शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांचा देहत्याग !

शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती

नवी देहली – बद्रीनाथ येथील ज्योतिष आणि द्वारका येथील शारदा या दोन पीठांचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी ११ सप्टेंबरच्या दुपारी मध्यप्रदेशातील नरसिंहपूर जिल्ह्यातील झोतेश्‍वर मंदिरात देहत्याग केला. ते ९९ वर्षांचे होते. ते गेल्या बर्‍याच काळापासून आजारी होते. अलीकडेच म्हणजेच ३ सप्टेंबरच्या दिवशी त्यांचा ९९ वा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. ब्रह्मलीन होतांना त्यांचे अनेक शिष्य आणि भक्त त्यांच्या समवेत होते. शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी राममंदिराच्या पुनर्उभारणीसाठीच्या न्यायालयीन लढ्यात पुष्कळ कार्य केले होते.

शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांचा संक्षिप्त परिचय !

शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांचा जन्म मध्यप्रदेशच्या सिवनी येथील  दिघोरी गावात उपाध्याय नावाच्या कुटुंबात झाला होता. त्यांच्या आई-वडिलांनी त्यांचे नाव ‘पोथीराम’ ठेवले. अवघ्या ९ वर्षी त्यांनी घर सोडून धर्मकार्यास वाहून घेतले. त्यांनी काशी येथे जाऊन महान संत धर्मसम्राट श्री करपात्री स्वामीजी महाराज यांच्याकडून वेदशास्त्रांचे शिक्षण घेतले. स्वातंत्र्य आंदोलनात सहभागी झाल्याने वर्ष १९४२ मध्ये म्हणजे वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी ते ‘क्रांतीकारी साधू’ या नावाने प्रसिद्धीस आले. त्यांनी वाराणसी येथे ९ मास, तर मध्यप्रदेशात ६ मासांचा कारावासही भोगला होता.
वर्ष १९५० मध्ये ज्योतिषपीठाचे ब्रह्मलीन शंकराचार्य स्वामी ब्रह्मानंद सरस्वती यांच्याकडून त्यांना ब्रह्मदंड देऊन त्यांना संन्यासाची दीक्षा देण्यात आली. तेव्हाच त्यांचे ‘स्वामी स्वरूपानंद सरस्वती’ असे नामकरण करण्यात आले. वर्ष १९८१ मध्ये ते शंकराचार्यपदी विराजमान झाले.

हिंदु धर्मासाठी धगधगणारी ब्राह्मतेजाची ज्वाळा शांत झाली ! – सनातन संस्था

मुंबई – द्वारका येथील शारदापीठ आणि बद्रीकाश्रम येथील ज्योतिष्पीठ यांचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती महाराज यांच्या देहत्यागाने हिंदु धर्मासाठी धगधगणारी ब्राह्मतेजाची ज्वाळा शांत झाली आहे, अशा भावपूर्ण शब्दांत सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी शंकराचार्य यांच्या चरणी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

सनातन संस्थेचे प्रसिद्धिपत्रक –

धर्मसम्राट करपात्रीस्वामी यांचे शिष्योत्तम बनून त्यांनी जीवनभर हिंदु धर्माचा प्रचार आणि धर्मरक्षण यांसाठी स्वत:चे जीवन समर्पित केले. आदि शंकराचार्य यांच्या परंपरेतील चार पिठांपैकी दोन पिठांचे शंकराचार्यपद त्यांनी धर्मश्रद्धेने सांभाळले. विविध हिंदु आणि आध्यात्मिक संघटना यांच्यासाठी ते आधारपुरुष होते.

वर्ष २०१५ मध्ये कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणामध्ये सनातन संस्थेवर ज्या वेळी बेजबाबदारपणाचे आरोप झाले, तेव्हा नाशिकच्या कुंभमेळ्यात स्वत: शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी प्रसिद्धीमाध्यमांसमोर सनातन संस्थेचे निर्दोषत्व सांगणारी भूमिका ठामपणे मांडली. तसेच वेळोवेळी सनातन संस्थेच्या कार्याला त्यांनी शुभाशीर्वाद देऊन आध्यात्मिक बळ प्रदान केले. भारतात सर्वश्रेष्ठ असणार्‍या शंकराचार्यपदावर आरूढ होऊन त्यांनी केलेले श्रेष्ठ कार्य इतिहास लक्षात ठेवील, असेही श्री. राजहंस यांनी म्हटले आहे.