‘हिंदु राष्ट्र संकल्प अभियाना’चा श्रीक्षेत्र परशुरामभूमीतून शुभारंभ !

  • हिंदु जनजागृती समितीच्या द्विदशकपूर्तीच्या अभियानाची मुहूर्तमेढ !

  • समितीच्या स्थापनेची प्रथम बैठक झाल्याच्या चिपळूण येथील श्री विरेश्‍वर मंदिरात हिंदुत्वनिष्ठांनी घेतले आशीर्वाद !

दीपप्रज्वलन करतांना उजवीकडून ह.भ.प. अभय महाराज सहस्रबुद्धे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. मनोज खाडये आणि ह.भ.प. अविनाश महाराज आंब्रे

चिपळूण (जि. रत्नागिरी) – हिंदु जनजागृती समिती ही हिंदु राष्ट्र स्थापनेच्या उद्देशाने ‘धर्मशिक्षण’, ‘धर्मजागृती’, ‘धर्मरक्षण’, ‘राष्ट्ररक्षण’ आणि ‘हिंदूसंघटन’ या पंचसूत्रीनुसार गेली २० वर्षे अविरतपणे कार्यरत आहे. यंदाच्या घटस्थापनेला म्हणजे आश्‍विन शुक्ल प्रतिपदेला (२६ सप्टेंबर या दिवशी) समितीच्या स्थापनेला २० वर्षे पूर्ण होत आहेत. या द्विदशकपूर्तीनिमित्त गणेशचतुर्थी म्हणजेच ३१ ऑगस्टपासून देशभरात समितीच्या वतीने ‘हिंदु राष्ट्र संकल्प अभियान’ राबवण्यास आरंभ झाला आहे. हे अभियान ८ नोव्हेंबर २०२२ पर्यंत चालणार आहे. या अभियानाचा शुभारंभ २९ ऑगस्ट या दिवशी परशुरामभूमीतून म्हणजेच चिपळूण तालुक्यातील श्रीक्षेत्र परशुराम येथून भावपूर्ण आणि उत्साहपूर्ण वातावरणात झाला.

श्री विरेश्वर मंदिर येथे प्रार्थना करताना हिंदुत्वनिष्ठ आणि धर्मप्रेमी

१. या प्रसंगी चिपळूणचे ग्रामदैवत श्री देव जुना कालभैरव, ज्या ठिकाणी हिंदु जनजागृती समितीच्या स्थापनेची प्रथम बैठक झाली ते श्री विरेश्‍वर मंदिर आणि श्रीक्षेत्र परशुराम येथील श्री परशुराम मंदिर, तसेच रेणुकामातेचे मंदिर या ठिकाणी देवतांच्या चरणी श्रीफळ अन् पुष्पहार अर्पण करून, तसेच हे अभियान यशस्वी होण्यासाठी देवतांना प्रार्थना करून आशीर्वाद घेण्यात आले.

श्री परशुराम मंदिर येथे प्रार्थना करताना हिंदुत्वनिष्ठ आणि धर्मप्रेमी

२. त्यानंतर श्री परशुराम मंदिरात हिंदूसंघटन मेळावा घेण्यात आला. या वेळी सहभागी हिंदुत्वनिष्ठ आणि धर्मप्रेमी यांनी हिंदु राष्ट्र स्थापनेची शपथ घेतली. हिंदु राष्ट्राची स्थापना शीघ्र गतीने होण्यासाठी सामूहिक प्रार्थना करण्यात आली. हिंदु धर्म, देवता, राष्ट्रपुरुष, हिंदु राष्ट्र यांविषयी देण्यात आलेल्या जयघोषांनी मंदिर परिसर दुमदुमला. या वेळी हिंदुत्वनिष्ठांनी भगवे फेटे परिधान केले होते; तसेच सर्वांच्या वाहनांवर भगवे ध्वज लावण्यात आले होते. संपूर्ण वातावरण हे ‘धर्मसंघटन’मय झाले होते.

३. कार्यक्रमाचा प्रारंभ श्री गणेशाचा श्‍लोक म्हणून आणि शंखनादाने झाला. यानंतर ह.भ.प. अभय महाराज सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. वेदमूर्ती सुयोग पटवर्धन यांनी वेदमंत्रांचे पठण केले. त्यांचा सत्कार समितीचे श्री. संजय जोशी यांनी केला.

४. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन हिंदु जनजागृती समितीचे रत्नागिरी जिल्हा समन्वयक श्री. विनोद गादीकर यांनी केले.

५. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या स्थापनेच्या प्रक्रियेत कृतीशील असणार्‍या  हिंदुत्वनिष्ठांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची सांगता संपूर्ण वन्दे मातरम् या गीताने करण्यात आली.

या वेळी श्री देव जुना कालभैरव देवस्थानचे विश्‍वस्त श्री. पंकज कोळवणकर, विश्‍व हिंदु परिषदेचे उत्तर रत्नागिरी जिल्हामंत्री श्री. उदय चितळे आणि चिपळूण शहरप्रमुख साईनाथ कपडेकर, उद्योजक श्री. शैलेश टाकळे, राजस्थानी समाजाचे सर्वश्री हिरालाल चौधरी, हंजाराम परमार, ओकाराम गेहलोत, पारसाराम प्रजापती आदी उपस्थित होते.

श्री परशुराम मंदिर येथे हिंदु राष्ट्र स्थापनेची शपथ घेताना हिंदुत्वनिष्ठ आणि धर्मप्रेमी

‘हिंदु राष्ट्र संकल्प अभियाना’निमित्त देशभरात राबवण्यात येणार उपक्रम !

समितीच्या द्विदशकपूर्तीनिमित्त हिंदूसंघटन मेळावे, वर्धापनदिन सोहळे, हिंदु राष्ट्र जागृती व्याख्याने, चर्चासत्र आणि परिसंवाद, पत्रकार परिषदा, हिंदु राष्ट्र शपथ ग्रहण कार्यक्रम, मंदिर आणि ऐतिहासिक स्थळ स्वच्छता, फलकप्रसिद्धी आदी विविध उपक्रम राबवले जाणार आहेत.

हिंदूसंघटनाचे राष्ट्रव्यापी कार्य करणार्‍या हिंदु जनजागृती समितीच्या स्थापनेचा इतिहास !

वर्ष २००२ मध्ये ‘परिवर्तनवादी विचार मंच’ नावाच्या तथाकथित पुरो(अधो)गामी संघटनेने ‘रावणाने सीतेचे अपहरण केले नाही; तर सीता रावणासमवेत पळून गेली’, अशी हिंदूंच्या देवतांवर अश्‍लाघ्य टीका करून देवतांचे विडंबन केले होते. याचा स्थानिक धर्मप्रेमींनी वैध मार्गाने निषेध केला होता. हिंदूंच्या देवतांचे चित्रपट, नाटके, विज्ञापने, जाहीर कार्यक्रम आदी विविध माध्यमांतून सातत्याने विडंबन होत असल्याचे लक्षात घेऊन त्या विरोधात हिंदूंमध्ये जागृती आणि हिंदूंचे संघटन होण्याच्या दृष्टीने चिपळूण शहरातील श्री विरेश्‍वर मंदिरात स्थानिक धर्मप्रेमींची प्रथम बैठक झाली. त्या माध्यमातून घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर ‘हिंदु जनजागृती समिती’ची मुहुर्तमेढ रोवली गेली.

ऐतिहासिक पार्श्‍वभूमी लाभलेल्या भगवान परशुरामांच्या मंदिरातून ‘हिंदु राष्ट्र संकल्प अभियाना’चा शुभारंभ !

ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज यांनी युक्त भगवान परशुरामांनी अधर्मियांचा नाश करून धर्मसंस्थापना केली. परकीय आक्रमकांचा बिमोड करत हिंदूंचे स्वतंत्र राज्य म्हणजेच ‘हिंदवी स्वराज्य’ स्थापन करणार्‍या छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकापूर्वी वर्ष १६६१ मध्ये भगवान श्री परशुरामांची महापूजा केली होती. ‘देव मस्तकी धरावा । अवघाची हलकल्लोळ करावा । मुलूख बडवावा कि बुडवावा । धर्मसंस्थापनेसाठी ॥’ असा उपदेश करणारे छत्रपती शिवरायांचे गुरु समर्थ रामदासस्वामी यांनी याच श्री परशुराम मंदिरासमोर दक्षिणाभिमुख हनुमंताचे मंदिर बांधले होते. अशा प्रकारे धर्मसंस्थापनेचे प्रेरणास्त्रोत आणि ऐतिहासिक पार्श्‍वभूमी लाभलेल्या भगवान परशुरामांच्या मंदिरामध्ये समितीच्या द्विदशकपूर्तीनिमित्त संपूर्ण देशभरात राबवल्या जाणार्‍या ‘हिंदु राष्ट्र संकल्प अभियाना’चा हिंदूसंघटन मेळाव्याच्या माध्यमातून शुभारंभ होणे, हा शुभसंकेतच म्हणावा लागेल !

