गोव्यात अवैध वाळू व्यवसायात वाळू माफियांचा वर्चस्ववाद शिगेला !

पणजी, ३ सप्टेंबर (वार्ता.) – राज्यात गेल्या १५ वर्षांत नवीन बांधकामांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने वाळूची मागणी वाढली आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर वाळू उत्खनन होऊ लागले आहे. यामुळे निसर्गाची हानी झाल्याने न्यायालयाने अमर्याद रेती उपशावर निर्बंध लादले आहेत. राज्यात रेती उत्खननावर बंदी आहे, तरी चोरट्या मार्गाने रात्रीच्या वेळेला उत्खनन आणि रेतीची वाहतूक केली जाते, तसेच शेजारच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातून रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात रेतीची वाहतूक गोव्यात होत असते. प्रशासन आणि पोलीस यंत्रणा यांच्या सहकार्यानेच हा प्रकार चालतो, असा जनतेचा आरोप आहे. भ्रष्टाचाराची पाळेमुळे सध्या रेती व्यवसायात खोलवर रुजल्यामुळे आता या व्यवसायात गोळीबार, मारामारी, शिवीगाळ एवढ्यापुरता हा व्यवसाय न रहाता, यापुढे या व्यवसायात टोळीयुद्ध होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पावसाळा संपल्यानंतर सरकारने अधिकृत वाळू उत्खननाला अनुज्ञप्ती द्यावी, अन्यथा परिस्थिती आणखी बिघडेल, अशा प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. बाणसाय येथे वाळू उत्खननात काही टोळ्या कार्यरत होत्या. वाळू माफियांच्या वर्चस्ववादावरून गोळीबाराची घटना घडली आहे, असे म्हटले जात आहे.

(अवैध खनिज उत्खनन करून गोव्यातील कित्येक एकर भूमी नापिक करण्यासमवेतच खोलवर उत्खनन केल्यामुळे परिसराला धोकाही निर्माण झाला आहे. आता वाळू उत्खननासाठी अनुज्ञप्ती देण्याची प्रक्रिया सुलभ करून अतिरिक्त उत्खननामुळे जलस्रोतांनाही धोका निर्माण होऊ शकतो ! – संपादक)

अवैध वाळू उत्खनन करणार्‍यावर गोळीबार करणारे संशयित मोकाट

वाळू व्यवसायातील वादातून ३१ ऑगस्ट या दिवशी रात्री झालेल्या गोळीबारानंतर सध्या कुडचडे येथे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. बाणसाय परिसरात सध्या भीतीचे वातावरण आहे. घटनेनंतर ३ दिवस उलटूनही पोलिसांना या प्रकरणातील मूळ संशयिताला कह्यात घेण्यात यश आलेले नाही.

पोलीस अधीक्षक सेमी तावारीस म्हणाले, ‘‘पोलिसांनी या घटनेवरून आतापर्यंत सुमारे २५ जणांच्या जबान्या नोंदवल्या आहेत. या प्रकरणाचे सर्व बाजूंनी अन्वेषण केले जात आहे. गोळीबारासाठी वापरण्यात आलेली बंदूक ही वन्य प्राण्यांची शिकार करण्यासाठी वापरली जाणारी बंदूक आहे.’’ बाणसाय, कुडचडे येथे ३१ ऑगस्ट या दिवशी रात्री वाळू उपसा करणार्‍या कामगारांवर बंदुकीने गोळीबार करण्यात आला होता. यामध्ये एका कामगाराचा जागीच मृत्यू झाला होता, तर अन्य एक कामगार गंभीररित्या घायाळ झाला. पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत माड, बाणसाय येथून अनधिकृत वाळू उत्खनन व्यवसायात असलेल्या ५ संशयितांना कह्यात घेतले आहे आणि या पाचही संशयितांना जामीन मिळाला आहे.