महाराष्ट्रात लवकरच इयत्ता ५ वीपासून ‘शेती’ हा विषय शिकवला जाणार आहे. विशेषतः ग्रामीण भागांतील शाळेत शिकणारे बहुसंख्य विद्यार्थी ही शेतकर्यांचीच मुले आहेत. ‘पदवी, पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतरही नोकरी मिळत नाही. त्यामुळे विडलोपार्जित शेती विषयाची जाण व्हावी; म्हणून शेती विषय शिकवण्याचे नियोजन आहे. लहानपणापासूनच हा विषय शिकवला, तर त्याचे चांगले परिणाम दिसून येतील’, अशी माहिती राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली. कृषीप्रधान भारतात ‘शेती’ हा विषय दुर्लक्षित होत असतांना सरकारने घेतलेला हा निर्णय स्तुत्यच आहे.
या निर्णयामुळे शेती सुधारेल, पर्यायाने शेतकर्यांच्या आत्महत्या न्यून होतील. आधुनिक शेतीकडे कल वाढेल. गावातील सरकारी जागेत शेतीविषयीची प्रयोगशाळा उभारली जाणार आहे. शाळेतील शिक्षकांना काही दिवस प्रशिक्षण दिल्याने ते हा विषय अधिक चांगल्या प्रकारे शिकवू शकतील. कृषी आणि शिक्षण विभाग यांच्या संयुक्त समितीकडून सर्वांगीण विचार करून या विषयाचा अभ्यासक्रम सिद्ध केला जाणार आहे. फवारणी कशी करावी ? सरी कशी काढावी ? पेरणी कशी करावी ? खतांचा वापर कसा करावा ? आधुनिक तंत्राचा वापर कसा करावा ? याविषयीची सर्व माहिती मुलांना दिली जाणार आहे. आता मुले आणि शिक्षक यांनी या विषयाची आवश्यकता ओळखून याचा लाभ करून घ्यायला हवा, हे महत्त्वाचे !
कृषीप्रधान भारतामध्ये ‘शेती’ हा विषय सर्वच स्तरांवर दुर्लक्षित झाला. त्यामुळे एकेकाळी शेती व्यवसायातूनही सोन्याचा धूर निघणारा भारत मधल्या काळात त्यामध्ये पर्यायाने विकासामध्ये मागे पडला. यामुळे देशात बेरोजगारीचे प्रमाण वाढले, असेच म्हणावे लागेल. देशातील ७५ टक्के जनता पारंपरिक शेती व्यवसायावर अवलंबून आहे. त्यामुळे ‘शेती’ विषयाचा शालेय अभ्यासक्रमात समावेश झाल्यामुळे या व्यवसायामध्ये सुधारणा होईल, हे नक्की ! प्राचीन गुरुकुल शिक्षणपद्धतीत ज्याप्रमाणे १४ कला आणि ६४ विद्यांचे प्रशिक्षण देऊन बालकांचा सर्वांगीण विकास साधला जायचा, त्याचप्रमाणे आज मेकॉलेप्रणित शिक्षणपद्धती संपुष्टात आणून धर्माधिष्ठित शिक्षणपद्धती कार्यवाहीत आणणे आवश्यक आहे. भारतातील मुलांना कोणते शिक्षण द्यायला हवे ? हे लक्षात घेऊन तरुणांचा खर्या अर्थाने विकास होण्यासाठी अभ्यासक्रमामध्ये पालट करून तरुणाईला सर्वांगाने सक्षम करावे, हीच अपेक्षा !
– श्री. नीलेश पाटील, जळगाव