हिंदु जनजागृती समितीच्या स्थापनेच्या प्रक्रियेत कृतीशील असणार्‍या हिंदुत्वनिष्ठांचा सत्कार

ग्रामदैवत श्री काळभैरव सांस्कृतिक मंचचे अध्यक्ष श्री. विश्‍वास चितळे यांचा सत्कार समितीचे श्री. विश्‍वनाथ पवार यांनी केला. उद्योजक श्री. अमोल जोगळेकर यांचा सत्कार समितीचे श्री. संतोष घोरपडे यांनी केला. ह.भ.प. प्रकाश महाराज जाधव यांचा सत्कार समितीचे श्री. विलास भुवड यांनी केला.

हिंदूंच्या देवतांचे विडंबन रोखण्यासाठी हिंदूंना प्रतिकारक्षम बनवण्याचे श्रेय हिंदु जनजागृती समितीला ! – ह.भ.प. अभय महाराज सहस्त्रबुद्धे, विश्‍वस्त, संस्थान श्री भार्गवराम परशुराम देवस्थान, श्रीक्षेत्र परशुराम

ह.भ.प. अभय महाराज सहस्त्रबुद्धे

या प्रसंगी संस्थान श्री भार्गवराम परशुराम देवस्थानचे विश्‍वस्त आणि महाराष्ट्र वारकरी महामंडळाचे जिल्हा कार्याध्यक्ष ह.भ.प. अभय महाराज सहस्त्रबुद्धे म्हणाले की, हिंदूंच्या देवतांबद्दल कुणी वेडेवाकडे बोलायला लागले; तर हिंदु ते रोखण्याचा प्रयत्न करतो. याचे सर्व श्रेय हिंदु जनजागृती समितीला जाते. समितीचे कार्य हा हिंदूंच्या अस्मितेचा भाग आहे; म्हणून आम्ही वारकरी संप्रदायाचे लोक समितीच्या पाठीशी डोंगरासारखे उभे आहोत.

हिंदु राष्ट्राच्या मागणीचा हक्क बजावण्यासाठी सर्व हिंदु संघटनांनी एकत्र येणे आवश्यक ! – ह.भ.प. अविनाश महाराज आंब्रे, प्रवचनकार, वारकरी संप्रदाय

ह.भ.प. अविनाश महाराज आंब्रे

चिरणी (ता. खेड) येथील मराठा ऐक्य परिवर्तन संस्थेचे सचिव आणि वारकरी संप्रदायाचे प्रवचनकार ह.भ.प. अविनाश महाराज आंबे्र म्हणाले की, येत्या काही काळात भारत ‘हिंदु राष्ट्र’ म्हणून उदयास येणार आहे, अशी निश्‍चिती श्री परशुरामांच्या पवित्र भूमीतील आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनुभवयाला मिळत आहे. आज देशात हिंदू बहुसंख्येने असूनही धर्मनिरपेक्षतावाद हिंदु धर्माच्या आड येत आहे. ही अडचण दूर करण्यासाठी हिंदु राष्ट्राची मागणी करण्याचा हक्क आपण बजावला पाहिजे. यासाठी सर्व हिंदु संघटनांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. हिंदु राष्ट्राचा पाईक बनून खारीचा वाटा हिंदूंनी उचलायला हवा.

अल्पावधीत देशभरात समितीचे कार्य पोचवण्यासाठी सहभाग घेतलेल्या प्रत्येकाप्रती आम्ही कृतज्ञ ! – श्री. मनोज खाडये, पश्‍चिम महाराष्ट्र, कोकण, गोवा आणि गुजरात राज्य समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीचे श्री. मनोज खाडये

भगवान परशुरामांच्या पवित्रभूमीमध्ये हिंदु जनजागृती समितीची स्थापना अत्यंत संघर्षमय स्थितीत झाली. हिंदूंच्या या देशात हिंदूंच्या देवतांच्या विडंबनाच्या संदर्भात बहुतांश हिंदूंमध्ये असंवेदनशीलता होती. काही हिंदूंमध्ये संवेदनशीलता असली, तरी हतबलताही होती; मात्र समितीच्या कार्याला आरंभ झाल्यानंतर देवतांच्या विडंबनाच्या संदर्भात एक मोठी चळवळ उभी राहिली. ही चळवळ आज सर्वसामान्यांना या कार्यात सहभागी होण्यासाठी प्रेरणादायी ठरली आहे. सर्वांचे सहकार्य, संत-महंतांचे आशीर्वाद आणि हिंदुत्वनिष्ठांचा सक्रीय सहभाग यांमुळे चिपळूण येथे रोवलेले हे बीज देशभरात कानाकोपर्‍यात पोचले अन् या कार्याला कल्पनेपलीकडील यश मिळाले. समितीच्या या यशामध्ये अनेक व्यक्ती, हिंदुत्वनिष्ठ, हिंदुत्वनिष्ठ संघटना, वारकरी संप्रदाय यांसह अनेक संप्रदाय यांचा सहभाग आहे. त्या प्रत्येकाप्रती आम्ही कृतज्ञ आहोत, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे पश्‍चिम महाराष्ट्र, कोकण, गोवा आणि गुजरात राज्य यांचे समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी केले.

या वेळी सोनगाव येथील ह.भ.प. नारायण महाराज पवार, माजी उपसरपंच श्री. महेंद्र घोरपडे, धामणंद येथील ह.भ.प. प्रमोद महाराज सकपाळ आणि माजी सरपंच जयराम उतेकर, खेड पंचायत समितीचे माजी उपसभापती यशवंत पालांडे, भाजपचे खेड तालुकाध्यक्ष किशोर आंब्रे, पेठमाप येथील श्री महाकाली देवस्थानचे सल्लागार श्री. मोहन तांबट, भाजपचे उत्तर रत्नागिरी जिल्हा संघटन सरचिटणीस नागेश धाडवे, पेढांबे येथील श्री हनुमान मंदिराचे सहखजिनदार श्री. रामचंद्र शिंदे, अडरे येथील श्री. सुधीर कदम, मोरवंडे येथील श्री. सुधाकर घेवडेकर आदी उपस्थित होते. तसेच श्रीक्षेत्र परशुराम येथील धर्मप्रेमी श्री. एकनाथ सहस्रबुद्धे, माजी सैनिक सुरेश धाडवे, शिवगर्जना सेवा मंडळाचे श्री. जयदीप जोशी हेही उपस्थित होते.

कार्यक्रमाचे मान्यवर वक्ते ह.भ.प. अविनाश महाराज आंब्रे यांचा सत्कार समितीचे श्री. संतोष घोरपडे यांनी केला; तर ह.भ.प. अभय महाराज सहस्त्रबुद्धे यांचा सत्कार समितीचे श्री. सुरेश शिंदे यांनी केला. श्री. मनोज खाडये यांचा सत्कार खेड तालुका वारकरी संघटनेचे अध्यक्ष ह.भ.प. प्रकाश महाराज जाधव यांनी केला.

अभिप्राय

  • श्री. आल्हाद दांडेकर, अध्यक्ष, श्री महाकाली देवस्थान, पेठमाप – हिंदु राष्ट्र कार्यासाठी माझे जीवन सार्थकी लागावे, ही प्रार्थना !
  • ह.भ.प. प्रकाश महाराज जाधव, अध्यक्ष, खेड तालुका वारकरी संघटना – हिंदु राष्ट्र येईल, याची निश्‍चिती वाटते. हे संघटन असेच अभेद्य होत राहील.
  • श्री. यशवंत पालांडे, माजी उपसभापती, खेड तालुका पंचायत समिती – हिंदु राष्ट्र निर्मितीसाठी संघर्ष करत राहू.
  • श्री. प्रथमेश सकपाळ, दादर, ता. चिपळूण – समितीच्या धर्मरक्षणाच्या कार्यात सहभागी होईन.
  • श्री. सूरज पवार, दादर, ता. चिपळूण – अशा हिंदूसंघटन मेळाव्यांमधून हिंदुजागृती आणि हिंदूऐक्य सहजतेने होईल. हिंदु राष्ट्राच्या या कार्यासाठी मी माझे १०० टक्के योगदान देण्याचा प्रयत्न करीन.