हेदूळ ग्रामस्थांनी शाळेला कुलूप लावल्यानंतर शाळेला मिळाला शिक्षक  !

मुख्याध्यापकांसह २ अधिकारी ६ घंटे राहिले कोंडून !

मालवण – तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, हेदूळ या शाळेत शिक्षक मिळावा, यासाठी संतप्त ग्रामस्थांनी २८ सप्टेंबर या दिवशी शाळेला कुलूप लावले. शाळेला शिक्षक मिळाल्याचा निर्णय मिळाल्यावर ग्रामस्थांनी शाळेचे कुलूप काढले. तोपर्यंत ६ घंटे शाळेचे मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख आणि विस्तार अधिकारी शाळेत कोंडून होते.

हेदूळ शाळेतील एक शिक्षक गेले ३ मास रजेवर गेले आहेत. त्यांच्या जागी शिक्षक द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी वारंवार केली होती. तरीही शिक्षक न दिल्याने ग्रामस्थ आणि पालक यांनी शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना बाहेर काढले आणि शाळेला कुलूप लावले. ‘विद्यार्थ्यांची शैक्षणिक हानी होत असल्याने शिक्षक मिळाल्याखेरीज आंदोलन मागे घेणार नाही’, अशी भूमिका पालकांनी घेतली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मालवणचे गटविकास अधिकारी आपासाहेब गुजर यांनी शाळेत जाऊन परिस्थिती समजून घेतली अन् शाळेसाठी शिक्षक उपलब्ध करून दिला. त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

संपादकीय भूमिका 

समस्या सहज सुटत असतांना प्रशासन जनतेच्या आंदोलनाची वाट का बघते ?