पित्ताच्या गोळीमागील क्रूर सत्य आणि आयुर्वेदाची श्रेष्ठता !

वैद्य परीक्षित शेवडे

१. कर्करोगासाठी कारणीभूत असलेल्या ‘नायट्रोसोमिन’चा समावेश असणाऱ्या ‘रॅनिटिडिन’ औषधाची भारतात मोठ्या प्रमाणात विक्री होणे

‘पित्ताची गोळी म्हणून प्रसिद्ध असलेल्या आणि कित्येक लोक चणे-फुटाण्यासारख्या मटकावणाऱ्या ‘रॅनिटिडिन’ या औषधामुळे कर्करोग होऊ शकतो’, अशी शक्यता लक्षात आल्याने विविध देशांतील औषधे नियमन संस्थांनी ‘या औषधाच्या वापराविषयी आधुनिक वैद्य, तसेच रुग्ण यांनी काळजी घ्यावी’, असे आवाहन केले आहे. काही नियामक मंडळांनी या औषधांचा साठा परत मागवला आहे. यात अमेरिका, कॅनडा, सिंगापूर इत्यादी देशांचा समावेश होतो. याविषयी भारतीय राज्यांना मार्गदर्शक तत्त्वे घोषित करण्यात आली असून योग्य ती काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. (नुकतेच भारत सरकारने या गोळीचे नाव अत्यावश्यक औषधांच्या सूचीतून वगळले आहे. – संपादक) हे वृत्त समोर येताच जगभर खळबळ उडाली; कारण कर्करोगासारखा दुर्धर रोग घडवण्याची शक्यता असलेला ‘नायट्रोसोमिन’ नामक घटक असणारे हे औषध आधुनिक वैद्यांचे अत्यंत लाडके आहे !

भारताचा विचार करता देशातील सर्वाधिक सेवन केल्या जाणाऱ्या पहिल्या ३ औषधांमध्ये ते मोडते. या एका औषधाचा व्यापारच सुमारे ७०० कोटी रुपयांहून अधिक आहे. बहुसंख्य आधुनिक वैद्य आपल्याला सर्रासपणे जे ‘अँटासिड’ लिहून देतात, त्यातील ‘रॅनिटिडिन’ हे अत्यंत लाडके औषध आहे. खरेतर हे औषध ‘श्ोड्यूल एच् ड्रग’ या गटात मोडते, म्हणजेच आधुनिक वैद्यांच्या ‘प्रिस्क्रिप्शन’विना हे औषध रुग्णांना देण्यास मनाई आहे. १३६ कोटी लोकसंख्येच्या देशात हे नियम कितपत काटेकोरपणे पाळले जातात, हे सर्व जाणतातच. असे असतांना इतकी वर्षे या औषधाविषयीची ही माहिती का समोर आली नसावी ?

२. भारतात ‘क्लिनिकल ट्रायल’ (औषधांसाठी करण्यात येणारे वैद्यकीय प्रयोग) विषयी जनजागृती होणे आवश्यक !

खरेतर असे घडण्यात धक्कादायक असे काहीच नाही. ‘क्लिनिकल ट्रायल’ (औषधांसाठी करण्यात येणारे वैद्यकीय प्रयोग) कशा प्रकारे चालतात, हे ज्यांना ठाऊक आहे, त्यांना या वृत्तात वावगे वाटणार नाही; मात्र दुर्दैवाने या सगळ्या विषयातील जनजागृती भारतात केली जात नाही. ‘क्लिनिकल ट्रायल’ म्हणजेच औषधांसाठी करण्यात येणारे वैद्यकीय प्रयोग हे ४ पायऱ्यांत (खरेतर ५) केले जातात. संशोधन, प्रयोगशाळेत परीक्षण, प्राणी आणि स्वयंसेवी माणसे यांवर प्रयोग, तसेच रुग्णांवर प्रयोग असे ० ते ३ टप्पे पार केले जातात. असे असूनही कित्येक औषधांचे दुष्परिणाम जे वरील ४ टप्प्यांमध्ये लक्षात आलेले नाहीत, ते पायरी क्रमांक ४ मध्ये पडताळले जातात.

