नवी मुंबई, २८ सप्टेंबर (वार्ता.) – नवी मुंबई महापालिकेच्या विकास आराखड्यावरील हरकती आणि सूचना सादर करण्याची मुदत ६० दिवसांनी वाढवण्यात येत असल्याचे महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांनी घोषित केले आहे. विकास आराखड्यातील तरतुदींविषयी बहुसंख्य नागरिक अनभिज्ञ असल्याने याविषयी हरकती आणि सूचना सादर करण्याची मुदत वाढवण्यात यावी, अशी मागणी आमदार गणेश नाईक यांनी आयुक्त बांगर यांच्याकडे केली होती. त्यानुसार त्यांनी हा निर्णय घेतला आहे.
आमदार नाईक म्हणाले की, शहराच्या विकासाला चालना देणारा विकास आराखडा महापालिकेने सिद्ध केला आहे; परंतु या विकास आराखड्यातील तरतुदींविषयी बहुसंख्य नागरिक अनभिज्ञ असल्याने आराखड्याची प्रत नागरिकांना सहज उपलब्ध होईल याकरिता सामाजिक माध्यमांवर ती उपलब्ध करून देण्यात यावी. या आराखड्यामध्ये नेमक्या काय तरतुदी आहेत, हे नागरिकांना समजले, तरच नागरिक सूचना करू शकतील.
वाढीव शिक्षकांची भरती करणे, पाणीटंचाईची समस्या दूर करणे, नेरूळ येथे खारफुटी क्षेत्रात इमारती बांधण्यास अनुमती न देणे, ठाणे-बेलापूर मार्गालगतची उपाहारगृहे बंद करणे, अवैधरित्या फेरीवाल्यांनी रस्ते आणि पदपथ बळकावणे आदी विषयांवर चर्चा करून कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी गणेश नाईक यांनी बांगर यांच्याकडे केली. याविषयी सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन बांगर यांनी दिले.