मुंबई आणि नवी मुंबईत कृत्रिम तलावापेक्षा पारंपरिक विसर्जनाला भाविकांची पसंती !

प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबई – शहरातील नैसर्गिक विसर्जन स्थळांच्या तुलनेने कृत्रिम तलावांमध्ये श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यास गणेशभक्तांकडून अल्प प्रतिसाद होता. २ सप्टेंबरला पहाटे ६ वाजेपर्यंत दीड दिवसाच्या ६० सहस्र श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. यामध्ये नैसर्गिक विसर्जन स्थळांमध्ये ३६ सहस्र, तर १६२ कृत्रिम तलावांमध्ये २४ सहस्र श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. मुंबईत एकूण ७३ नैसर्गिक विसर्जन स्थळे आहेत. पर्यावरणाचा विचार करता श्री गणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावतच करण्याचे आवाहन पालिका प्रशासनाने केले होते; परंतु भाविकांनी नैसर्गिक विसर्जन स्थळाला अधिक पसंती दिल्याचे आढळून आले.

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील २२ पारंपरिक आणि १३४ कृत्रिम विसर्जन स्थळांवर श्री गणरायाच्या ९ सहस्र ७७ मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. यांपैकी २२ पारंपरिक विसर्जन स्थळांवर ६ सहस्र ५५५ घरगुती आणि ११ सार्वजनिक अशा दीड दिवसांच्या ६ सहस्र ५६६ श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रातील २२ विसर्जन स्थळांपैकी मुख्य १४ विसर्जन तलावांमध्ये जलप्रदूषण टाळण्यासाठी ‘गॅबियन वॉल’ची (विशिष्ट विदेशी तंत्रज्ञानाने बांधलेली भिंत) रचना करण्यात आली आहे. त्याच क्षेत्रात भाविकांनी मूर्तीविसर्जन करून जलाशयातील जैवविविधतेचे संरक्षण करावे, असे आवाहन महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांनी केले होते.

शहरातील १५६ विसर्जनस्थळांवर ओल्या आणि सुक्या निर्माल्यासाठी २ स्वतंत्र निर्माल्य कलश ठेवण्यात आले होते. त्याची वाहतूक स्वतंत्र निर्माल्य वाहनाद्वारे करण्यात आली. या निर्माल्याचे पावित्र्य राखण्याची काळजी घेत त्यावर प्रक्रिया करण्यासाठी तुर्भे येथील प्रकल्पस्थळी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. तेथे हे निर्माल्य नेण्यात आले आहे, अशी माहिती महापालिकेच्या अधिकार्‍यांनी दिली. अतिशय कर्णकर्कश आवाजात ढोल ताशांच्या आणि डिजे यांच्या आवाजात अंगविक्षेप करत मिरवणुका काढण्यात आल्या होत्या.