आपण पाश्चिमात्यांकडून शिकलो, हे चुकीचे आहे ! – अमीश त्रिपाठी, प्रख्यात लेखक

अमीश त्रिपाठी

पुणे – आपण मागासलेलो होतो आणि पाश्चिमात्यांनी येऊन आपला विकास केला, असे पाश्चिमात्यच आपल्याला सांगतात. आपण त्यांच्यावर विश्वास ठेवला; पण ते खरे नाही. आपण पूर्वीपासूनच उदारमतवादी आहोत. आपली संस्कृती अतिशय समृद्ध होती. ज्या गोष्टी आपण पाश्चिमात्यांकडून शिकलो, असे सांगितले जाते, त्या खरेतर आपल्याकडे पूर्वीपासूनच होत्या. आपल्याला त्याचे विस्मरण झाले असून संस्कृतीचे आणि इतिहासाचे पुनरुज्जीवन करणे आवश्यक आहे, असे मत प्रख्यात लेखक अमीश त्रिपाठी यांनी व्यक्त केले. ते त्यांच्या ‘वॉर ऑफ लंका’ (लंकेचे युद्ध) या पुस्तकाचे प्रकाशन औंध येथील ‘क्रॉसवर्ल्ड’मध्ये झाले. त्या वेळी ते बोलत होते. त्रिपाठी यांच्या ‘रामचंद्र’ पुस्तक मालिकेतील हे ४ थे पुस्तक आहे. ते पुढे म्हणाले की, भारतीय संस्कृतीमध्ये चांगले आणि वाईट अशी सोपी विभागणी करता येत नाही. देव नायक आणि असुर खलनायक, असे चित्रण कुठेच नाहीच. आपले काम हेच आहे की, या कथा समजून घ्याव्यात, त्यापासून शिकावे, प्रत्यक्ष जीवनात शिकलेल्या गोष्टींची कार्यवाही करावी आणि त्याच्या परिणामांनाही सामोरे जावे. आयुष्यातील प्रत्येक निर्णयाचे स्वातंत्र्य आपली संस्कृती देते.