स्मारकासमवेत विचारांचे आचरण हवे !

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे अनावरण
(प्रतिकात्मक चित्र)

नुकतेच नेर, जिल्हा यवतमाळ येथे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे अनावरण करण्यात आले. अशा प्रकारे ठिकठिकाणीच महापुरुषांची अनेक स्मारके उभारण्यात आली आहेत. महापुरुषांची स्मारके, पुतळे उभारले जाणे आवश्यकच आहे; परंतु त्यांच्या स्मारकांची किंवा पुतळ्यांची देखभाल ज्या पद्धतीने व्हायला हवी, तशी नियमित आणि योग्य पद्धतीने होतांना दिसत नाही, हे दुर्दैवी आहे. अनेक ठिकाणी स्मारकाभोवती काटेकुटे, कचरा, सांडपाणी, पाण्याच्या रिकाम्या बाटल्या अस्ताव्यस्त पडलेल्या दिसतात. काही ठिकाणी स्मारकाच्या ओट्यावर भिकारी ठाण मांडून बसलेले, तर काही मोठ्या शहरांत ही स्मारके तरुणांच्या जुगाराचे अड्डे बनलेले दिसतात. हे सर्व पाहिल्यानंतर स्मारके याचसाठी बांधली जातात का ? असा प्रश्न पडतो.

स्मारके उभारल्यानंतर त्यांची देखभाल करणे, हे त्या महापुरुषांच्या अनुयायी, प्रशासन आणि जनता यांचे कर्तव्य आहे. खरेतर जी स्मारके सध्या आहेत, त्यांच्याच स्वच्छतेविषयीचे सुनियोजन करणे आवश्यक असतांना कुणाचेही नवीन स्मारक उभारतांना विचार व्हायला हवा. स्मारक हे त्या व्यक्तीचे विचार सतत स्मरणात राहून त्याप्रमाणे आचरण करण्यासाठी आपण बांधतो. प्रत्यक्षात ‘हा हेतू साध्य होतांना दिसत नाही’, असे खेदाने म्हणावे लागत आहे. सध्या केवळ महापुरुषांच्या जयंतीला किंवा पुण्यतिथीला त्यांचे स्मरण केले जाते, असेच आहे.

आज हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रखर हिंदुत्वनिष्ठ विचारांची आवश्यकता आहे. भारतामध्येच नव्हे, तर जगाच्या पाठीवर हिंदूंवर होणारे अत्याचार, हिंदु देवतांचे होणारे विडंबन, प्रत्येक ठिकाणीच हिंदूंना दिली जाणारी दुय्यम वागणूक, ही संतापजनक आणि चिंताजनक आहे. या सर्व गोष्टींवर उपाययोजना काढायची असल्यास सर्व हिंदूंना हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार अभ्यासून त्यानुसार आचरण करणे आवश्यक आहे. हिंदुत्व हेच सर्व हिंदूंना एकत्र बांधून ठेवणारे आहे आणि प्रसंगी हिंदूंचे रक्षणही करणारे आहे. सर्वच थोर क्रांतीकारक किंवा महापुरुष असो त्यांचे विचार सर्वांनाच प्रेरणादायी आहेत. देश आणि धर्म संकटात असतांना प्रत्येक नागरिकाने आपल्या विचारांमध्ये काय पालट करायला हवेत, हे महापुरुषांच्या शिकवणीतून लक्षात घेऊन त्याप्रमाणे कृती करणे आवश्यक आहे.

– श्रीमती धनश्री देशपांडे, गोवा.