सिंधुदुर्ग – जिल्ह्यात २ दिवसांपासून पडत असलेल्या पावसाचा जोर ११ सप्टेंबरला वाढून मुसळधार पडलेल्या पावसाने जिल्ह्यात पूरस्थिती अनेक ठिकाणी निर्माण झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले. सध्या भातशेती सिद्ध होण्याच्या टप्प्यात असल्याने शेतीला पावसाची आवश्यकता आहे; मात्र अती पाऊस पडून पूरस्थिती निर्माण झाली, तर भातशेतीची हानी होण्याची शक्यता आहे.
कणकवली – जानवली-वायंगवडे येथील पुलाची मोठी हानी झाली आहे. या पुलाला काही ठिकाणी तडे गेले आहेत. या पुलावरून तरंदळे, सावडाव, जानवली आणि गणपतीचीवाडी या भागांतील नागरिकांची ये-जा असते. त्यामुळे या पुलाची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी जानवली, सावडाव आणि तरंदळे येथील ग्रामस्थांनी केली आहे.
(सौजन्य : Lokshahi News)
बांदा – तेरेखोल नदीला पूर येऊन तिचे पाणी बांदा शहरातील आळवाडी भागात शिरले आहे. पावसाचा जोर कायम असल्याने शहरात पुरस्थिती उद्भवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झाले आहे. सरपंच अक्रम खान आणि तलाठी वर्षा नाडकर्णी यांनी पूरस्थितीची पहाणी करून येथील व्यापार्यांना सूचना दिल्या आहेत.
वेंगुर्ले – मुसळधार पावसामुळे येथील तालुक्यातील होडावडे पुलावर पाणी आले आहे. त्यामुळे सावंतवाडी-तळवडेमार्गे वेंगुर्ला अशी होणारी सर्व वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे पुलाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
सावंतवाडी – ओटवणे नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने बांदा-आंबोली मार्गावरील सरमळे पुलावरून पाणी वहात असल्याने या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. मुसळधार पावसामुळे ओटवणे, सरमळे आणि विलवडे या भागांतील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कुडाळ – मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, तसेच पावशी, तसेच अन्य सखल भागांतील घरांना पाण्याचा वेढा पडला आहे. कुडाळ शहरातून मुंबई-गोवा महामार्गकडे जाणारा रस्ता आणि कुडाळ रेल्वे स्थानकाकडे जाणारा रस्ता यांवर पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली होती. माणगाव खोर्यात निर्मला नदीला पूर आल्याने आंबेरी पुलावरून पाणी वहात असल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली.