श्री विठ्ठल मंदिरातील कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांचे तात्काळ निलंबन करावे ! – राष्ट्रीय वारकरी परिषद

श्री विठ्ठल मंदिरात भजन आणि कीर्तन करण्यास बंदी घातल्याचे प्रकरण

पंढरपूर (जिल्हा सोलापूर), २१ सप्टेंबर (वार्ता.) – येथील श्री विठ्ठल मंदिरातील भजन आणि कीर्तन यांस मज्जाव करणारे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांचे तात्काळ निलंबन करावे, अशी मागणी राष्ट्रीय वारकरी परिषदेने राज्य सरकारकडे केली आहे. या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कॅबिनेट  मंत्री सुधीर मुंनगंटीवार यांना ट्वीटद्वारे पाठवण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की, मंदिरातील अधिकारी स्वत:च्या अधिकारांचा वापर धर्मासाठी करण्याऐवजी अधर्मासाठी करत आहेत. हा मंदिर सरकारीकरणाचा दुष्परिणाम आहे. हिंदुत्वाचा विचार घेऊन स्थापन झालेल्या सध्याच्या राज्य सरकारने याकडे लक्ष देऊन वारकरी आणि समस्त हिंदू यांच्या धार्मिक भावना दुखावणार्‍यांवर कठोर कारवाई करावी. पाकिस्तानमध्ये ज्याप्रमाणे ईशनिंदेसाठी फाशीची शिक्षा आहे, त्या धर्तीवर महाराष्ट्रातही सक्षम कायदा करावा.