मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी अपसमजातून ‘हलाल’विषयी वक्तव्य केले ! – यशवंत किल्लेदार, अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण व्यापारी सेना

मनसे ‘हलाल’च्या विरोधात लढा उभारणारच !

यशवंत किल्लेदार

मुंबई, ३१ ऑगस्ट (वार्ता.) – ‘हलाल’च्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना लढा उभारणार असून मनसे ‘नो टू हलाल’ ही मोहीम हाती घेणारच आहे.  यापूर्वी राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेच्या झालेल्या २ बैठकांना मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर उपस्थित नव्हते. त्यामुळे त्यांना या विषयाची माहिती नव्हती. त्यामुळे अपसमजातून त्यांनी मनसेच्या मोहिमेच्या विरूद्ध वक्तव्य केले आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण व्यापारी सेनेचे अध्यक्ष श्री. यशवंत किल्लेदार यांनी ३० ऑगस्ट या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीशी बोलतांना केले.

‘हलाल’च्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना लढा उभा करणार असून मनसे ‘नो टू हलाल’ ही मोहीम हाती घेणार आहे’, अशी घोषणा २७ ऑगस्ट या दिवशी श्री. यशवंत किल्लेदार यांनी पत्रकार परिषदेत केली होती; मात्र त्याच्या दुसर्‍या दिवशी मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांनी ‘नो टू हलाल’ मोहीम ही मनसेची अधिकृत भूमिका नाही’, असे सांगितल्याने नागरिकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली होती. याविषयी श्री. यशवंत किल्लेदार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी वरील विधान केले.