नेत्यांच्या सभांच्या प्रसंगी त्यांच्या स्वागतासाठी अथवा सत्कारासाठी कार्यकर्ते अवाढव्य मोठे, जाडजूड हार आणून त्यांचे स्वागत करतात, तसेच काही प्रसंगी हाराची उंची अनुमाने २२ ते २५ फूट असते. त्यामुळे तो हार ‘क्रेन’ने आणावा लागतो. एवढा उंच हार घालणे शक्य नसल्याने नेत्यांना तो दुरूनच दाखवला जातो. या पद्धतीने स्वागत करण्याचा नेमका उद्देश काय ? हा सर्व अनावश्यक व्यय कशासाठी ? याची आवश्यकता खरेच आहे का ? तरीही हा व्यय करून उगाचच दिखावा का करायचा ? यातून काय साध्य होणार ? असे अनेक प्रश्न जनतेच्या मनात आहेत. याची नोंद घेऊन त्यावर योग्य ती कृती लोकप्रतिनिधींकडून व्हायला हवी.
आज देशातील अर्ध्याहून अधिक जनता दारिद्र्य रेषेखाली जीवन जगत आहे. असे असतांना अशा गोष्टींवर पैसे व्यय करणे कितपत योग्य आहे ? असा प्रश्न उपस्थित होतो. ते पैसे खर्या अर्थी राष्ट्राच्या विकासासाठी व्यय व्हायला हवेत. खरेतर नेत्यांनी कार्यकर्त्यांना ‘अशा प्रकारचे मोठे हार आणू नयेत’, याविषयी सांगून त्यांचे प्रबोधन करायला हवे. जेणेकरून पुढे त्याची पुनरावृत्ती होणार नाही; मात्र दुर्दैवाने तसे होतांना दिसत नाही. त्यामुळे ‘आपण जे करत आहोत ते योग्य आहे’, असा अपसमज कार्यकर्त्यांमध्ये आहे, असे वाटते. लाडक्या नेत्याचे स्वागत करण्यासाठी एवढ्या मोठ्या हाराची आवश्यकता नाही, हे त्यांना कळायला हवे. खाद्यपदार्थ, पाणी, वीज यांच्या अपव्ययाविषयी वेळोवेळी चर्चा होते; मात्र फुलांचा अपव्यय हा विषयही तितकाच महत्त्वाचा आहे. पैशांचा व्यय करून पाहिजे ती वस्तू खरेदी करता येते; पण तसे करण्यापूर्वी ‘तिच्या असलेल्या उपयोगाचे प्रमाण लक्षात घ्यायला हवे.’ तसे केले, तरच त्या वस्तूची हानी टळेल, राष्ट्रीय संपत्ती वाया जाणार नाही आणि कार्यकर्त्यांना काटकसर करणे शिकता येईल.
कार्यकर्ते नेते मंडळींच्या प्रेमापोटी उत्साहाच्या भरात, तसेच एकमेकांमधील चढाओढ करण्यासाठी स्वागतास मोठे हार आणतात; मात्र नेते मंडळींनाही स्वतःचे कौतुक करून घेण्यामध्ये किंवा ‘कार्यकर्त्यांना सांगून ते दुखावले जातील’, असा विचार न करता तत्त्वनिष्ठपणे त्यांना योग्य-अयोग्य याची जाणीव वेळीच करून द्यायला हवी. यातूनच परिपूर्ण समाजसेवा आणि त्याग यांचा संस्कार त्यांच्या मनावर अंकित होईल. याचा लाभ कार्यकर्त्यांनाच होऊन त्यांच्याकडून समाजभान राखत प्रत्येक कृती केली जाईल, हे नक्की !
– श्री. जयेश राणे, भांडुप, मुंबई.