अमली पदार्थ आता राज्यातील गावागावांत !

मडगाव, ११ सप्टेंबर (वार्ता.) – दक्षिण गोव्यासमवेतच राज्यातील गावागावांत अमली पदार्थ पोचले आहेत. खेड्यांमध्ये युवावर्ग अमली पदार्थांच्या आहारी जात आहे आणि अमली पदार्थ व्यवसायाविषयी तक्रार करूनही पोलीस निष्क्रीय असतात, अशा जागरूक नागरिकांच्या तक्रारी आहेत.

याविषयी कामुर्लीचे सरपंच बासिलियो फर्नांडिस म्हणाले, ‘‘अमली पदार्थ व्यवसाय गेल्या काही वर्षांपासून गावागावांत फोफावत आहे आणि ही एक गंभीर गोष्ट आहे; मात्र याविषयी सरकारला गांभीर्य असल्याचे दिसत नाही. विधानसभेत मंत्री विधान करतात की, ‘अमली पदार्थाविना पार्टी होणेच शक्य नाही’ आणि यावरून सरकारची निष्क्रीयता स्पष्ट होते. पोलिसांकडे गावातील अमली पदार्थ व्यवहाराविषयी तक्रार करूनही पोलीस या विरोधात कोणतीच कारवाई करत नाहीत, ही आश्चर्यकारक गोष्ट आहे. पोलिसांची कारवाई केवळ नावापुरती एखाद्या लहान अमली पदार्थ व्यावसायिकाला धरण्यापुरती मर्यादित असते.’’ दवर्ली येथील रहिवासी हर्कुलानो नियासो म्हणाले, ‘‘गावातील मुलांना आता अमली पदार्थाचे व्यसन लागले आहे आणि यामुळे या मुलांच्या भवितव्याविषयी चिंता वाटते.’’ अनेक नागरिकांच्या मते झटपट पैसे कमावण्याच्या नादात अमली पदार्थ व्यावसायिकांची संख्याही वाढली आहे. दूध विक्रेतेही अमली पदार्थ व्यवसायात गुंतलेले आहेत. अमली पदार्थ व्यवसायाविषयी तक्रार करणार्‍यांना लक्ष्य केले जात आहे. कुडतरीचे अपक्ष आमदार आलेक्स रेजिनाल्ड म्हणाले, ‘‘अमली पदार्थ आता गल्लीबोळामध्ये उपलब्ध आहेत आणि याविषयी मी विधानसभेत वेळोवेळी आवाज उठवला आहे; मात्र यावर काहीच कृती झालेली नाही. पोलीस खात्यात भरती होतांना पोलीस ‘मी राज्य आणि नागरिक यांचे हित पहाणार’ अशी शपथ घेतात; मात्र पुढे सेवा बजावतांना ते असे करत नाहीत. या व्यवसायात एखाद्या पोलीस अधिकार्‍याचा बळी गेल्यानंतरच या समस्येचे गांभीर्य पोलिसांच्या लक्षात येईल.’’

म्हापसा येथे गांजा आणि हशीश तेल जप्त

अमली पदार्थविरोधी पथकाने ११ सप्टेंबरला मडगाव येथे एका व्यक्तीकडून १ किलो गांजा आणि १२० मि.ली. हशीश तेल कह्यात घेतले. याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत २ लाख २० सहस्र रुपये आहे. या प्रकरणी फैयाज बाबूसाहेब नदाफ याला अटक करण्यात आली आहे.