‘सनातनचे सोलापूर येथील सेवाकेंद्र १० माळ्यांच्या इमारतीत दुसर्या माळ्यावर आहे. हे सेवाकेंद्र ४ सदनिकांचे (फ्लॅटचे) आहे. सद्गुरु स्वाती खाडये यांनी या सेवाकेंद्राला ‘कृष्णकुंज’ हे नाव दिले आहे. या सेवाकेंद्राविषयी जाणवलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे पुढे दिली आहेत.
१. सेवाकेंद्रातील चैतन्यामुळे बाजूच्या परिसरातून होणारा त्रास थोड्याच कालावधीत उणावणे
‘कृष्णकुंज’, हे नाव उच्चारल्यावर आम्हाला इथे गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले) कृष्णरूपात आणि सर्व साधक गोप-गोपींच्या रूपात असल्याचे जाणवते. सेवाकेंद्राच्या इमारतीमागे पुष्कळ मोठी झोपडपट्टी आहे. आरंभी सर्व साधक सेवाकेंद्रात रहाण्यास आल्यावर झोपडपट्टीतील घरांमधून मोठमोठ्याने भांडणाचा आणि रडण्याचा आवाज येत असे. हिंदी सिनेमातील गाणीही सतत मोठ्या आवाजात लावलेली असायची. १ मासानंतर गाण्यांचा आवाज हळूहळू न्यून झाला, तसेच ४ – ५ मासांनी भांडणाचा आणि रडण्याचा आवाजही न्यून झाला.
२. सेवाकेंद्रातील चैतन्य ग्रहण करण्यासाठी झाडाच्या फांद्याही सेवाकेंद्राच्या बाजूने झुकणे
सेवाकेंद्रातील ध्यानमंदिराच्या समोरील आगाशीच्या (गॅलरीच्या) बाहेर कडूनिंबाचे झाड आहे. त्या झाडाच्या सर्व फांद्या सेवाकेंद्राच्या दिशेनेच वाढत आहेत. ती प्रत्येक फांदी, म्हणजे एकेक दिव्यात्मा आणि ऋषि असल्यासारखेच वाटते. जणू त्यांना आगाशीतून गुरुदेवांचे दर्शन होते; म्हणून ‘त्या भगवंतभेटीच्या ओढीने त्याच बाजूने वाढत आहे’, असे मला वाटते.
३. सेवाकेंद्रातील भांडी धुण्याच्या ठिकाणी तेथील पाणी तीर्थ म्हणून पिण्यासाठी आणि पडलेले अन्नाचे कण प्रसाद म्हणून ग्रहण करण्यासाठी ४ – ५ चिमण्या येणे आणि ‘त्या कृतज्ञताभावात आहेत’, असे जाणवणे
सकाळी ९.३० ते १० या वेळेत साधक सेवाकेंद्रातील बैठककक्षात नामजप करण्यासाठी बसतात. त्या वेळी आगाशीतील भांडी धुण्याच्या ठिकाणी ४ – ५ चिमण्या पाणी पितात आणि अल्पाहारातील पडलेले अन्नाचे कण खातात. तेव्हा जणू ‘त्या सेवाकेंद्रातील तीर्थ-प्रसाद मिळाल्याने त्या कृतज्ञताभावात आहेत’, असे मला जाणवते.
४. सद्गुरु स्वातीताई ज्या खोलीत रहातात, त्या खोलीच्या आगाशीत आणि खिडकीत चिमण्या येऊन पुष्कळ वेळ चिवचिव करत असतात. तेव्हा ‘जणू त्या गुरुकीर्तनच करत आहेत’, असे मला जाणवते.
५. कोरोना प्रतिबंधक नामजप मोठ्याने केल्याने त्या नामजपातील आध्यात्मिक ऊर्जेचा लाभ सर्वांना होत असल्याचे जाणवणे
कोरोना महामारीच्या काळात सद्गुरु स्वातीताईंनी प्रतिदिन १ घंटा बसून सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेला ‘३ वेळा श्री दुर्गादेव्यै नमः । १ वेळ श्री गुरुदेव दत्त । ३ वेळा श्री दुर्गादेव्यै नमः । १ वेळ ॐ नमः शिवाय ।’ हा नामजप वैखरीतून करण्यास सांगितले होते. त्या नामजपाचा आवाज इमारतीत सर्वांत वरच्या माळ्यापर्यंत जायचा. अनेक जणांना ‘त्या नामजपात पुष्कळ शक्ती आहे’, असे जाणवायचे. त्या आध्यात्मिक ऊर्जेचा लाभ सर्वांना होत असल्याचे जाणवले.’
– (पू.) कु. दीपाली मतकर (वय ३३ वर्षे), सोलापूर सेवाकेंद्र, सोलापूर. (१.७.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या आणि संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |