यशस्वी परराष्ट्रनीतीचे शिलेदार !

भारताने ‘आत्मनिर्भरते’कडे वाटचाल करत असतांनाच स्वतःचे परराष्ट्र धोरणही मुत्सद्दी स्वरूपाचे निर्माण केले आहे. त्यात देशहित सामावलेले आहे, याची प्रचीती सध्याच्या काळात प्रकर्षाने येत आहे. मध्यंतरी भारताने रशियाकडून शस्त्रे आणि तेल खरेदी केले. रशिया-युक्रेन युद्ध चालू असतांना भारताच्या या निर्णयामुळे पाश्चिमात्य देशांच्या नाकाला मात्र मिरच्या झोंबल्या ! त्यांनी भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांना कोंडीत पकडण्यासाठी त्या अनुषंगाने प्रश्न विचारले. परराष्ट्रमंत्र्यांनी त्यांना खडे बोल सुनावत आणि त्यांच्या चुका सांगत एका दगडात दोन पक्षी मारले. अशा प्रकारे पाश्चिमात्य देशांनाच तोंडावर आपटून स्वतःतील बाणेदारपणा दाखवला. डॉ. जयशंकर हे पाश्चात्त्य देशांची भारतविरोधी कृत्ये अशा प्रकारे समोर आणत आहेत. ‘गेली २ शतके भारताला पाश्चात्त्य देशांकडून अवमान सहन करावा लागला आहे. १८ व्या शतकामध्ये दरोडेखोरांसारखे येऊन त्यांनी भारतावर २०० वर्षे राज्य केले’, असे प्रतिपादन डॉ. जयशंकर यांनी पाश्चात्त्य देशांच्या कार्यक्रमातच उघडपणे केले होते. त्यांची ही स्पष्टवक्तेपणाची भूमिकाच आज परराष्ट्र संबंध सुधारण्यात मोलाची ठरत आहे, अन्यथा भारतावर ६० वर्षे राज्य केलेल्या काँग्रेसच्या सत्ताकाळात परराष्ट्र संबंध हितावह कधीच नव्हते. ‘भारताचे मित्र अल्प आणि शत्रूच अधिक’, अशी तेव्हाची स्थिती म्हणजे भारतासाठी डोकेदुखीच होती. भारताला साहाय्य करणे तर सोडाच; पण टीका करून त्याला न्यून लेखणारे, भारतावर आक्रमण करणारे, बाँबस्फोट घडवणारे अशांचाच यात मोठा सहभाग असायचा. भारताने ‘शेजारी देश प्रथम’ हे धोरण अवलंबून मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला खरा; पण त्याच शेजारी देशांनी प्रत्येक वेळी भारताचा घात केला. कोणे एकेकाळी संपूर्ण जगासाठी विश्वदीप ठरत असलेला भारत काँग्रेस सरकारच्या काळात मात्र काजळी धरलेला दीप झाला होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रूपाने तो पुन्हा एकदा प्रज्वलित झाला आणि सर्वच राष्ट्रांमध्ये भारताचा डंका पिटू लागला ! आतापर्यंतच्या परराष्ट्र धोरणांमध्ये भारताने केलेले पालट, अन्य राष्ट्रांसंबंधी घेतलेल्या रोखठोक भूमिका, देशाची युद्धसज्जता, शत्रूराष्ट्रांच्या संदर्भात दाखवलेली आक्रमकता यांमुळे परराष्ट्रांच्या तुलनेत भारताने स्वतःची अशी एक वेगळीच उंची निर्माण केली. भारताची न्याय्य बाजू लक्षात आल्याने आधी विरोध करणारे देशही आता भारताचे समर्थन करू लागले आहेत. काही वर्षांपूर्वी पाकिस्तानच्या आडून भारतविरोधी भूमिका घेणारा युक्रेन देशही भारताकडे साहाय्याची याचना करत आहे. संयुक्त राष्ट्रांच्या ७७ व्या सर्वसाधारण सभेत परराष्ट्रमंत्री डॉ. जयशंकर यांनी १६ मिनिटांच्या भाषणातून संपूर्ण जगावर भारताची एक वेगळीच मोहोर उमटवली. त्यांचे भाषण हे भारतद्वेष्ट्यांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारे ठरले. थोडक्यात काय, तर ‘जागतिक सत्तासंघर्षात भारत सामर्थ्यशाली भूमिकेकडे वाटचाल करत आहे’, असे म्हणता येईल. यासाठी डॉ. जयशंकर यांचे योगदान मोलाचे ठरत आहे. त्यांच्यासारखा आश्वासक, धाडसी आणि मुत्सद्दी नेता याआधी कधीच पहाण्यात आला नव्हता. त्यांनी परराष्ट्र धोरणाची व्याख्याच पालटली आहे. देशहिताचा अभिमान बाळगणार्‍या डॉ. जयशंकर यांच्याकडून देशातील प्रत्येकच नागरिकाने मुत्सद्दीपणा शिकावा !

आदरणीय परराष्ट्रमंत्री !

रशिया-युक्रेन युद्धाच्या दृष्टीने भारत शांततेच्या बाजूने असल्याची भूमिका संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत ठामपणे मांडून डॉ. जयशंकर यांनी पाश्चात्त्य देशांची तोंडे बंद केली. असे असले, तरी परराष्ट्र संबंधांमध्ये संतुलन राखण्याचे धोरणही त्यांनी कायम ठेवले. अमेरिकेने पाकिस्तानला दिलेल्या ‘एफ् १६’ या लढाऊ विमानांच्या संदर्भातही त्यांनी अमेरिकेत जाऊन ‘मूर्खपणा’ असे सांगत खडे बोल सुनावले. गेल्या अनेक दशकांपासून आतंकवादाने भारताला गिळून टाकण्याचाच प्रयत्न केला होता; मात्र भारताकडून आतंकवादविरोधी ठाम भूमिका कधीच घेतली गेली नाही. त्याचा अपलाभ अन्य राष्ट्रांनी घेतला; पण डॉ. जयशंकर यांच्या आक्रमक भूमिकेमुळे आतंकवादी आक्रमणांना काही प्रमाणात का होईना; पण आळा बसला. आतंकवादासमवेत हातमिळवणी करणार्‍या देशांना त्यांची चूक ठामपणे दाखवणारा एकही नेता यापूर्वी नव्हता. अशा कार्यकर्तृत्वातूनच जयशंकर यांनी भारतीय जनतेच्या मनात स्वतःविषयी आदर निर्माण केला आहे.

परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर ‘यशस्वी परराष्ट्रनीतीचे शिलेदार’ !

डॉ. जयशंकर केवळ बोलतात, असे नाही, तर त्यांच्या कृतीशीलतेचा दराराही तितकाच आहे. अफगाणिस्तानात तालिबानचा धुमाकूळ चालू असतांनाही भारतीय तेथून सुरक्षितरित्या बाहेर पडू शकले. रशिया-युक्रेन युद्धकाळात युक्रेनमधून भारतीय विद्यार्थी सुखरूप बाहेर पडले. कोरोनाकाळात अनेक देशांना लसपुरवठ्यासह केलेल्या अन्य स्वरूपाच्या साहाय्यातूनही भारताला मान मिळाला. या सर्वांतून कणखर परराष्ट्रनीतीचे यशच अधोरेखित होते. एकीकडे जगात शत्रूराष्ट्रांची वाढ होत असतांना ‘विश्वाचा कैवारी’ म्हणून सर्व देशांनी भारताकडे आशेने पहाणे याहून भारताचा मोठेपणा काय असणार ? या पालटलेल्या परिस्थितीचे संपूर्ण श्रेय पंतप्रधान मोदी आणि परराष्ट्रमंत्री डॉ. जयशंकर यांना जाते.

जगातील सर्वाेच्च महासत्ता !

जागतिक स्तरावर परराष्ट्र संबंधांत भारत दिवसेंदिवस उल्लेखनीय प्रगती करत आहे. भारताने याविषयीची आपली भूमिका जराही शिथिल न करता त्यात उत्तरोत्तर वाढच करायला हवी. तसे झाल्यासच भारत जागतिक सत्तासंघर्षात टिकून राहू शकेल. ‘विश्वपटलावर अभूतपूर्व स्थान मिळावे’, हे ध्येय पूर्णत्वाला नेण्यासाठी भारताने राष्ट्रहिताची भूमिका घेत प्रयत्नशील रहावे. ‘कुणाकडेही साहाय्य मागावे लागेल’, अशी स्थिती आज भारताची नाही. उलट ‘भारताने आपल्याला साहाय्य करावे, अशा याचकाच्या भूमिकेत अनेक राष्ट्रे असणे’, ही भारतासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. भारताची युद्धसज्जता, शस्त्रांविषयीचे करार, मैत्रीपूर्ण ठरणारे विदेश दौरे, आंतरराष्ट्रीय हितसंबंध, शत्रूंविरोधात केलेले ‘स्ट्राईक’ हे सर्व पहाता भारत जगातील ‘सर्वाेच्च महासत्ता’ होण्याच्या दिशेकडे मार्गक्रमण करत आहे, हे नक्की !

भारताची सर्वाेच्च महासत्तेकडे होणारी वाटचाल म्हणजे अवलंबलेल्या कणखर परराष्ट्रनीतीचे यश !