विविध कायद्यांच्या आधारे काशीविश्वनाथ मंदिर प्रकरणात हिंदूंची बाजू भक्कम ! – अधिवक्ता विष्णु शंकर जैन, हिंदु पक्षाचे अधिवक्ता

‘१८ ऑगस्ट २०२१ या दिवशी ५ हिंदु महिलांनी ज्ञानवापी परिसरातील शृंगारगौरीदेवीची प्रतिदिन पूजा करण्याची अनुमती मिळवण्यासाठी दिवाणी न्यायालयात याचिका प्रविष्ट केली. या संदर्भातील याचिकेवर मुसलमान पक्षाने आक्षेप घेतल्यानंतर हा खटला चालवण्यात यावा कि नाही ? यावर १२ सप्टेंबर २०२२ या दिवशी जिल्हा न्यायालयाने ‘हा खटला चालवण्यास योग्य आहे’, असा निर्णय दिला. या संदर्भात ‘टाइम्स नाऊ नवभारत’ वृत्तवाहिनीशी बोलतांना शृंगारगौरीदेवी खटल्यातील ‘हिंदु पक्षा’चे अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांनी मांडलेले विचार येथे देत आहोत.

काशी विश्वनाथ आणि मंदिराच्या शेजारी असलेली ज्ञानवापी मशीद

१. ज्ञानवापी मशीद ६०० वर्षांपासून असेल, तर काशीविश्वनाथाचे मंदिर सृष्टीच्या आरंभापासून असल्याचा दावा न्यायालयात मांडणे

ज्ञानवापी मशीद प्रकरणी मुसलमानांच्या पक्षाच्या वतीने करण्यात आलेल्या युक्तीवादात ‘ज्ञानवापी मशीद ही ६०० वर्षांपासून आहे. ती आलमगीरची मशीद औरंगजेबाने बनवली होती’, असे म्हटले आहे. या युक्तीवादाची न्यायालयाने नोंद घेतली आहे. यापूर्वी काशीविश्वनाथच्या खटल्यातील पक्षकार दीन महंमद यांना दिलेल्या निकालामध्ये ‘हिंदु मंदिर पाडून तेथे मशीद बांधण्यात आली. त्यामुळे ती कधीही अधिकृत मशीद होऊ शकत नाही’, असे म्हटले आहे.

सर्वाेच्च न्यायालयाने राममंदिर खटल्यात अन्य एका खटल्याचा दिशानिर्देश देतांना म्हटले होते, ‘त्या वेळेच्या राजांनी जर चुकीचे काम केले असेल आणि सध्याच्या राजाने ते मान्य केले, तर ते १९८३ कायद्यानुसार ते ‘कव्हर’ (स्वीकार) होऊ शकते आणि त्याला अनुचित ठरवता येऊ शकते.’ त्यामुळे ज्याप्रमाणे मुसलमान पक्षाचा दावा आहे की, तेथे ६०० वर्षांपासून मशीद आहे. त्याचप्रमाणे आमचाही दावा आहे की, त्या पूर्वीपासून तेथे हिंदूंचेच मंदिर आहे. जेव्हापासून ही सृष्टी अस्तित्वात आली, तेव्हापासून त्या ठिकाणी मंदिर आहे. साक्षात् भगवान शिवाने प्रकट होऊन तेथे स्वयंभू ज्योतिर्लिंग निर्माण केले आहे आणि ते ५ कोसापर्यंत पसरले होते. हिंदूंसाठी काशीचे तेवढेच महत्त्व आहे, जेवढे अयोध्या आणि मथुरा यांचे आहे. हिंदूंसाठी काशी ही आध्यात्मिक प्रगती, ज्ञान आणि मुक्ती मिळवण्याविषयीचे केंद्र आहे. काशीची प्रत्येक इंच भूमी आणि विशेषत: ज्या ठिकाणी भगवान शिवाने प्रकट होऊन स्वयंभू ज्योतिर्लिंग बनवले आहे, ते आमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहे. यासाठीच न्यायालयात याचिका प्रविष्ट करण्यात आली आहे.

अधिवक्ता विष्णु शंकर जैन

२. सर्वाेच्च न्यायालयाच्या एका निकालपत्रात औरंगजेबाने काशीविश्वनाथ मंदिर तोडल्याचा स्पष्ट उल्लेख आढळणे

सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार ‘येथील मंदिर तोडण्यात आले आहे’, हे सिद्ध झाले आहे. मा. न्यायमूर्ती रामास्वामी यांचे निकालपत्र आहे की, ज्यात ‘काशीविश्वनाथ ॲक्ट १९८३’ च्या घटनात्मक वैधतेला आव्हान देण्यात आले होते. त्यात पहिल्या स्तंभात औरंगजेबाने हे मंदिर तोडल्याचा स्पष्ट उल्लेख आहे. औरंगजेबाने मंदिर तोडण्यापूर्वी मंदिर कधी बांधले ? ते कधी तोडले ? याविषयी संपूर्ण वर्णन त्यात देण्यात आले आहे. ते कुणीही वाचू शकतो. सर्वाेच्च न्यायालयाने त्यांच्या निकालपत्रात असेही म्हटले की, १२ ज्योतिर्लिंगांपैकी ५ स्वयंभू ज्योतिर्लिंगे आहेत. सर्वांत पहिले ज्योतिर्लिंग हे आदी विश्वनाथ ज्योतिर्लिंग आहे.

३. ज्ञानवापीच्या समोरच्या भागातच श्री गणेश आणि हनुमान यांच्या प्रतिमा असणे

मशिदीच्या पश्चिम भिंतीवर श्री शृंगारगौरीदेवीचा विग्रह आहे आणि तेथे १९९३ पर्यंत नियमित पूजा चालू होती. आमच्या याचिकेमध्ये आम्ही शृंगारगौरीदेवी, तसेच श्री गणेश आणि हनुमान यांचीही पूजा करण्याचा अधिकार मागितला आहे. काशीविश्वनाथ मंदिराचा परिसर पाहिला, तर लक्षात येईल की, मशिदीच्या कठड्याचे प्रवेशद्वार आहे, त्याच्या बरोबर समोर भगवान गणेश आणि हनुमान यांच्या प्रतिमा विराजमान आहेत. त्यापूर्वी त्या कठड्याच्या आत होत्या आणि आता ते कठड्याच्या बाहेर आहे.

४. ज्ञानवापीच्या जागेवरील एक अष्टमंडपाचे (आठ सभामंडपांचे) भव्य मंदिर तोडून तेथे मशीद उभारल्याचे विविध माध्यमांतून दिसून येणे

आतापर्यंत हिंदूंच्या ज्या अप्रत्यक्ष देवता वजूखान्याच्या (हात-पाय धुण्याच्या जागेत) घाणेरड्या पाण्यात दबलेल्या होत्या, त्या आज न्यायालयीन आयुक्तांच्या कारवाईनंतर प्रत्यक्षात बाहेर आलेल्या आहेत. त्यांच्याही पूजेचा अधिकार याचिकेद्वारे मागण्यात आला आहे. हे प्रकरण केवळ एकट्या शृंगारगौरीदेवीच्या पूजनाचे नाही. त्यामुळे मला म्हणायचे आहे की, ही इस्लामी कायद्यानुसार ती अधिकृत मशीद नाही; कारण त्या परिसरातील श्री व्यास यांच्या तळघरात संस्कृत श्लोक आहेत, तेथे हिंदु देवीदेवतांचे स्तंभ आहेत, भंग झालेल्या मूर्ती पडलेल्या आहेत. ज्ञानवापी मशिदीची दिनदर्शिका ज्या ठिकाणी लावण्यात आली आहे, त्याच्या खाली स्वस्तिकचे चिन्ह बनलेले आहे. तेथे त्रिशूळाचेही चिन्ह आहे. घुमटाच्या खाली हिंदु मंदिराचे कळस आहेत. या सर्व गोष्टी ओरडून ओरडून एकच गोष्ट सांगत आहेत की, या जागेवर एक अष्टमंडपाचे भव्य मंदिर होते. ते तोडण्यात आले किंवा त्याला मशिदीचा आकार देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

५. हिंदु कायद्यानुसार मंदिर हे देवतेच्या मालकीचे होणे आणि या आधारे ज्ञानवापीचा खटला लढला जाणे

‘हिंदु कायद्या’नुसार ‘एकदा मंदिर देवतेचे निहित (मालकीचे) होते, तेव्हा ते त्या देवतेचे होते आणि त्याला राजाही पालटू शकत नाही.’ जशी इस्लामी कायद्यानुसार एकदा वक्फची संपत्ती झाली, तर नेहमीसाठी ती वक्फची होते किंवा एकदा मशीद झाली, तर ती सृष्टीच्या अंतापर्यंत मशीदच रहाते; परंतु हिंदु कायदाही मान्य करावा लागेल. जेव्हा या दोन्ही कायद्यांमध्ये संघर्ष होईल, तेव्हा या मापदंडावर निवाडा होईल की, पूर्वीपासून कोण होते ? आणि कुणाचे मंदिर तोडण्यात आले ? त्यासाठीच आमचे प्रयत्न चालू आहेत; म्हणून न्यायालयानेही म्हटले आहे, ‘येथे ‘प्लेसेस ऑफ वर्शिप कायदा (प्रार्थनास्थळे विशेष कायदा)’ आणि ‘वक्फ कायदा’ लागू होत नाही.’ आपल्याला ‘काशी विश्वनाथ ॲक्ट’ हा सर्व प्रकारच्या युक्तीवादाला साहाय्य करतो. या सूत्रांच्या आधारे आम्हाला आमची (हिंदूंची) आध्यात्मिक, धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा यांची पुनर्स्थापना करायची आहे. त्यासाठीच हे प्रयत्न चालू आहेत.’

– अधिवक्ता विष्णु शंकर जैन, शृंगारगौरीदेवी खटल्यातील हिंदु पक्षाचे अधिवक्ता, सर्वाेच्च न्यायालय (१३.९.२०२२)