‘पुरुषोत्तम’ उत्तमच हवा !

काही दिवसांपूर्वी पुणे येथे ‘पुरुषोत्तम एकांकिका स्पर्धे’चे निकाल लागले. यंदाच्या वर्षी दर्जेदार नाटक नसल्याने पुरुषोत्तम करंडक कुणालाच दिला गेला नाही. उत्तम संहिता, दिग्दर्शन आणि अभिनय यांचे पुरस्कार दिले गेले नाहीत. एकाही संघाला पुरुषोत्तम करंडक न मिळण्याची पुरुषोत्तम एकांकीका स्पर्धेच्या इतिहासातील ही पहिलीच घटना आहे. या निकालाचे काहींनी स्वागत केले, तर काहींनी निकालावर खरपूस टीकाही केली. सामाजिक माध्यमांवर दोन्ही बाजूंनी म्हणजे समर्थनार्थ आणि विरोधाच्या प्रतिक्रिया लोकांनी व्यक्त केल्या.

पुरुषोत्तम स्पर्धेचा इतिहास

पुणे शहरातील ‘महाराष्ट्रीय कलोपासक’ ही संस्था महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी मराठी एकांकिकांची स्पर्धा घेते. स्पर्धेतील यशस्वी एकांकिकेला करंडक दिला जातो. ही स्पर्धा वर्ष १९६३ पासून चालू आहे. ‘महाराष्ट्रीय कलोपासक’चे चिटणीस पुरुषोत्तम रामचंद्र उपाख्य अप्पासाहेब वझे यांच्या स्मरणार्थ या करंडकाला ‘पुरुषोत्तम करंडक’ असे नाव देण्यात आले. राजाभाऊ नातू यांनी ‘महाविद्यालयीन तरुणांना नाटक करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध व्हावे’, या उद्देशाने ही स्पर्धा चालू केली. संगीत, प्रकाशयोजना, नेपथ्य यांच्याविनासुद्धा नाटक होऊ शकते; मात्र दर्जेदार लेखन, दिग्दर्शन आणि अभिनय यांना पर्याय नाही, हा तेव्हाचा स्पर्धा चालू करण्यामागे विचार होता. त्यामुळे ‘पुरुषोत्तम’मध्ये कधीही तांत्रिक गोष्टींसाठी गुण दिले जात नाहीत. या स्पर्धेने अनेक प्रथितयश कलाकार घडवले आहेत. या स्पर्धेतून कलाविश्वात पदार्पण केलेल्या अनेकांनी नाटक, चित्रपट, मालिका यांमध्ये कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. कडक शिस्त आणि चांगल्या आयोजनासाठी ही स्पर्धा ओळखली जाते.

नाटकांचा दर्जा ढासळणे

मराठी रंगभूमीला भारतात विशेष मान होता. रंगभूमीवर वावरणारे कलाकार, दिग्दर्शक, नेपथ्य करणारे सर्वच जण त्यांच्या क्षेत्रात उच्चतम होते. परिपूर्ण आणि दर्जेदार कलाकृती लोकांसमोर सादर करण्यासाठी ते खटपट करत असत. त्यामुळे त्या काळी प्रेक्षकही ‘नाट्यवेडे’ होते. आता हा दर्जा कुठेतरी घसरत चालला आहे. सध्याच्या कालखंडाचा विचार केला, तर सध्या अनेक नवीन मालिका दूरचित्रवाहिन्यांवर पहायला मिळतात. त्यात काही दिवसांआड नवीन कलाकारांचे चेहरे पहायला मिळतात. यू ट्युब, फेसबुक यांवर सर्वसामान्यांतील काही जण स्वत: अभिनयाचे छोटे व्हिडिओ बनवून ते प्रसारित करतात. त्यातून काहींचे मनोरंजनही होते. प्रेमप्रकरणांचे चित्रपट, ‘ॲक्शन’ चित्रपट, ‘ओटीटी प्लॅटफॉर्म’वरील मालिका तरुण पिढी पहात आहे. नाटकांचा तुलनात्मकदृष्ट्या प्रसार आणि त्याचा प्रेक्षकवर्गही अल्प आहे. नाटकांची स्वत:ची एक ओळख आहे, दर्जा आहे. नाटकाची संहिता लिहितांना तरुण पिढी वरील विविध कलामाध्यमांचा संदर्भ घेतेच ! त्यातून काही ‘हटके’ (वेगळे) करण्याची उर्मी जागृत होते आणि तिथेच दर्जा घसरायला प्रारंभ होतो. यंदाच्या परीक्षकांनी स्पर्धेत सहभागी एकांकिकांविषयी त्यांची मते नोंदवतांना नमूद केले, ‘यंदा सगळ्याच एकांकिकांच्या संहिता फसव्या, अर्धकच्च्या आणि प्रतिक्रियावादी वाटल्या. अलंकारणाचा प्रचंड सोस, आश्चर्यकारक अमानवी मतपरिवर्तने, सामाजिक प्रश्न-समस्या यांचा अन्वय न लावता त्यांच्या धक्कादायक भागाकडे असणारा अतिरेकी झुकाव, हे दोष सगळ्याच संहितांमध्ये होते. सगळ्याच एकांकिकांमध्ये कलाकारांचा ‘अभिनयाचा अभिनय’ बघायला मिळाला. बहुतांश दिग्दर्शनही खटकेबाज, चमत्कृतीप्रधान, कृतक (कृत्रिम) होते. त्यांना केवळ प्रेक्षकांना अचंबित, प्रभावित आणि चकीत करायचे होते.’ परीक्षकांच्या या निरीक्षणांमध्ये सगळे आलेच ! आणखी एका कलाकाराने एक वास्तववादी मत व्यक्त करतांना सांगितले की, सध्याची बहुतांश पिढी ही इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेते, परिणामी संवादफेक करणे, शुद्ध मराठीतील आणि ग्रामीण मराठीतील संभाषण त्यांना तेवढे जमत नाही. त्याचा परिणामही अभिनयावर होतो.

