोठ्या भावांप्रमाणे तेही त्यांच्यासारखेच ज्वल-जहाल क्रांतीकारक होते. स्वातंत्र्यवीर सावरकर हेच डॉ. नारायणराव सावरकरांचे स्फूर्ती स्थान होते. त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन !

– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते आणि लेखक, डोंबिवली (९.१०.२०२२)