‘मॉल’मध्ये मद्यविक्रीला अण्णा हजारे यांचा विरोध !

सरकारने कार्यवाही न केल्यास आंदोलनाची चेतावणी

श्री. अण्णा हजारे (सौ. dnamarathi)

नगर – ‘मॉल’मध्ये मद्यविक्रीला ठेवणे, ही भारतीय संस्कृती नसून विदेशी संस्कृती आहे. त्यामुळे नको त्या गोष्टी होतात हे योग्य नाही. आमच्यापर्यंत याविषयी अजून काही आलेले नाही. आताचे सरकार ‘मॉल’मध्ये मद्यविक्रीचा विचार करणार नाही आणि जर तसे झाले तर पुन्हा आम्हाला आमच्या मार्गाने जावे लागेल, अशी चेतावणी अण्णा हजारे यांनी सरकारला दिली आहे. राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी पुण्यात बोलतांना ‘मॉल’मध्ये मद्यविक्रीच्या हरकती मागवत आहोत आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करू, असे वक्तव्य केले होते.

यापूर्वीही अण्णांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून या निर्णयाला विरोध दर्शवला होता. राळेगणसिद्धी येथे आंदोलनही केले होते; मात्र अण्णांच्या मागणीचा विचार करत सरकारने ‘या संबधी लोकांच्या हरकती मागवू’, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर अण्णा हजारेंनी आंदोलन मागे घेतले होते. त्यानंतर सत्तांतर झाले. आता पुन्हा हे सूत्र समोर आल्याने अण्णा हजारेंनी पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारला चेतावणी दिली आहे.