इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) येथे हिंदुत्वनिष्ठ, लोकप्रतिनिधी, गणेशोत्सव मंडळे यांच्या यशस्वी लढ्यामुळे भाविकांना पंचगंगा नदीत श्री गणेशमूर्ती विसर्जनास अनुमती !

इचलकरंजी येथे पंचगंगा नदीवर श्री गणेशमूर्ती विसर्जन करतांना भाविक

इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर), ५ सप्टेंबर (वार्ता.) – श्री गणेशमूर्तींच्या विसर्जनामुळे प्रदूषण होते अशी अनाकलनीय भूमिका घेत प्रशासनाने भाविकांना पंचगंगा नदीत श्री गणेशमूर्ती विसर्जनास अनुमती देता येणार नाही, अशी भूमिका घेतली होती. या सक्तीला विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना, आमदार श्री. प्रकाश आवाडे, गणेशोत्सव मंडळे, हिंदु जनजागृती समिती यांनी ठामपणे विरोध केला. राष्ट्रप्रेमी श्री. कौशिक मराठे यांनी महापालिका प्रशासन, जिल्हा प्रशासन यांना नोटीस पाठवली. या सगळ्यांच्या एकत्रित परिणामुळे अंततः प्रशासनाला नमती भूमिका घ्यावी लागली. त्यामुळे भाविकांनी पंचगंगा नदीत श्री गणेशमूर्ती विसर्जित केल्या. (भाविकांच्या धर्मभावना जपण्यासाठी यशस्वी लढा देणार्‍या हिंदुत्वनिष्ठ, लोकप्रतिनिधी, गणेशोत्सव मंडळे आणि श्री. कौशिक मराठे यांचे अभिनंदन ! – संपादक)

इचलकरंजी येथे पंचगंगा नदीच्या काठावर विसर्जनासाठी उपस्थित डावीकडून दुसरे श्री. कौशिक मराठे, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. महाजनगुरुजी, तसेच अन्य भाविक

१. भाविकांनी नदीत मूर्ती विसर्जित न करता त्या कृत्रिम कुंडातच विसर्जित कराव्यात, यासाठी इचलकरंजी प्रशासनाने लाखो रुपये व्यय करून ४ महाप्रचंड कुंड बनवले होते. नदीच्या दिशेने जाणार्‍या रस्त्यांच्या ठिकाणी बॅरिकेट्स (अडथळे) लावण्यास प्रारंभ केला होता, तसेच ४ सप्टेंबरपासून पोलीस बंदोबस्त वाढवण्यास प्रारंभ करून भाविकांना कुंडातच विसर्जन करण्यास भाग पडेल, अशी स्थिती निर्माण केली होती.

उंचगाव ग्रामपंचायत येथील तलावाच्या काठावर विसर्जनासाठी ठेवण्यात आलेल्या श्री गणेशमूर्ती

२. ५ सप्टेंबरला मात्र चित्र पालटलेले दिसले आणि ज्या भाविकांना पंचगंगा नदीत विसर्जन करण्याची इच्छा होती त्यांना ती देण्यात आली. उंचगाव (जिल्हा कोल्हापूर) येथे ग्रामपंचायतीने पॉलिटेक्निक महाविद्यालयाच्या शेजारी असलेल्या तळ्यात श्री गणेशमूर्ती विसर्जन करण्यास चांगल्या प्रकारे व्यवस्था करून दिली होती.