शिंदे गटात सहभागी होत नसल्याने माजी नगरसेवकाला ठार मारण्याची पोलीस उपायुक्तांची धमकी !

नवी मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये सहभागी होत नसल्याने नवी मुंबई परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी मला खोट्या चकमकीमध्ये ठार मारण्याची धमकी दिली आहे, असा खळबजनक आरोप माजी नगरसेवक मनोहर मढवी यांनी वाशी येथे केला आहे. ते शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात आयोजित पत्रकार परिषद बोलत होते. या वेळी खासदार राजन विचारे, नवी मुंबईचे जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे आणि द्वारकानाथ भोईर उपस्थित होते.

या वेळी मढवी म्हणाले की, शिंदे गटात सहभागी व्हावे, यासाठी माजी नगरसेवक विजय चौगुले, माजी आमदार संदीप नाईक यांनी एका महिलेद्वारे माझ्यावर खोट्या तक्रारी केल्या आहेत. त्याचप्रमाणे माझ्यावरील जुने गुन्हे उकरून त्यांद्वारे आपणास तडीपार करण्याची प्रक्रिया चालू केली आहे. यामध्ये विवेक पानसरे यांनीही मला त्यांच्या कार्यालयात बोलावून ‘तुम्हाला शिंदे गटात जावे लागेल’, असे सांगून १० लाख रुपयांचीही मागणी केली. ‘हे मान्य न केल्यास खोट्या चकमकीत ठार मारू’, अशी धमकी दिली आहे. त्यामुळे भविष्यात माझे आणि माझ्या परिवाराचे काही वाईट झाले, तर याला वरील सर्वजण उत्तरदायी असणार आहेत. आम्हाला न्याय न मिळाल्यास या मानसिक छळामुळे आमचे पूर्ण कुटुंब उपायुक्त कार्यालयासमोर पेट्रोल ओतून घेऊन आत्महत्या करेल. या प्रकरणी उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय या ठिकाणी याचिका प्रविष्ट करणार आहोत.

राजन विचारे यांनी सांगितले की, ठाणे, कल्याण, नवी मुंबई येथे अशा प्रकारे पोलिसांच्या माध्यमातून शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांना खोट्या गुन्ह्यांत अडकवण्याची, तसेच प्रत्यक्ष गुन्हे नोंद करून शिंदे गटात दबाव आणला जात आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी लक्ष घालून संबंधित अधिकार्‍यावर कारवाई करावी, अशी मागणी विचारे यांनी केली आहे. विठ्ठल मोरे यांनीही शिंदे गटात सहभागी व्हावे, यासाठी पोलिसांनी त्यांच्या बारवर धाड टाकून गुन्हा नोंद करण्याची धमकी दिली होती, असा आरोप त्यांनी केला.