अमेरिकेसारख्या रज-तम प्रधान देशातही साधना करत असल्यामुळे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने आलेल्या अनुभूती आणि जाणवलेली सूत्रे !

मागील भागात २.९.२०२२ या दिवशी (सुश्री (कु.)) सुप्रिया टोणपे यांना साधना करत असल्यामुळे अमेरिकेसारख्या रज-तम प्रधान देशात आलेल्या अनुभूती पाहिल्या. आज या भागात त्यांना जाणवलेली सूत्रे आणि ‘जगात देवच शाश्वत आहे’, असे कळल्यामुळे त्यांनी पूर्णवेळ साधना करण्यासाठी नोकरी सोडून भारतात परत येण्याचा घेतलेला निर्णय इत्यादी भाग पहाणार आहोत.

(सुश्री (कु.)) सुप्रिया टोणपे

२. अमेरिकेत असतांना जाणवलेली अन्य सूत्रे

२ अ. कार्यालयीन कामाच्या व्यस्ततेमुळे स्वयंपाक करायला पुष्कळ वेळा उशीर होणे, तरीही ‘देवघरातील देवता ही लहान बाळे आहेत’, असा भाव ठेवून स्वयंपाक करून त्यांना नैवेद्य दाखवूनच जेवणे : ‘कार्यालयीन काम पुष्कळ असल्याने मला आणि मैत्रिणींना स्वयंपाक करण्यास वेळ मिळत नसे. तेव्हा ‘स्वयंपाक न करता पाव (‘ब्रेड’) खावा’, असे सर्वांना वाटायचे. मी प्रतिदिन देवघरातील देवांना नैवेद्य दाखवून मगच जेवत असे. मी पाव खाल्ला, तर देवघरातील परात्पर गुरु डॉ. आठवले आणि अष्टदेवता यांना नैवेद्य दाखवता येणार नाही; म्हणून मी पटपट स्वयंपाक करून ‘देवतांना घास भरवत आहे’, असा भाव ठेवून नैवेद्य दाखवत असे. तेव्हा मला पुष्कळ आनंद मिळायचा. ‘देवता म्हणजे माझी बाळे आहेत’, असे मला वाटायचे. त्यांना नैवेद्य दाखवण्यास विलंब झाल्यावर मी त्यांची क्षमाही मागायचे.

२ अ १. देवाने घेतलेली काळजी : स्वयंपाक करण्याच्या माध्यमातून देवच माझी काळजी घेत होता. तोच मला स्वयंपाक करण्यासाठी शक्ती देत होता. नेहमी घरचे पौष्टिक अन्न खाल्ल्याने मी तिकडे कधी आजारी पडले नाही. ‘मी घरापासून दूर एकटी आहे’, याची जाणीव माझ्यापेक्षा देवालाच अधिक होती. मी नेहमी ‘मोलकरीण’ या मराठी चित्रपटातील गाणे गुणगुणत असे, ‘देव जरी मज कधी भेटला । माग हवे, ते माग म्हणाला । म्हणेन प्रभु रे माझे सारे । जीवन देई मम परम पूज्यांना ।’ (शेवटी ‘बाळाला’ या शब्दाऐवजी मी ‘परम पूज्यांना’, असे म्हणत असे.)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी झालेल्या एका भेटीत मी ‘देव जरी मज कधी भेटला…’ हे गाणे म्हणून दाखवल्यावर ते मला म्हणाले, ‘‘इतरांमध्ये देवाप्रती बालकभाव असतो. तुमच्यामध्ये वात्सल्यभाव आहे.’’

२ आ. लहान मुलांवर संस्कार करण्याचे महत्त्व !

२ आ १. ‘पेईंग गेस्ट’ म्हणून रहात असलेल्या कुटुंबातील दीड वर्षाच्या मुलाला ‘कार्टून’ पहाण्याची अती ओढ असणे आणि ‘कार्टून’ पाहू न दिल्यास तो पुष्कळ दंगा करत असणे : अमेरिकेत वास्तव्याला असतांना मी एका भारतीय कुटुंबाच्या समवेत काही वर्षे ‘पेईंग गेस्ट’ (पैसे देऊन त्यांच्या घरी रहाणे) म्हणून रहात होते. तेथे आम्ही सर्व जण मिळून स्वयंपाक करत होतो. त्या कुटुंबात दीड वर्षाचा भृगु नावाचा मुलगा होता. तो भ्रमणभाष, टॅब्लेट (मोठ्या आकाराचा भ्रमणभाष) दूरदर्शन आणि भ्रमणसंगणक यांवर सतत ‘कार्टून’ पहात असे. तेव्हा त्याचे इतर कशाकडेही लक्ष जात नसे. त्याला ‘कार्टून’ पहातांना कुणी अडवले, तर तो किंचाळून घर डोक्यावर घेत असे. ‘त्याच्या समवेत खेळायला मुले नाहीत, त्यामुळे तो तेच पहाणार’, असे वाटून त्याचे आई-वडील त्याला ‘कार्टून’ पहायला अनुमती देत असत.

२ आ २. प्रतिदिन देवाला नैवेद्य दाखवणे आणि आरती करणे, यांसाठी भृगुला समवेत घेतल्यावर त्याला ते आवडू लागणे : हळूहळू मी देवांना नैवेद्य दाखवण्यासाठी आणि आरती म्हणण्यासाठी भृगूला माझ्या खोलीत नेऊ लागले. त्याला ‘ज्योत से ज्योत जगावो’ ही आरती विशेष आवडत असे. त्याला त्याची लय आवडत असे आणि तो त्याच्या बोबड्या स्वरात ती गुणगुणत असे. एकदा मी नैवेद्य दाखवायला जात असतांना तो ‘टॅब्लेट’वर त्याच्या आवडीचे ‘कार्टून’ पहात होता. तेव्हा त्याचे वडील मला म्हणाले, ‘‘तो आता त्यात एवढा गुंग झाला आहे की, तो तुमच्याकडे येणारच नाही’’; पण मी त्याला हाक मारल्यावर तो ‘कार्टून’ पहायचे सोडून माझ्याकडे धावत आला.

२ आ ३. या प्रसंगातून मुलांवर संस्कार करण्याचे महत्त्व लक्षात येणे : या प्रसंगातून ‘लहान मुलांवर संस्कार करणे किती आवश्यक आहे’, हे मला आणि त्याच्या आई-वडिलांनाही शिकायला मिळाले. त्यानंतर पुढे तो हळूहळू त्याच्या आई-वडिलांच्या समवेत मंदिरात जाऊ लागला. तेव्हा माझ्याकडून परात्पर गुरु डॉक्टर आणि माझे वडील यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त झाली. लहानपणापासून प्रत्येक गोष्टीत वडील मला ‘योग्य काय आणि अयोग्य काय ?’, हे सतत सांगत असत. तेव्हा मला ते कळायचे नाही; पण त्याचा माझ्या मनावर नकळत दृढ संस्कार होत गेला. ‘समाजातील आताच्या लहान मुलांना संस्कारी पालक मिळोत’, हीच ईश्वरचरणी आर्त प्रार्थना आहे.

२ इ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने मायेच्या जगाची विरक्ती येणे आणि ‘देवाविना शाश्वत काही नाही’, याची जाणीव झाल्यामुळे सहजतेने पूर्णवेळ साधना करण्यासाठी नोकरी सोडता येणे : परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने माझ्या आयुष्यात काही घटना अशा घडल्या की, त्यामुळे मी लवकरात लवकर पूर्णवेळ साधना करण्याचा निर्णय घेतला. परात्पर गुरु डॉक्टरांनी माझी प्रत्येक इच्छा पूर्ण केली. त्यामुळे मला मायेतील जग, पैसे आणि नोकरी यांची विरक्ती आली अन् मला पूर्णवेळ साधना करता येण्यासाठी सहजतेने नोकरी सोडता आली. जग फिरल्यावर मला ‘देवाविना शाश्वत कुणीच नाही’, याची जाणीव झाली होती. यासाठी गुरुमाऊलीच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे.

२ ई. ‘आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करणार्‍या साधकांना लवकर आणि खरी साधना कळली आहे’, असे वाटणे : आश्रमात आल्यावर मला शिकायला मिळाले की, ‘जे साधक न शिकता किंवा शिकून नोकरी न करताच पूर्णवेळ साधना करत आहेत आणि ज्यांनी मायेतील नोकरी न करता लगेच ईश्वराचीच नोकरी करणे श्रेष्ठ मानले, ते खरंच किती श्रेष्ठ आहेत ! त्यांना लवकर खरी साधना कळली. त्यांचा त्याग किती मोठा आहे ? त्यांना व्यावहारिक जीवनाची काहीच आसक्ती नव्हती किंवा ते त्यावर लवकर मात करू शकले; म्हणून त्यांना पूर्णवेळ साधना करता आली.’

३. कृतज्ञता आणि प्रार्थना

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी टप्याटप्प्याने माझ्या मनाची सिद्धता करवून घेऊन पूर्णवेळ साधना करण्यासाठी मला गोवा येथील रामनाथी आश्रमात आणले’ (असा साधिकेचा भाव आहे – संकलक), यासाठी मी त्यांच्या कोमल चरणी शरणागतभावाने अनंत कोटी कृतज्ञता व्यक्त करते. ‘माझ्या देहात प्राण असेपर्यंत आणि माझ्या शेवटच्या क्षणापर्यंत तुम्हाला अपेक्षित अशी सेवा अन् साधना तुम्हीच माझ्याकडून करवून घ्यावी’, अशी आर्त प्रार्थना आहे.’

(समाप्त)

– आपली चरणसेविका,

सुश्री (कु.) सुप्रिया गजेंद्र टोणपे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१५.१२.२०२१)


या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या/संतांच्या/सद् गुरुंच्या  वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक