कुठल्याही देशाच्या विरोधात माध्यमे प्रसार करत असतील, तर त्या देशाने त्यांच्यावर बंदी घालणेच योग्य !
आतापर्यंत आपण जिहादी आतंकवादी संघटना, फुटीरतावादी, नक्षलवादी आदी संघटनांवर बंदी घालण्यात आल्याच्या बातम्या ऐकल्या असणार; मात्र जेव्हा रशियाने ‘मेटा’ या सामाजिक माध्यमे असणार्या अमेरिकी आस्थापनावर ती आतंकवादी संघटना असल्याचे सांगून बंदी घातली, तेव्हा सर्व जगच आश्चर्यचकित झाले. रशियाच्या दृष्टीने ‘मेटा’ ही आतंकवादी संघटना ठरली, तरी जगाच्या दृष्टीने अद्याप तरी तसे नाही. फेसबुक, व्हॉट्सॲप आणि इन्स्टाग्राम ही सामाजिक माध्यमे ‘मेटा’ या आस्थापनाची आहेत अन् जगभरात यावर कोट्यवधी लोकांची खाती आहेत. याद्वारे माहितीचे आदानप्रदान केले जाते. याचे जाळे प्रचंड विस्तृत आहे. आज जगातील मोठी लोकसंख्या या माध्यमांशी जोडलेली आहे. यांद्वारे ‘मेटा’ आस्थापनाला प्रतिदिन अब्जावधी रुपयांचा नफा होत असतो. मार्क झुकेरबर्ग हे या आस्थापनाचे मालक आहेत. आजचा समाज या माध्यमांच्या व्यतिरिक्त काही क्षणही राहू शकत नाही, इतका त्यांचा प्रभाव आहे. रशियाची लोकसंख्या १५ कोटी आहे, त्यातील साडेतेरा कोटी लोक या माध्यमांशी जोडलेले होते. या माध्यमांद्वारे एखादे आतंकवादी आक्रमण झाले, कुणाची हत्या झाली, अशी घटना अद्यापतरी घडलेली नसतांना रशियाने यावर बंदी घातली. या बंदीमागचे मोठे कारण युक्रेनविरुद्धचे युद्ध हे आहे. ‘रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यापासून प्रसारमाध्यमांकडून रशियाविरोधी आणि युक्रेनच्या बाजूने बातम्या दिल्या जात असल्याचे पहिल्या दिवसापासून दिसून येत आहे’, असे म्हटले जाते; कारण आज जगभरात जी काही मोठी आणि कथित प्रतिष्ठित प्रसारमाध्यमे आहेत, ती अमेरिकेची किंवा पाश्चात्त्य देशांची आहेत. त्यामुळे ती बातम्या देतांना अमेरिकेच्या धोरणाला सोयीस्कर अशी देतात आणि जगभरात त्यानुरूप वातावरण निर्माण करतात. युक्रेनविरुद्धचे युद्ध चालू झाल्यापासून त्यांनी रशियाच्या विरोधात वार्तांकन करण्यास चालू केल्याचा रशियाचा दावा आहे. या युद्धात रशियाचा पराभव होत आहे, त्याचे रणगाडे, विमाने युक्रेनकडून उद्ध्वस्त केली जात आहेत, रशियाचे सैनिक घाबरले असून त्यांना युद्ध करायचे नाही, रशियाचे सैनिक युक्रेनच्या लोकांवर अत्याचार करत आहेत, अशा विविध प्रकारची वृत्ते रशियाच्या विरोधात प्रसारित केली जात आहेत. दुसरीकडे नाटो देश युक्रेनला कसे साहाय्य करत आहेत, असेही दाखवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे रशियाला वाटत आहे. याचा सामाजिक माध्यमांद्वारे प्रसार होऊ लागल्यानेच मार्च २०२२ मध्येच फेसबुक आणि इन्स्टाग्राम यांवर रशियाने बंदी घातली. त्याला न्यायालयात आव्हान दिल्यानंतर न्यायालयानेही बंदीचे समर्थन केले; मात्र ज्याप्रमाणे जगभरातील लोक या माध्यमांव्यतिरिक्त राहू शकत नाहीत, तसेच रशियातील नागरिकांचेही झाल्याने ते व्ही.पी.एन्. (व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क) याद्वारे या माध्यमांशी स्वतःला जोडत होते. यावर सरकार काही करू शकत नव्हते. पाश्चात्त्य माध्यमांच्या रशियाविरोधी वार्तांकनाला या माध्यमांवरून मोठी प्रसिद्धी मिळत होती आणि त्याच्यावर अनेक जण त्यांचे म्हणणे मांडत होते. यामुळे रशियातील लोकांचा बुद्धीभेद होऊ लागला होता. ते सरकारच्या विरोधात, पुतिन यांच्या विरोधात आणि युद्धाच्या विरोधात आंदोलनही करत होते. ‘रशिया युक्रेनच्या लोकांवर अत्याचार करत आहे’, अशा प्रकारची मोठी अपकीर्ती करण्यात येत होती. यामुळेच सरकारने ‘मेटा’वर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. संयुक्त राष्ट्रांच्या नियमानुसारच ही बंदी घालण्यात आल्याने याला विरोध होऊ शकत नाही.
