सात्त्विक, समंजस आणि लहानपणापासून साधनेचीच ओढ असलेला पिंगुळी गुढीपूर (ता. कुडाळ) येथील कु. मकरंद तिरवीर (वय १५ वर्षे) !

भाद्रपद शुक्ल अष्टमी (४.९.२०२२) या दिवशी कु. मकरंद तिरवीर याचा १५ वा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात सेवा करणारी त्याची बहीण कु. मानसी तिरवीर हिला जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

कु. मकरंद तिरवीर

कु. मकरंद तिरवीर याला १५ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !

१. समंजस

‘मकरंद कधीही कोणत्याही गोष्टीचा हट्ट करत नाही. एखादी वस्तू त्याला हवी असेल; पण बाबांनी त्याला समजावून सांगितल्यावर तो ते सहजतेने स्वीकारतो. मकरंदची प्रगल्भता मोठ्या मुलासारखी आहे.

२. मायेची ओढ नसणे

अ. त्याला मायेतील गोष्टी आवडत नाहीत. आम्ही घरात गप्पा मारत असतांना तो म्हणतो, ‘‘तुम्ही सगळे घरचेच विषय (मायेतील) बोलता. साधनेविषयी बोला.’’

आ. त्याला ‘बाहेर मुलांच्या समवेत खेळायला जाणे, फिरणे, भ्रमणभाषवर छायाचित्रे काढणे’, अशा गोष्टी आवडत नाहीत. आता तो १५ वर्षांचा असूनही मुलांच्या समवेत कधीच बाहेर जात नाही. त्याला सुट्टी असेल, तर तो घरीच काहीतरी सेवा करतो किंवा कुडाळ सेवाकेंद्रात सेवेला जातो.

३. सात्त्विकतेची ओढ

अ. तो लहानपणापासून सात्त्विक आहे. त्याला बाहेरच्या मुलांसारखे कपडे घालायला आणि रहायला आवडत नाही. त्याचा पोषाख नेहमी सात्त्विक असतो.

कु. मानसी तिरवीर

आ. लहानपणापासूनच तो ‘टिळा लावणे, सकाळ-संध्याकाळ शुभंकरोती म्हणणे, आई-बाबांना नमस्कार करून शाळेत जाणे’, अशा गोष्टी न शिकवता करतो.

इ. त्याला साधकांशी बोलायला आणि त्यांच्यात मिळून-मिसळून रहायला आवडते. तो लगेच त्यांच्याशी जवळीक साधतो.

४. आईला घरकामात साहाय्य करणे

मी पूर्णवेळ साधना आणि सेवा करण्याचा निर्णय घेऊन रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात रहायला आले. त्यानंतर माझ्या आईला शारीरिक त्रास होत असतांना तिला माझी कधीही उणीव भासली नाही. तो आईला सर्व कामांत मुलीप्रमाणे साहाय्य करतो. घरी साहाय्य हवे; म्हणून मला मधेच कधी घरी जावे लागले नाही. मला पूर्णवेळ साधना करण्यासाठी त्याचे पुष्कळ साहाय्य होत आहे.

५. चुकांची जाणीव करून देणे

मी घरी गेल्यावर व्यष्टी साधनेचे प्रयत्न केले नाहीत किंवा उद्धटपणे बोलले, तर तो लगेच मला त्याची जाणीव करून देतो.

६. साधना करण्याची आठवण करून देणे

मी घरी गेल्यावर ‘नामजपादी उपाय केले ना ? सारणी लिखाण (टीप) केले ना ?’, असे विचारून तो माझा आढावा घेतो.

टीप : स्वतःमधील स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करण्यासाठी स्वतःकडून दिवसभरात झालेल्या चुका लिहून त्यावर योग्य दृष्टीकोनाच्या सूचना लिहिणे.

७. अडचणी आल्यावर आध्यात्मिक स्तरावरील उपाय विचारून ते करणे

मध्यंतरी घरी पुष्कळ अडचणी होत्या. तेव्हा मी त्याला सांगितले, ‘‘अडचणी लिहून त्या लिखाणाभोवती नामजपाचे मंडल घाल, घरात सतत नामजप लावून ठेव आणि सर्वांना नामजपादी उपायांची आठवण करून दे.’’ तेव्हा तो तसे प्रयत्न प्रतिदिन करायचा आणि अजूनही ‘काय करू ?’, असे मला विचारून घ्यायचा.

८. भाव

त्याच्यामध्ये गुरुदेवांप्रती (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती) पुष्कळ भाव आहे. एकदा तो रामनाथी आश्रमात आला असतांना त्याला ‘संतांचा सत्संग लाभणार आहे’, असे कळले. तेव्हा त्याची पुष्कळ भावजागृती झाली. त्यानंतर तो पुष्कळ वेळ कृतज्ञताभावात होता.’

– कु. मानसी तिरवीर (वय १९ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२.८.२०२२)