चांगला निर्णय

सध्याच्या ‘फटाफट’च्या काळात परिपूर्ण कलाकृती साकारण्याकडे कल अल्प आहे. एका प्रख्यात दिग्दर्शकाने सांगितले, ‘‘तरुण पिढी सामाजिक माध्यमांवर जे काही पहाते किंवा तिला एखादा अभिनय चांगला वाटला की, ‘हेच म्हणजे नाटक’, असे तिला वाटते. पिढीचा कल हा चित्रपट, ‘सिरिअल’ यांमध्ये कुणीतरी आपल्याला निवडावे, याकडे अधिक आहे. परिणामी नाटकाकडे दुर्लक्ष होते.’’ नाटकांचा दर्जा हा याच वर्षी घसरला आहे, असे नाही, तर तो गेली काही वर्षे घसरत आहे. ‘ही घसरण कुठेतरी रोखावी; मात्र विद्यार्थ्यांच्या कष्टाची नोंदही घेतली जावी’, या चांगल्या विचारांनी परीक्षकांनी विजेत्या नाटकांचे क्रमांक घोषित केले; मात्र करंडक दिला नाही. परीक्षकांनी केवळ विद्यार्थ्यांना जाणीव करून दिली असती, तर जाणिवेचा परिणाम काही दिवसच टिकला असता. विद्यार्थ्यांसमोर काहीतरी आणखी चांगले करण्याची उमेद जागृत झाली नसती ! पुरुषोत्तमसाठी अनुभवी कलाकारांकडून विद्यार्थ्यांचे वर्गही घेतले जातात, तरीही विद्यार्थी त्या दर्जाच्या कलेचा आविष्कार करू शकले नाहीत. याचाच अर्थ त्यांना आणखी कष्ट घ्यावे लागणार आहेत. दिशा ठरवावी लागणार आहे.

सध्या शाळा-महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांच्या गुणात्मकतेपेक्षा त्यांना ‘पास’ करून पुढच्या वर्गात ढकलण्याची मानसिकता आहे. काही इयत्तांना तर परीक्षाच नसून विद्यार्थ्याला थेट पुढच्या वर्गात प्रवेश मिळतो. परिणामी शिक्षणाचा दर्जाही घसरत आहे. समोर काहीतरी आव्हान, अवघड प्रश्न असले, तरच विद्यार्थी घडणार ना ? शिकणार ना ? आरक्षणामुळे तर आवश्यक ती गुणवत्ता नसलेलाही पुढे जाऊ शकतो. अशा स्थितीत चांगले नाटक नसल्याने पुरुषोत्तम करंडक नाकारून परीक्षकांनी चांगला आणि योग्य पायंडा पाडला आहे. यातून विद्यार्थी अंतर्मुख होऊन अधिक जोमाने प्रयत्न करतील, ही अपेक्षा !

चांगले नाटक नसल्याने पुरुषोत्तम करंडक नाकारून परीक्षकांनी चांगला आणि योग्य पायंडा पाडला !