गोवा : आतंकवादविरोधी पथकाकडून आणखी ६ बांगलादेशी घुसखोरांना अटक

पणजी, २२ सप्टेंबर (वार्ता.) – गोवा पोलिसांनी बांगलादेशी घुसखोरांना शोधून काढण्याची मोहीम गेल्या २ मासांपासून आरंभली आहे. गोवा पोलिसांच्या आतंकवादविरोधी पथकाने गोव्यातून आतापर्यंत एकूण २२ बांगलादेशी घुसखोरांना कह्यात घेतले आहे. पथकाने सांखळी, वाळपई, डिचोली, कोलवाळ आणि वार्का या ठिकाणी कारवाई करून बांगलादेशी घुसखोरांना कह्यात घेतले. यांपैकी ६ जणांना आज, २२ सप्टेंबरला वाळपई येथून कह्यात घेण्यात आले. या कारवाईसाठी स्थानिक पोलिसांचे साहाय्य घेण्यात आले. हे घुसखोर खोट्या आधार कार्डच्या साहाय्याने गोव्यात निरनिराळे व्यवसाय करून वास्तव्य करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. सर्व बांगलादेशी घुसखोरांचा शोध घेण्यात येणार असल्याची माहिती पणजी पोलीस मुख्यालयातून देण्यात आली.

विशेष म्हणजे नागवे, वाळपई येथे कह्यात घेण्यात आलेला बिलाल अन्वर आखोन हा बांगलादेशी नागरिक गेल्या १२ वर्षांपासून वाळपई परिसरात वास्तव्यास आहे. तो वाळपई येथे भंगार गोळा करण्याचे काम करतो.

बांगलादेशींनी घेतले भूखंड

सत्तरी येथील म्हाऊस पंचायत क्षेत्रात अनेक भूखंड बांगलादेशी घुसखोरांनी खरेदी करून तेथे अनधिकृत घरे उभी केल्याचे वृत्त आहे.

बांगलादेशी घुसखोरांना देशात आणणार्‍या दलालाचा शोध घेण्याची मागणी

बांगलादेशी घुसखोर देशात घुसल्यानंतर प्रथम बंगालमध्ये आणि नंतर देहली किंवा बेंगळुरू येथे आपले आधार कार्ड सिद्ध करतात आणि या आधार कार्डच्या आधारे ते पुढे देशभर भ्रमंती करतात. बांगलादेशी घुसखोरांना भारतात आणण्यासाठी आणि विशेषत: गोव्यात आणण्यासाठी गुंतलेल्या देशद्रोही दलालांचा शोध घेण्याची मागणी आता जोर धरत आहे. बांगलादेशी घुसखोरांना आधार कार्ड कोण बनवून देतो ? याचाही शोध घेण्याची मागणी होत आहे. (स्थानिक धर्मांधांविना (यांना ‘स्लीपर सेल’ असे म्हणतात) बांगलादेशी मुसलमान गोव्यात किंवा देशात स्थायिक होणे अशक्य असल्याने आधार कार्ड बनवण्यासमवेत त्यांचे स्थानिक कुणाशी संबंध होते, त्यांचेही अन्वेषण करणे आवश्यक ! – संपादक)


संपूर्ण गोव्यात बांगलादेशी घुसखोरांचा शोध घ्या !

डिचोली येथे हिंदुत्वनिष्ठ संघटनांची संयुक्त पत्रकार परिषदेत मागणी

पत्रकार परिषदेत सहभागी झालेले हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी

डिचोली, २२ सप्टेंबर (वार्ता.) – संपूर्ण गोव्यात बांगलादेशी घुसखोरांचा शोध घेण्यात यावा, देशभरात ‘नागरिकत्व सुधारणा कायदा’ (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकता नोंदणी (एन्.आर्.सी.) कायदा लागू करावा, गोव्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी बांगलादेशी घुसखोरांना भारताबाहेर हाकलून द्यावे, बांगलादेशी घुसखोर आढळल्यास त्यांना स्थानबद्ध करण्याऐवजी त्यांची कायद्याचे उल्लंघन केल्याने कारागृहात रवानगी करावी आणि बांगलादेशी घुसखोरांसाठी बनावट कागदपत्रे सिद्ध करणार्‍या दलालांवरही कठोर कारवाई करावी, अशी मागणी हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी डिचोली पत्रकार भवन येथे २२ सप्टेंबर या दिवशी सायंकाळी आयोजित केलेल्या एका पत्रकार परिषदेत केली.

या पत्रकार परिषदेला ‘भारत माता की जय’ संघटनेचे सर्वश्री मुकुंद कवठणकर, शैलेश जाधव, भोलानाथ गाड, घनश्याम; ‘हिंदुराष्ट्र संघटना, डिचोली’चे सुबोध मोने; ‘शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, डिचोली’चे मंदार गावडे, रोहन शिरगावकर आणि सिद्धेश सावंत; बजरंग दलाचे प्रसाद नाईक, हिंदु जनजागृती समितीचे उत्तर गोवा समन्वयक गोविंद चोडणकर, राष्ट्रप्रेमी नागरिक पप्पूराज मयेकर, शिवप्रेमी गोविंद साखळकर आदींची उपस्थिती होती.

‘पी.एफ्.आय.’ आणि संलग्न संघटना यांवर बंदी आणा

गोव्यासह देशभरात ‘पी.एफ्.आय.’ ६ डिसेंबरच्या पूर्वी हेतूत: ‘बाबरी पुन्हा उभारली जाईल’, असे फलक लावून राज्यातील धार्मिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करतात. देशविघातक आणि आतंकवादी कृत्यांत सहभागी असणार्‍या ‘पी.एफ्.आय.’ आणि संलग्न संघटना यांवर केंद्रशासनाने बंदी आणावी, अशी मागणीही या पत्रकार परिषदेत करण्यात आली.