‘कॉन्व्हेंट शाळांमध्ये हिंदु विद्यार्थ्यांना बायबल शिकण्याची सक्ती केली जाते का ?’, याचे अन्वेषण करून त्याचा अहवाल सादर करा !

  • हिंदु जनजागृती समितीने दिलेल्या निवेदनाचा परिणाम !

  • शिक्षण उपसंचालक कोल्हापूर यांचे विविध जिल्ह्यांच्या शिक्षणाधिकार्‍यांना पत्र

प्रतीकात्मक छायाचित्र

कोल्हापूर – देशभरातील ‘कॉन्व्हेंट शाळांमध्ये हिंदु विद्यार्थ्यांना बायबल शिकण्याची सक्ती करण्यावर प्रतिबंध आणा, तसेच भारतीय राज्यघटनेतील कलम २९ आणि ३० यांत सुधारणा करावी, यांसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कोल्हापूर येथील शिक्षण उपसंचालक यांना निवेदन दिले होते. त्याची नोंद घेत उपसंचालकांनी सांगली, कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथील प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना ‘हिंदु जनजागृती समितीने दिलेल्या निवदेनानुसार ‘कॉन्व्हेंट शाळांमध्ये हिंदु विद्यार्थ्यांना बायबल शिकण्याची सक्ती केली जाते का ?’, याचे अन्वेषण करावे. तसे काही निदर्शनास आल्यास त्याविषयी नियमानुसार आवश्यक ती कार्यवाही करून त्याविषयीचा अहवाल या कार्यालयास सादर करावा’, असे लेखी पत्र पाठवले आहे. या पत्रासमवेत हिंदु जनजागृती समितीने दिलेल्या निवेदनाची एक प्रत जोडण्यात आली आहे. याची एक प्रत हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे यांना पाठवण्यात आली आहे.

भारतीय राज्यघटनेच्या कलम २९ आणि ३० यांचा अपवापर करून ख्रिस्ती शिक्षण संस्था हिंदु विद्यार्थ्यांवर बायबल शिकण्याची सक्ती करत आहेत, तसेच विद्यार्थ्यांना टिळा लावू न देणे, मुलींना कुंकू, टिकली लावू न देणे, हातावर मेहेंदी काढू न देणे, देवतांची पदके घालण्यावर निर्बंध लादणे, पारंपरिक वेशभूषा करण्यावर बंधने आणणे, हेतूतः हिंदूंच्या धार्मिक उत्सवांच्या काळात शाळांच्या परीक्षा ठेवणे या तसेच इतर अन्य तक्रारींविषयी या कार्यालयास कळवण्यात आलेले आहे, असेही त्या पत्रात नमूद करण्यात आले आहे. या संदर्भात कोल्हापूर येथे समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक येथे आंदोलन करून शिक्षण उपसंचालकांना निवेदन दिले होते.