मांडरे (जिल्हा कोल्हापूर) येथे गणेशोत्सवाच्या महाप्रसादाच्या वेळी गोळीबार; १२ जणांवर गुन्हा नोंद !

कोल्हापूर – करवीर तालुक्यातील मांडरे या गावी हनुमान तरुण मंडळाने गणेशोत्सवाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या महाप्रसादाच्या वेळी हातावरून पाणी सोडण्याच्या कारणावरून जोरदार हाणामारी झाली. या वेळी एका कार्यकर्त्याने गोळीबार केला. या प्रकरणी गोळीबार करणार्‍या अभिजित पाटील यांच्यासह १२ जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गोळीबार झाल्याने गावात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. (लोकमान्य टिळकांनी हिंदूंचे संघटन व्हावे, या उद्देशाने गणेशोत्सव प्रारंभ केला. याउलट मंडळातील कार्यकर्तेच जर मान-पानावरून एकमेकांमध्ये हाणामारी-गोळीबार करत असतील, तर तो उद्देशाच बाजूला पडल्यासारखे होईल. यावरून हिंदूंना धर्मशिक्षणाची किती आवश्यकता आहे ? तेच समोर येते ! – संपादक)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंडळाने २ सप्टेंबरला महाप्रसादाचे आयोजन केले होते. या वेळी तेथील प्रथेप्रमाणे महाप्रसाद वाटपाच्या वेळी अगरबत्ती लावून, पंक्तीत हातावरून पाणी सोडून प्रसादाचा प्रारंभ झाला. या वेळी पाणी सोडण्याच्या मानपानातून मंडळातील दोन गटांत हाणामारी झाली.