धुळे शहरातील श्री दक्षिणमुखी हनुमानाच्या चांदीच्या डोळ्याची चोरी

याआधीही अज्ञातांकडून दानपेटी पेटवण्याचा प्रयत्न झाला !

धुळे – शहरातील श्री दक्षिणमुखी हनुमान मंदिरातील मूर्तीच्या चांदीच्या एका डोळ्याची चोरी करण्यात आली आहे. या वेळी अज्ञातांनी मूर्तीची विटंबनाही केली. १५ सप्टेंबरच्या रात्री हा प्रकार घडला असून या प्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. चोरांना अटक करण्याची मागणी नागरिकांनी पोलिसांकडे केली आहे. यापूर्वी याच मंदिरातील दानपेटी पेटवण्याचा प्रयत्नही झाला होता. (तेव्हाच आरोपींना शोधून कठोर शिक्षा दिली असती, तर चोरीचा हा प्रकार घडलाच नसता ! – संपादक) ‘पुनःपुन्हा असे प्रकार होत असतील, तर आम्ही शांत बसणार नाही’, अशी भूमिका नागरिकांनी घेतली आहे. ‘नवरात्रोत्सव, दसरा, दिवाळी या सणांच्या पार्श्वभूमीवर पवित्र वातावरणात जर कुणी जाणून-बुजून असे कृत्य करणार असेल, तर अशा विकृतींच्या विरोधात आम्ही कायदेशीर लढाई लढण्यास सिद्ध आहोत’, असेही नागरिकांनी सांगितले. (नागरिकांना कृतीशील का व्हावे लागते ? पोलीस स्वतःहून कारवाई का करत नाहीत ? – संपादक)

संपादकीय भूमिका

  • वारंवार हिंदूंच्या मंदिरामध्ये चोर्‍या आणि तोडफोड होणे, हे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर शंका उपस्थित करते !
  • हिंदुत्वाच्या सूत्रावरून सत्तेवर आलेल्या सरकारच्या राज्यात मंदिरचोरीच्या घटना अपेक्षित नाहीत, हे लक्षात घेऊन आरोपींना शोधून त्यांच्यावर तात्काळ कारवाई होण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत, ही हिंदूंची अपेक्षा !