‘ड्रोन स्ट्राईक’द्वारे पिंपरी (पुणे) येथे हातभट्टीवर धाड !

पोलिसांनी एकाच ठिकाणी उभे राहून केली गावाची टेहाळणी

प्रतिकात्मक छायाचित्र

पिंपरी (पुणे) – आळंदी पोलीस ठाणे हद्दीतील कोयाळी गावात ड्रोनच्या साहाय्याने कारवाई करण्यात आली. झाडाझुडुपांमध्ये भीमा नदीकाठी असलेल्या गावठी हातभट्ट्यांवर धाड टाकून अंदाजे १० लाख रुपये किमतीचे २० सहस्र लिटर कच्चे रसायन नष्ट केले आहे.

नदीकाठी अथवा झोपडपट्ट्यांमधील अवैध धंद्यांवर टाच आणण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी प्रथमच ड्रोनचा वापर करून ही पहिलीच मोठी कारवाई केली. या ‘ड्रोन स्ट्राईक’मुळे आता अवैध धंदेवाल्यांवर वचक बसणार आहे. आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोयाळी गावात गावठी हातभट्ट्या मोठ्या प्रमाणात चालतात, अशा तक्रारी वाढत होत्या. यासाठी पोलिसांनी अनेकदा प्रत्यक्षात जाऊन पाहणी केली; पण पोलिसांना या गावठी हातभट्ट्या दिसून येत नव्हत्या. पोलीस गावात येऊन गेलेत, हे समजताच हातभट्टीमालक एखादे दिवस दारू विक्री बंद ठेवायचे आणि पुन्हा चालू करत होते. यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी पोलिसांनी ‘ड्रोन स्ट्राईक’चा वापर केला. यामुळे शहर आणि लगतच्या ग्रामीण भागातील अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत.