पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व क्षेत्रीय अधिकार्‍यांनी श्री गणेशमूर्ती विसर्जनस्थळी वैयक्तिक लक्ष द्यावे ! – उल्हास जगताप, अतिरिक्त आयुक्त

प्रतिकात्मक छायाचित्र

पिंपरी (पुणे) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने नागरिक आणि प्रशासन यांच्यामध्ये सुसंवाद साधण्यासाठी ‘जनसंवाद सभे’चे आयोजन केले जाते. यामध्ये श्री गणेशमूर्ती विसर्जन घाटांवर महापालिकेने विसर्जनाच्या पुढील दिवसांसाठी अधिक मनुष्यबळासह सुविधा पुरवाव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली. त्यावर ‘सर्व क्षेत्रीय अधिकार्‍यांनी श्री गणेशमूर्ती विसर्जनस्थळी वैयक्तिक लक्ष देऊन कोणतीही कमतरता रहाणार नाही, याची दक्षता घ्यावी’, असे निर्देश अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी दिले आहेत. या सभेत शहरातील ८ क्षेत्रीय कार्यालय क्षेत्रातील केवळ ७१ नागरिकांनी सहभाग नोंदवला होता.

रस्त्याच्या कडेला असलेल्या धोकादायक वृक्षांची छाटणी करावी, रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात यावेत, पाणीपुरवठा पुरेशा दाबाने करण्यात यावा, पदपथ आणि रस्त्यांवरील अतिक्रमणे काढण्यात यावीत, अनेक ठिकाणी ड्रेनेज वाहिन्या सतत तुंबत असून त्या त्वरित दुरुस्त करण्यात याव्यात या स्वरूपाच्या अनेक सूचनावजा तक्रारी नागरिकांनी ‘जनसंवाद सभे’त मांडल्या.