श्री गणेशमूर्ती विसर्जनाच्या अशास्त्रीय संकल्पना राबवून होणारी श्री गणेशमूर्तींची विटंबना थांबवा !

हिंदु जनजागृती समितीचे प्रशासनाला निवेदन

उपजिल्हाधिकारी डॉ. जयकृष्ण फड यांना निवेदन देतांना डावीकडून कु. प्रिया मिसाळ, कु. वैष्णवी, सर्वश्री  गजानन मुंज, सुरेश दाभोळकर आणि विजय मिसाळ

सिंधुदुर्ग – जल आणि पर्यावरण रक्षणाच्या नावाखाली श्री गणेश मूर्तीदान, कृत्रिम तलावात विसर्जन, कागदी लगद्यापासून श्री गणेशमूर्ती बनवणे आदी अशास्त्रीय संकल्पना राबवून केली जाणारी श्री गणेशमूर्तींची विटंबना थांबवा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २९ ऑगस्ट या दिवशी उपजिल्हाधिकारी डॉ. जयकृष्ण फड यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

या वेळी हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री विजय मिसाळ, सुरेश दाभोळकर, गजानन मुंज, कु. वैष्णवी  आणि कु. प्रिया मिसाळ हे उपस्थित होते.

‘ग्लोबल वॉर्मिंग’सारख्या जागतिक संकटांचा सामना आज जगाला करावा लागत आहे. त्यामुळे मानवाला चांगले आरोग्य लाभण्यासाठी पर्यावरणाचे रक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे. याविषयी शासन आणि प्रशासन यांच्याकडून अपेक्षित कृती होताना दिसत नाही. यावर ठोस उपाययोजना न करता केवळ वर्षांतून एकदा येणार्‍या गणेशोत्सवाच्या निमित्ताने ‘मूर्तीदान’ आणि ‘कृत्रिम हौदात मूर्तींचे विसर्जन’, अशा मोहिमा राबवल्या जात आहे.

संपूर्ण वर्षभर नद्या, तलाव आदी जलस्रोतांत लाखो लिटर सांडपाणी कुठलीही प्रक्रिया न करता सोडले जात आहे. घनकचर्‍याची विल्हेवाट न लावल्याच्या प्रकरणी दोषी असणार्‍या १९ नगरपरिषदांवर खटला नोंद करण्याची शिफारस लोकसेवा समितीच्या अहवालात केली आहे. यापूर्वी ६४८ लोकांचा जलजन्य आजारामुळे मृत्यू झाल्याची नोंदही या अहवालात आहे. अशाप्रकारे वर्षभर चालणार्‍या भीषण प्रदूषणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणारे विविध पालिका प्रशासन, तसेच तथाकथित पर्यावरणवादी वर्षातून एकदाच होणार्‍या गणेशोत्सवामुळे मात्र प्रदूषण होते, अशी भूमिका घेतात. गणेशमूर्तीच्या वाहत्या पाण्यातील परंपरागत विसर्जनाला विरोध करतात. कृत्रिम हौदात मूर्ती विर्सजन करण्यास भाग पाडून नंतर त्या मूर्ती पुन्हा नदी, समुद्र, तलाव आदी ठिकाणी टाकल्या जातात. यातून कृत्रिम हौदांसाठी खर्च केलेले सर्व पैसे आणि श्रम पूर्णपणे वाया गेल्यासारखे आहेत. यातून पर्यावरण रक्षण करण्याचा केवळ देखावाच करायचा आहे ? कि खरेच पर्यावरणाचे रक्षण व्हावे, अशी शासनाची भूमिका आहे ?, याविषयी शंका येते. अनेक ठिकाणी गणेशभक्तांकडून घेतलेल्या मूर्ती पावित्र्य जपून विसर्जन करणे अपेक्षित असतांना तसे होताना दिसत नाही. बुलडोझरने मूर्ती चिरडणे, प्राणप्रतिष्ठा केलेल्या मूर्ती विसर्जन न करता थेट विक्री करणे, कचर्‍याच्या गाड्यांमधून मूर्ती नेणे हे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारे आहे.

त्यामुळे धार्मिक प्रथा-परंपरेनुसार नैसर्गिक जलस्रोतात मूर्तीविसर्जन करण्यास आडकाठी आणू नये. प्रशासनाने प्रदूषणकारी कागदी लगद्याच्या मूर्तींची निर्मिती, विक्री आणि विसर्जन यांवर बंदी आणावी, अशी मागणी या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.