रशियाला क्रिमियाशी जोडणार्‍या कर्च स्ट्रेट पुलावर भीषण स्फोट

मॉस्को (रशिया) – रशियाने काही वर्षांपूर्वी कह्यात घेतलेल्या क्रिमियाला जोडणार्‍या कर्च स्ट्रेट पुलावर झालेल्या स्फोटात मालवाहू रेल्वेचे काही डबे जळून राख झाले, तर पुलाचा काही भागही कोसळला. ही दुर्घटना होती कि युक्रेनने केलेले आक्रमण, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

क्रिमियातील रशियाच्या सैन्याला रसद पुरवण्यासाठी कर्च स्ट्रेट पुलाचा अत्यंत महत्त्वपूर्ण वापर केला जात होता. त्यामुळे रशियाच्या सैन्याची रसद बंद करण्यासाठी युक्रेनने हे आक्रमण केल्याचा दावा केला जात आहे. या स्फोटानंतर एका मालवाहू रेल्वेला आग लागली. त्यानंतर पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली. रशियाने वर्ष २०१४ मध्ये युक्रेनच्या क्रिमियावर नियंत्रण मिळवले होते. विशेष म्हणजे युक्रेनने हा पूल उडवून देण्याचा आतापर्यंत अनेकदा प्रयत्न केला; मात्र ते अपयशी ठरले. रशियाने या पुलाच्या सुरक्षेसाठी हवाई आणि सागरी सुरक्षा दल तैनात केले होते. रात्रंदिवस या पुलाच्या सुरक्षेची काळजी घेतली जात होती.