चीनचे विधान राजनैतिक शिष्टाचाराचे उल्लंघन !

  • हेरगिरी करणार्‍या चीनच्या नौकेला श्रीलंकेने त्याच्या बंदरात येण्याची अनुमती दिल्याचे प्रकरण

  • श्रीलंकेची बाजू घेऊन भारतावर टीका करणार्‍या चीनला भारताने सुनावले !

नवी देहली – भारताने विरोध केल्यानंतरही श्रीलंकेने हेरगिरी करणार्‍या चीनच्या नौकेला त्याच्या हंबनटोटा बंदरात येण्याची अनुमती दिली होती. एक आठवडा ही नौका या बंदरात राहिल्यानंतर आता ती मार्गस्थ झाली आहे. यासंदर्भात भारताने श्रीलंकेचा निषेध केला होता. यावरून चीनचे श्रीलंकेतील राजदूत की झेनहोंग यांनी भारतावर टीका केली होती. ‘श्रीलंकेचे राष्ट्रीय सार्वभौमत्व, स्वातंत्र्य आणि प्रादेशिक अखंडता यांचे उल्लंघन खपवून घेतले जाणार नाही. भारत श्रीलंकेच्या अंतर्गत गोष्टींमध्ये हस्तक्षेप करत आहे’, असा आरोप त्यांनी भारताने नाव न घेता केला होता. (श्रीलंकेच्या संदर्भात चीन उघडपणे भारताला अशा शब्दांत सुनावतो, हे भारताच्या परराष्ट्रनीतीचे अपयश आहे. चीनला जशास तसे उत्तर देण्याची आवश्यकता आहे ! – संपादक)

त्यावर आता भारताने चीनला प्रत्युत्तर दिले आहे. कोलंबोमधील भारतीय उच्चायुक्तांनी ट्वीट करून म्हटले, ‘श्रीलंकेला अनावश्यक दबावाची नव्हे, तर पाठिंब्याची आवश्यकता आहे. चीनच्या राजदूताचे विधान राजनैतिक शिष्टाचाराचे उल्लंघन आहे. श्रीलंकेच्या उत्तरेकडील शेजारी (भारत) देशाविषयीचा त्यांचा दृष्टीकोन हा त्यांच्या स्वतःच्या देशाच्या वागणुकीचे प्रतिबिंद असू शकतो.’ (अशा मुळमुळीत उत्तराचा चीनवर काहीही परिणाम होणार नाही ! – संपादक)