हिंदु जनजागृती समितीच्या द्विदशकपूर्तीनिमित्त पणजी (गोवा) येथे सोहळा
पणजी, १६ ऑक्टोबर (वार्ता.) – समाजात भ्रष्टाचार आणि अनैतिकता वाढली आहे. हिंदूंनी जागृत होण्याची सध्या आवश्यकता आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी हिंदूसंघटन ही काळाची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन माजी शिक्षक प्रा. मुकुंद कवठणकर यांनी येथे केले. हिंदु जनजागृती समितीच्या द्विदशकपूर्तीनिमित्त श्री महालक्ष्मी मंदिर, पणजी येथे आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यात ते बोलत होते. या वेळी परशुराम गोमंतक सेनेचे अध्यक्ष श्री. शैलेंद्र वेलिंगकर आणि हिंदु जनजागृती समितीचे उत्तर गोवा समन्वयक श्री. गोविंद चोडणकर यांची प्रमुख उपस्थिती होती. सोहळ्याचा प्रारंभ प्रार्थना, श्लोक आणि शंखनाद झाल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाला.
प्रा. मुकुंद कवठणकर पुढे म्हणाले,
‘‘देशात हिंदूंची केविलवाणी स्थिती झाली आहे. यापूर्वी संत-महंत, राष्ट्रपुरुष या सर्वांनी पराक्रमाची भूमिका बजावली आहे. हिंदू भित्रे नव्हेत. रणांगण सोडून पळणारे नव्हेत. धर्माच्या नावाखाली चाललेल्या दंगली हिंदू खपवून घेणार नाहीत. देवाची कृपा असल्याविना प्रयत्नांना यश येत नाही. त्यामुळे तरून जाण्यासाठी नामस्मरण करा, तसेच एकाकी कार्य करण्यापेक्षा सांघिकरित्या करा. मानवतेच्या नावाखाली पुतना मावशी येऊन आम्हाला मारण्याचा प्रयत्न करत आहे, हे जाणा. हिंदुत्वाचे कार्य करणारे सर्व एकत्रित यायला हवेत. आपण संघटित राहिलो, तर जिंकू !’’
आपले राष्ट्र हे संस्कृतीवर आधारित ! – शैलेंद्र वेलिंगकर, परशुराम गोमंतक सेना
पहिल्या शतकापासून सोळाव्या शतकापर्यंत राष्ट्र आणि धर्म परस्परपूरक होते. धर्म वेगळा आणि पंथ वेगळे. धर्माची व्याप्ती मोठी आहे. हिंदुत्वाची ५ गुणवैशिष्ट्ये आहेत. विश्वबंधुत्वाची शिकवण केवळ हिंदु धर्म देतो. सर्वांना सुखप्राप्ती व्हावी, अशी शिकवण हिंदुत्वाने दिली आहे. स्त्रीची, मातृत्वाची जिथे पूजा होते, स्त्रीला मानसन्मान दिला जातो, तिथे सर्व प्रकारची सुखे उपलब्ध होतात. आपले राष्ट्र हे संस्कृतीवर आधारित आहे. आपल्या संस्कृतीला दैवी शक्तीचा आशीर्वाद आहे. त्यामुळेच परकीय शक्तींनी कितीही प्रयत्न केले, तरी आपली संस्कृती नष्ट झाली नाही. अशी संस्कृती नष्ट केली, तरी ती पुनश्च उभी रहाणार. हिंदूंचे धर्मांतर करणार्या डॉमनिक सारख्या मिशनर्यांना मुळासकट उपटून काढले पाहिजे.
यंदाची दिवाळी हलालमुक्त साजरी करा ! – गोविंद चोडणकर, हिंदु जनजागृती समिती
देशात हलाल जिहाद राबवला जात आहे. देशात समांतर हलाल अर्थव्यवस्था राबवण्यात येत आहे आणि यामुळे भारतातील अर्थव्यवस्था खिळखिळी केली जात आहे. हिंदूंनी कुठल्या जीवनावश्यक वस्तूंना हलाल प्रमाणपत्र आहे, ते पाहून यंदाची दिवाळी हलालमुक्त साजरी करावी. हिंदु राष्ट्राची लवकर स्थापना व्हावी, यासाठी हिंदूंचे दैनंदिन आचरण धर्माधिष्ठित असावे. आज निधर्मीवादाच्या नावाखाली अल्पसंख्यांकांचे लाड आणि हिंदूंवर अनन्वित अत्याचार केले जात आहेत.
सोहळ्याची प्रस्तावना हिंदु जनजागृती समितीचे दक्षिण गोवा समन्वयक श्री. सत्यविजय नाईक यांनी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. सुमेधा नाईक यांनी केले, तर आभारप्रदर्शन श्री. सुशांत दळवी यांनी केले.
हिंदुत्व रक्षणाचे कार्य करणार्यांचा सोहळ्यात सत्कार
श्री. चंद्रकांत (भाई) पंडित आणि श्री. राजीव झा यांचा प्रा. मुकुंद कवठणकर यांनी, तर श्री. मंदार गावडे यांचा सत्कार श्री. शैलेंद्र वेलिंगकर यांनी केला.
सोहळ्याला उपस्थित मान्यवर
शिवसेनेचे माजी गोवा राज्यप्रमुख श्री. रमेश नाईक, सौ. स्मिता रमेश नाईक, म्हापसा बाजारचे व्यवस्थापक श्री. एकनाथ म्हापसेकर, निवृत्त शिक्षक, योगशिक्षक आणि म्हापसा येथील पत्रकार श्री. नारायण राठवड, पर्तगाळ, कणकोण येथील हिंदु आघाडीचे श्री. सतीश भट, फोंडा येथील सौ. रेश्मा तळावलीकर, म्हापसा येथील धर्माभिमानी श्री. अभय सामंत आणि म्हापसा येथील अधिवक्त्या सौ. रश्मी अभय सामंत.
केसरीया वाहिनीचे श्री. राजीव झा यांचे मनोगत
धर्मांध मुसलमान कुणाचेच बंधू होऊ शकत नाहीत. ते चांगले वागून तुमचे लक्ष वेधून घेतील आणि नंतर तुमचाच घात करतील. आम्ही हातात बांगड्या भरलेल्या नाहीत. रा.स्व. संघ, विश्व हिंदु परिषद, हिंदु जनजागृती समिती आदी हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या धर्मासाठीच्या कार्यामुळे आम्ही जिवंत आहोत. त्यामुळे आम्हा सर्वांना या हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे आभार मानायला हवेत. हिंदु जनजागृती समितीच्या कार्यात सहभागी होऊया आणि हिंदु राष्ट्र स्थापन होण्यासाठी प्रयत्न करत राहूया.
क्षणचित्रे
१. कार्यक्रमाच्या शेवटी हिंदु राष्ट्राची प्रतिज्ञा घेण्यात आली.
२. स्वसंरक्षणासाठी घेण्यात आलेल्या स्वसंरक्षण प्रात्यक्षिकांना उपस्थितांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
३. प्रथमोपचाराची प्रात्यक्षिके दाखवण्यात आली
४. ‘हलाल जिहाद’ या विषयावर ध्वनीचित्रफीत दाखवण्यात आली.
५. यंदाची दिवाळी हलालमुक्त करूया ना ? असा प्रश्न गोविंद चोडणकर यांनी विचारला तेव्हा सर्वांनी उत्फूर्तपणे ‘हो’ म्हणून प्रतिसाद दिला.