भुसावळ येथील नवनिर्माण गणेशोत्सव मंडळाकडून आदर्श गणेशोत्सव साजरा करण्याचा प्रयत्न !

हिंदु जनजागृती समितीच्या आदर्श गणेशोत्सव मोहिमेची फलनिष्पत्ती !

अंकुश अणि पाश धारण केलेली गणेशमूर्ती

भुसावळ – येथील भिरुड कॉलनी परिसरातील नवनिर्माण गणेशोत्सव मंडळाने या वर्षी आदर्श गणेशोत्सव साजरा करण्याचा प्रयत्न केला. श्री गणेशाच्या स्थापनेपासून ते विसर्जनापर्यंतची प्रत्येक कृती शास्त्रोक्त पद्धतीने करण्यात आली. येथे गणेशोत्सवापूर्वी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘गणेशोत्सव आदर्श पद्धतीने कसा साजरा करावा ?’, या विषयावर प्रवचन आयोजित करण्यात आले होते. त्यातील विषय ऐकून त्यानुसार कृती करण्याचा निश्चय या वर्षी करण्यात आला. (प्रवचनातील विषयातून कृतीशील होणार्‍या धर्मप्रेमींचे अभिनंदन ! – संपादक)

मंडळाने काढलेली रांगोळी

धर्माभिमान्यांनी केलेले वैशिष्ट्यपूर्ण प्रयत्न !

१. मंडळाच्या बैठकीमध्ये ‘डीजे’वर चित्रपटाची गाणी लावणार नाही’, असा सर्वांनी निर्णय घेतला.

२. धर्मशास्त्रात सांगितल्याप्रमाणे पाश-अंकुश धारण केलेली श्री गणेशाची मूर्ती स्थापन करण्यात आली.

३. प्रतीवर्षी ध्वनीक्षेपक यंत्रणेवर आरती वाजवली जायची. या वर्षी तसे न करता आरती तोंडी म्हणण्यात आली.

४. मंडळाच्या वतीने घेतल्या जाणार्‍या स्पर्धाही आदर्शरित्याच घेतल्या गेल्या. ‘सांस्कृतिक वेशभूषा (फॅन्सी ड्रेस)’ या स्पर्धेमध्ये संत आणि क्रांतीकारक यांची वेशभूषा करण्यात आली. वक्तृत्व स्पर्धेमध्ये गडदुर्ग संवर्धन, क्रांतीकारकांचे बलीदान, संत तुकाराम, संत रामदास, संत गोरा कुंभार, अष्टविनायक, तसेच व्यसनांचे दुष्परिणाम इत्यादी विषय घेण्यात आले.

५. सामूहिक भजन, श्री सत्यनारायण पूजा, तसेच नियमित आरतीपूर्वी सामूहिक अथर्वशीर्ष पठण आयोजित करण्यात आले.

विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक वेशभूषा परिधान केलेल्या धर्माभिमानी महिला

६. श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीच्या वेळी फुलांनी सजवलेल्या वाहनातून गुलालाऐवजी फुलांच्या पाकळ्या उधळण्यात आल्या. डीजेऐवजी ढोल-ताशांचा गजर करण्यात आला. मिरवणुकीत सहभागी झालेल्या प्रत्येकाने पारंपरिक वेशभूषा परिधान केली होती.

‘अशा प्रकारे गणेशोत्सव साजरा केल्याने चांगले वाटले’, असे सर्वांनी सांगितले. या सर्वच आयोजनासाठी येथील कु. भाग्यश्री भिरूड आणि श्री. भूषण महाजन यांनी पुढाकार घेतला. या वसाहतीत आता हिंदु जनजागृती समितीचा नियमित धर्मशिक्षणवर्गही चालू करण्यात आला आहे.

संपादकीय भूमिका 

हिंदु धर्मशास्त्रानुसार उत्सव साजरे करणार्‍या नवनिर्माण गणेशोत्सव मंडळाचा आदर्श सर्वच मंडळांनी घ्यावा !