‘आदिपुरुष’ चित्रपटावर बंदी घाला ! – श्रीराम मंदिराचे मुख्य पुजारी सत्येंद्र दास यांची मागणी

उजवीकडे पुजारी सत्येंद्र दास

अयोध्या (उत्तरप्रदेश) – ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ या रामायणावर आधरित चित्रपटाचा टीझर (चित्रपटाचा संक्षिप्त भाग) प्रदर्शित झाल्यानंतर त्यावर टीका होत आहे. याविषयी आता अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीवर बांधण्यात येणार्‍या श्रीराम मंदिराचे मुख्य पुजारी सत्येंद्र दास यांनीही टीका करत या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

१. पुजारी सत्येंद्र दास म्हणाले की, प्रभु श्रीराम, हनुमान आणि रावण या तिघांनाही या चित्रपटात चुकीच्या पद्धतीने चित्रित करण्यात आले आहे. ‘आदिपुरुष’ची निर्मिती करतेवेळी दिग्दर्शक ओम राऊत यांनी प्रभु श्रीराम आणि हनुमान यांना महर्षि वाल्मीकिरचित रामायण या महाकाव्यातील उल्लेखाप्रमाणे दाखवलेले नाही. हा त्यांचा अपमान आहे. त्यामुळे आदिपुरुषवर बंदी आणावी, अशी मागणी आम्ही करत आहोत.

२. या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार यांनी केली आहे. यावर ५०० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. हा चित्रपट हिंदी आणि तेलुगू अशा २ भाषांमध्ये चित्रित करण्यात आला आहे. तसेच तमिळ, मल्याळम् आणि कन्नड या भाषांमध्ये भाषांतरित करून प्रदर्शित केला जाणार आहे. पुढील वर्षी १२ जानेवारी २०२३ या दिवशी प्रदर्शित होणार आहे.