गोव्यात २० टक्के मृत्यू हे मद्यप्राशनामुळे ! – डॉ. शिवानंद बांदेकर, अधिष्ठाता, गोवा वैद्यकीय महाविद्यालय

गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता (‘डीन’) डॉ. शिवानंद बांदेकर

पणजी, १० ऑक्टोबर (वार्ता.) – गोव्यात २० टक्के मृत्यू हे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या मद्यप्राशनामुळे होत असतात, अशी धक्कादायक माहिती गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता (‘डीन’) डॉ. शिवानंद बांदेकर यांनी दिली. एका तारांकित हॉटेलमध्ये आयोजित केलेल्या महाराष्ट्र अस्थिरोगतज्ञ संघटनेच्या परिषदेत अधिष्ठाता डॉ. शिवानंद बांदेकर बोलत होते. या वेळी पद्मश्री पुरस्कार विजेते डॉ. अभय बंग यांची विशेष उपस्थिती होती.

अधिष्ठाता डॉ. शिवानंद बांदेकर पुढे म्हणाले, ‘‘राज्यात प्रत्येक मासाला होणार्‍या मृत्यूंपैकी १५ ते २० जण यकृताच्या समस्येने पीडित असल्याचे आकडेवारीवरून लक्षात येते. मद्यप्राशनाच्या व्यसनामुळे यकृत बिघडून रुग्ण दगावतात, तर मद्यप्राशनामुळे वादविवाद, भांडणे, हत्या आणि अपघात होणे, असे प्रकार होत असतात. प्रत्येक मासाला नोंद होणार्‍या सुमारे १२० मृत्यूंपैकी २५ ते ३० मृत्यू हे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या मद्याच्या सेवनामुळे होत असतात. यामुळे मद्यविक्रीला काही अंशी आळा घालणे किंवा बंदी घालणे आवश्यक आहे. यांमुळे गोव्यात होणारे अनेक मृत्यू टळू शकतात.’’

(प्रतिकात्मक चित्र)

गुजरातप्रमाणे गोव्यातही दारूबंदी करा ! – डॉ. अभय बंग, पद्मश्री पुरस्कार विजेते

डॉ. अभय बंग

१५ ते ५० वर्षे वयोगटातील व्यक्तींच्या हत्येसाठी दारू हा सर्वांत मोठा घटक उत्तरदायी आहे. महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यात गेल्या ३५ वर्षांपासून दारूबंदीचे पालन केले जात आहे. ही बंदी देशभरात सर्वाधिक कालावधीसाठी लागू असलेली बंदी आहे. गोव्याला पर्यटन आणि दारू यांमुळे किती लाभ होतो आणि किती हानी होते हे सरकार अन् नागरिक यांनी निश्चित केले पाहिजे. गोवा सरकारने गुजरात राज्याच्या धर्तीवर गोव्यात दारूबंदी घोषित करावी आणि पूर्ण बंदी शक्य नसेल, तर किमान मद्यविक्रीवर निर्बंध लादावेत. गोव्यातील मद्यालये आणि घाऊक मद्यविक्रीची दुकाने यांची संख्या घटवली पाहिजे. रात्री १० वाजल्यानंतर सर्व मद्यालये बंद असणे आवश्यक आहे. वाहनचालकांची मद्यप्राशनाला अनुसरून सक्तीने चाचणी केली पाहिजे. पर्यटनस्थळाच्या नावाने मद्यप्राशनाला मुक्तहस्त देऊन लोकांच्या जिवाशी खेळू नये.’’

संपादकीय भूमिका

  • पर्यटन वाढीसाठी आणि महसूलप्राप्तीसाठी आतापर्यंतच्या सर्व शासनांनी मद्यालयांना मुक्तहस्त दिला आहे; पण त्याचा परिणाम मात्र गोमंतकियांना भोगावा लागत आहे !
  • देहलीतही आपच्या शासनाने मद्यालयांवरील कर अल्प करून मद्यप्राशनाला प्रोत्साहन दिले आहे. त्यामुळे मद्यप्राशनाचे हे दुष्परिणाम नागरिकांसमवेत शासनालाही लक्षात येणे आवश्यक आहे.