भारताने यंत्रणा निर्माण करावी !
रशियाने घातलेली बंदी ही पुढे अनेक देशांसाठी एक मार्गदर्शक ठरण्याचीही शक्यता आहे. चीनमध्ये पूर्वीपासूनच फेसबुक, व्हॉट्सॲप, ट्विटर आदी पाश्चात्त्य माध्यमांवर बंदी आहे. आता अन्य देशही चीन आणि रशिया यांचाच कित्ता गिरवण्याची शक्यता नाकारता येत नाही अन् ते चुकीचे असेल, असेही म्हणता येत नाही; कारण प्रत्येकाला स्वतःच्या देशाची प्रतिमा, लोकांची विचारसरणी आदींवर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार आहे. हे एक वैचारिक युद्ध आहे आणि त्यात पाश्चात्त्य देश पुष्कळ पुढारलेले आहेत. सामाजिक माध्यमांचा काळ येण्यापूर्वीच पाश्चात्त्य देशांतील नियतकालिके त्यांच्या शत्रूदेशाचा अपप्रचार करणारी वृत्ते, लेख, मुलाखती आदी प्रसारित करत होते. आजही अमेरिकेतील ‘न्यूयॉर्क टाइम्स’, ‘टाइम’ यांसारखी नियतकालिके भारताच्या विरोधात अपप्रचार करणारे लिखाण जवळपास प्रतिदिन करत असतांना आणि त्यांना भारतातील तथाकथित निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी, धर्मांध आदी लोकच वैचारिक दारूगोळा पुरवत असतात, हे विशेष ! अशा दैनिकांवर भारत भारतापुरती बंदी घालू शकतो. त्याचप्रमाणे सामाजिक माध्यमांतूनही हिंदू आणि भारत यांच्या विरोधात मोठा अपप्रचार केला जातो. आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या जिहादी आतंकवाद्यांनी याच माध्यमांद्वारे जिहादचा प्रसार केल्याचेही समोर आले आहे. अशा माध्यमांवर भारतात बंदी घालण्याची यापूर्वी मागणी झालेली आहे; मात्र याला दुसरी बाजूही आहे. भारतात याच माध्यमांचा प्रसार करून राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी प्रसार करत आहेत. धर्मद्रोही आणि राष्ट्रद्रोही यांचा प्रतिवाद करत आहेत. त्यामुळे भारतात असे काही होईल आणि त्याला समर्थन मिळेल, अशी शक्यता पुष्कळ अल्प आहे; मात्र भारताने अशा या माध्यमांवरील भारत आणि हिंदू यांविरोधी खात्यांवर बंदी घालण्यासाठी एक यंत्रणा निर्माण करण्याची आवश्यकता आहे. हे भारत सरकारला शक्य आहे. भारत सरकारने अनेक सामाजिक खाती बंद करण्यास संबंधित आस्थापनांना सांगून ते करवूनही घेतले आहे. जर डोक्यावरून पाणी गेले, तर रशियाप्रमाणे अशा माध्यमांना आतंकवादी ठरवून त्यांच्यावर बंदी घालण्याचीही मानसिकता भारताने सिद्ध ठेवली पाहिजे, हेही तितकेच खरे !