चौथ्या पायरीत नेमके काय घडते ? चौथ्या पायरीमध्ये एखादे औषध हे बाजारात उपलब्ध झाल्यावर पुढच्या कित्येक काळामध्ये होणारे त्याचे दुष्परिणाम पडताळले जातात. रुग्णांवर परीक्षणे करतांना गर्भवती महिलांना वगळले जाते. त्यांच्यावर औषधांचा नेमका काय परिणाम होतो, हेही चौथ्या पायरीतच पडताळता येते. असे दुष्परिणाम आढळल्यावर आणि त्यांची निश्चिती झाल्यावर ही औषधे परत मागवली अथवा बंद केली जाऊ शकतात.

३. रुग्णांना आरोग्य लाभ मिळवून देणे नव्हे, तर अधिक नफा मिळवणे, हेच औषधी आस्थापनांचे ध्येय असणे 

भारतातील आंतरदेशीय औषधी मार्केट (बाजार) हे वर्ष २०१८ मध्ये १ लाख २९ सहस्र १५ कोटी इतके अतिप्रचंड आहे. विविध सर्वेक्षणानुसार या बाजारात प्रतिबंधित औषधेही उघडपणे विकली जातात आणि ‘प्रिस्क्राईब’ (डॉक्टरांनी लिहून देणे) केली जातात. त्यातच आपल्या देशातील नियामक मंडळांच्या कार्यप्रणालीत त्रुटी, भ्रष्टाचाराचा हैदोस आणि बाजाराचा अवाढव्य आकार यांमुळे गुणवत्तेच्या संदर्भात घेतल्या जाणाऱ्या काळजीविषयी शंका आहेच. ‘ती काळजी घेतली गेली, तरी हा प्रश्न सुटला’, असे समजण्याचे कारण नाही. ‘व्हॅलेंट फार्मास्युटिकल्स’चे मुख्य कार्यकारी अधिकारी जे. मायकल पीयर्सन यांनी वर्ष २०१५ मध्ये एका मुलाखतीत स्पष्ट सांगितले होते, ‘‘फार्मा’ आस्थापनाचे काम हे त्यांच्या भागीदारांना नफा मिळवून देणे असून रुग्णांच्या आरोग्याला ते उत्तरदायी नाहीत.’’ आधुनिक वैद्यक हा नफेखोरीचा व्यवसाय झाल्याची ही उघड ग्वाही होती. या मुलाखतीनंतर पीयर्सन यांच्यावर प्रचंड टीका झाली. प्रत्यक्षात त्यांनी उघडपणे सत्य सांगितले, हीच यातील शिकवण होती.

४. औषधांच्या संशोधनासाठी प्राण्यांचे बलीदान देणाऱ्या आधुनिक वैद्यकशास्त्राहून भारतीय आयुर्वेद श्रेष्ठ !

ज्या ‘क्लिनिकल ट्रायल’विषयी आधुनिक वैद्यकांत बडेजाव मिरवून ‘आपण किती विज्ञाननिष्ठ आहोत’, हे सांगितले जाते, त्याचविषयी असलेली ही काळी बाजू का बरे दाखवली जात नाही ? या ‘ट्रायल्स’मध्ये जे प्राणी मारले जातात, त्यांना ‘हुतात्मा’ (सॅक्रिफाईड) अशी गोंडस संज्ञा वापरली जाते. आपल्या लाभासाठी प्राण्यांचे बलीदान देणे, ही स्वार्थाची परिसीमाच नव्हे का ? याउलट ज्या आयुर्वेदात सहस्रो वर्षांपूर्वी तत्कालीन वैज्ञानिक असलेल्या आणि सर्व प्राणीमात्रांची काळजी घेणाऱ्या ऋषींनी जी औषधे निर्माण केली, त्यांना ‘प्रयोगाने सिद्ध व्हा’, असे सांगणे हास्यास्पद आहे. असल्या प्रयोगांसाठी कोट्यवधी डॉलर्सचा चुराडा आणि कित्येक निष्पाप प्राण्यांचे बळी देण्याचे क्रौर्य आयुर्वेद करत नाही, यासाठी त्याला धन्यवादच द्यायला हवेत !

