ऋषिकेश (उत्तराखंड) येथे झालेल्या ‘नारी संसदे’मध्ये महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने सादर केलेल्या ‘आध्यात्मिक विकास आणि नेतृत्व करण्यामध्ये महिलांची भूमिका’ या विषयाला उत्तम प्रतिसाद !
ऋषिकेश (उत्तराखंड) – महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने केलेल्या एका संशोधनामध्ये महिला आणि पुरुष यांना प्रत्येकी ३० मिनिटे ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’ हा नामजप करण्यास सांगितला. त्या वेळी हा नामजप करण्यापूर्वी आणि केल्यानंतर त्यांची सकारात्मक प्रभावळ ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’द्वारे मोजण्यात आली. त्या वेळी महिला आणि पुरुष या दोघांच्या सकारात्मक प्रभावळीत साधारण सारखीच वाढ झाल्याचे दिसून आली. यातून लक्षात येते की, महिलांचा आध्यात्मिक विकास हा साधना केल्यानेच होऊ शकतो. स्त्री ही घराची केंद्रबिंदू असते. त्यामुळे छोट्या छोट्या आचारधर्माचे महत्त्व लक्षात घेऊन त्याप्रमाणे कृती करून जर स्त्रीने स्वत:तील सकारात्मकता वाढवली, तर ती घरातील सदस्यांवरही हे संस्कार करू शकते. असे झाल्यास पर्यायाने समाज संस्कारशील बनू शकतो. त्यामुळे साधनेचे महत्त्व स्त्रीने समजून घ्यायला हवे, असे प्रतिपादन महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सुश्री (कु.) तेजल पात्रीकर यांनी केले. ऋषिकेशमधील ‘परमार्थ निकेतन’ येथे ८ आणि ९ ऑक्टोबर या दिवशी ‘नारी संसद’ पार पडली. त्यामध्ये सुश्री (कु.) तेजल पात्रीकर यांनी ‘आध्यात्मिक विकास आणि नेतृत्व करण्यामध्ये महिलांची भूमिका’ या विषयावर त्या बोलत होत्या. या विषयाच्या वेळी ३५० लोकांची उपस्थिती होती.
१. या कार्यक्रमाचे आयोजन ‘माता ललितादेवी सेवाश्रम ट्रस्ट’ आणि ‘परमार्थ निकेतन’ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन परमार्थ निकेतनच्या साध्वी भगवती सरस्वती, विचारवंत श्री. के.एन्. गोविंदाचार्य आणि प्रा. वीणा मिश्रा यांच्या हस्ते करण्यात आले.
२. या कार्यक्रमाला भारतभरातील वेगवेगळ्या क्षेत्रांत कार्य करणार्या १७ राज्यांतील २०० उच्चशिक्षित महिलांचा सहभाग होता. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या महिलांनी ‘नारी – घरी आणि बाहेर’ या विषयाच्या अनुषंगाने विषय मांडले.
३. या कार्यक्रमाला उत्तरप्रदेशच्या राज्यपाल श्रीमती आनंदीबेन पटेल, केरळचे राज्यपाल आरिफ खान आणि केंद्रीय सांस्कृतिक मंत्री श्री. अर्जुन राम मेघवाल यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती.
‘नारी संसदे’त कु. तेजल पात्रीकर यांनी मांडलेल्या विषयाच्या संदर्भातील क्षणचित्रे१. कु. तेजल पात्रीकर या विषय सादर करत असतांना व्यासपिठावर उपस्थित असलेले राज्यपाल आरिफ खान, ‘परमार्थ निकेतन’चे अध्यक्ष स्वामी चिदानंद सरस्वती, साध्वी भगवती सरस्वती, प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या वंदना शिवा हे विषय लक्ष देऊन ऐकत होते आणि सूत्रे लिहून घेत होते. २. या वेळी राज्यपाल आरिफ खान यांची भेट घेऊन त्यांना महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे माहितीपत्रक देण्यात आले. ३. कु. तेजल पात्रीकर यांचा विषय ऐकल्यावर अनेकांनी ‘विषय आवडला’, असे सांगितले. तसेच काही जण ‘या कार्यात आम्हालाही सहभागी होण्यास आवडेल’, असेही म्हणाले. ४. लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) येथील प्रा. (सौ.) शीला मिश्रा यांनी कु. तेजल पात्रीकर यांना ‘आजच्या काळाला आवश्यक असा संशोधनावर आधारित विषय मांडला’, असे सांगत कौतुक केले. ५. पू. दिलीप सिंग यांच्या ‘नामधारी संप्रदाया’तील शीख साधकांनी विषय ऐकल्यावर त्यांनी कु. तेजल पात्रीकर यांची भेट घेतली. ते साधक म्हणाले, ‘‘तुम्ही साधनेविषयी जी दिशा दिली, ती आजच्या काळाला एकदम योग्यच आहे. हेच आज समाजाला सांगण्याची आवश्यकता आहे. आमचे गुरूही हेच मार्गदर्शन करतात.’’ या वेळी त्यांनी कु. तेजल यांच्या गळ्यात लोकरीची माळ घातली. ६. ‘नारी संसद’ कार्यक्रमाच्या निमित्ताने ‘भारत गौरव’ या नावाचे मासिक काढण्यात आले होते. त्यामध्ये महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचा ‘मेकअप (सौंदर्यप्रसाधने)’ याविषयीचा संशोधनात्मक लेख प्रसिद्ध करण्यात आला आहे. |
संपादकीय भूमिकास्त्रियांनो, तुमचा आध्यात्मिक विकास हा साधना केल्यानेच होऊ शकतो, हे लक्षात घ्या ! |