पुणे – राज्यातील खासगी महाविद्यालय जास्त शुल्क आकारत असल्याने शिक्षण महाग झाले आहे. प्राध्यापकांचे वेतन या शुल्कातून करत असल्याचे महाविद्यालयाचे म्हणणे आहे; मात्र सरकार खासगी महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या वेतनाचे दायित्व घेईल; पण त्यांनी शुल्क अल्प आकारावे, अशी भूमिका राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मांडली. ‘प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी’च्या मॉडर्न महाविद्यालयातील शैक्षणिक उपक्रमांचे उद्घाटन पाटील यांनी डिजिटल पद्धतीने केले, त्यानंतर ते बोलत होते.
या कार्यक्रमाला संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे यांच्यासह अध्यक्ष, कार्यवाह, सहकार्यवाह, आमदार सिद्धार्थ शिरोळे आदी उपस्थित होते. गुणवत्तापूर्ण शिक्षण स्वस्तात मिळणे आवश्यक आहे. अन्यथा शिक्षण हे काही जणांसाठीच मर्यादित राहील. महाविकास आघाडीच्या काळात शैक्षणिक धोरणाची कार्यवाही ठप्प होती; मात्र आता केंद्र सरकार धोरणाची कार्यवाही करेल, असे त्यांनी या वेळी सांगितले.