५. औषधांच्या दुष्परिणामांमुळे रुग्णांच्या होणाऱ्या हानीकडे आधुनिक वैद्य आणि औषध आस्थापने यांनी दुर्लक्ष करणे

आपल्या मनात स्वाभाविकपणे प्रश्न येतो की, अशा सगळ्या परिस्थितीमध्ये एखाद्या औषधाचे दुष्परिणाम यापूर्वी वर्णन केलेल्या पायरी क्रमांक ४ मध्ये जेव्हा दिसतात, तोपर्यंत ज्या रुग्णांनी त्या औषधाचे सेवन केले आहे, अशांचे  काय ? त्यांच्या आरोग्याच्या झालेल्या हानीला नेमके उत्तरदायी कोण ?; मात्र असे प्रश्न विचारायचे नसतात; कारण त्यावर आधुनिक वैद्य (डॉक्टर) ते औषध निर्माण करणारी आस्थापने अशा सगळ्यांचीच ‘अळीमिळी गुपचिळी’ असते.

‘रॅनिटिडीन’च्या संदर्भात नेमके हेच घडले आहे. त्यातील एखाद्या घटकाने कर्करोग होतो अथवा नाही, याविषयी अधिक संशोधन होईल; मात्र ‘आताच्या स्थितीला तसे असू शकते’, असे म्हणण्यास बऱ्यापैकी वाव आहे. एकवेळ आपण असेही धरून चालू की, हे दुष्परिणाम सांख्यिकीच्या भाषेत दुर्लक्षित ठेवण्याजोगे असतील. त्या औषधाचे सुपरिणाम पहाता दुष्परिणाम हे अगदी दुर्लक्ष करण्याजोगे असल्याचा नेहमीचा युक्तीवादही मांडला जाईल किंवा या प्रकारात समांतर इजा किंवा ‘कोलेटरल डॅमेज’ (अनुषंगिक हानी) होतच असते, असेही सांगितले जाईल. जेव्हा जिवाचा प्रश्न येतो, तेव्हा १ आकडाही महत्त्वाचा नसतो का ? याचे प्रामाणिक उत्तर हा युक्तीवाद करणाऱ्यांनी द्यावे. आयुर्वेद असो वा ‘ॲलोपॅथी’, प्रत्येक वैद्यकशास्त्राचे महत्त्व हे वादातीत आहे. त्यामुळे या पॅथीयुद्धात शिरण्याचा आमचा कोणताही हेतू नाही; मात्र ज्या वेळी आयुर्वेदाच्या विरुद्ध कुठलाही आधार नसलेले आणि दिशाभूल करणारे लेख हेतूपुरस्सर लिहून आपले उखळ पांढरे करण्याचा प्रयत्न काही आधुनिक वैद्यकीय पदवीधर करत असतात, त्याच वेळी ‘क्लिनिकल ट्रायल फेज फोर’ याविषयी मात्र त्यांचे सातत्यपूर्ण मौन हेच त्यांच्या हेतूंविषयी सारे काही सांगून जाते. आपल्यावर येणारा प्रकाशझोत टाळायचा असल्यास तो अन्य कोणा निष्पापावर ढकलावा लागतो, हेच एक क्रूर वास्तव आहे !’

– वैद्य परीक्षित शेवडे, आयुर्वेद वाचस्पति, डोंबिवली.

(साभार : दैनिक ‘तरुण भारत’, ६.१०.२०१९)