संतपिठांची आवश्यकता !

पैठण येथील ‘संत एकनाथ महाराज संतपिठ’

पैठण येथील ‘संत एकनाथ महाराज संतपिठा’तील प्रमाणपत्र अभ्यासक्रमासाठी १५३ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. संतपिठाची प्रवेश क्षमता १०० असतांना अधिकच्या ५३ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला, ही गोष्ट सकारात्मकता दर्शवते. यातून संतपिठांची संख्या वाढवायला लागेल, असेच दिसत आहे. वर्ष २०२१ पासून चालू झालेल्या संतपिठात विविध ५ प्रमाणपत्रांचा अभ्यासक्रम चालू करण्यात आला आहे. पाश्चात्त्य विकृतीचा प्रचंड प्रभाव, अन्याय, अत्याचार, खून, भ्रष्टाचार, बलात्कार, महामारी, निराशा, जीवघेणी स्पर्धा आणि मोडकळीस आलेली कुटुंबव्यवस्था यांमुळे समाजाची मानसिक स्थिती अत्यंत बिकट झाली आहे. अशा परिस्थितीमध्ये मनःशांती मिळण्यासाठी संत वाङ्मय, संत चरित्र आणि संतांची शिकवण हीच सामान्य मनुष्याला योग्य पथावर मार्गक्रमण करण्यासाठी मार्गदर्शक ठरू शकते.

‘बिकट परिस्थितीत मनोबल टिकून रहावे’, यासाठी संतांची शिकवणच उपयोगी पडते, हे सत्य आहे. संतपिठात संतांचे वाङ्मय अभ्यासण्यासाठी तरुणवर्ग आकर्षित होत आहे, हे खरोखरच आनंदाचे आहे. विद्यापिठाने वरील अभ्यासक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष संतांची शिकवण आचरणात आणण्याच्या दृष्टीने शिक्षित करणे आवश्यक आहे. संतांच्या शिकवणीनुसार आचरण केल्याने सामान्य मनुष्यही कशा प्रकारे आनंदी आणि स्थिर राहू शकतो, हे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष साधना शिकवून पटवून देणे आवश्यक आहे. संत वाङ्मयाकडे एक अभ्यासक्रम म्हणून न बघता सुदृढ समाजमन घडवण्याचे माध्यम या दृष्टीने बघणे अत्यंत आवश्यक आहे. अभ्यासक्रमात विषय अंतर्भूत करण्याच्या दृष्टीने धर्माधिकारी, संत आणि हिंदु धर्माचे गाढे अभ्यासक यांचे मार्गदर्शन उपयोगी पडेल.

भारताला आध्यात्मिक वारसा आहे. संतपिठांच्या माध्यमातून तो पुढेही जपला जाईल, हे नक्की ! एकेकाळी महासत्ता असणारा भारत निधर्मी शासनप्रणालीमुळे आध्यात्मिक विचारांपासून दूर गेला. परिणाम स्वरूप समाजामध्ये ताणतणाव वाढला. सर्वत्र अस्थिरता निर्माण झाली. विदेशातील जिज्ञासू भारतात येऊन संत साहित्याचा अभ्यास करून तो आचरणात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. भारतियांनाही निधर्मीपणाच्या मागे न लागता आध्यात्मिक सामर्थ्याचे महत्त्व लक्षात घेऊन स्वतःचे जीवन आध्यात्मिकदृष्ट्या सक्षम करणे आवश्यक आहे. यासाठी स्वतःच धर्मशिक्षण घेऊन ते आचरणात आणणे आवश्यक आहे !

– श्रीमती धनश्री देशपांडे, गोवा.