विशाळगड येथील भगवंतेश्वर मंदिरामध्ये हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने महाअभिषेक आणि आरती
मलकापूर (जिल्हा कोल्हापूर), २३ ऑगस्ट (वार्ता.) – विशाळगड पुरातत्व विभागाच्या कह्यात असतांनाही अतिक्रमणे वाढत आहेत, गडावरील भूमी विकण्याची विज्ञापने प्रसिद्ध होत आहेत. सध्या गडावर ८०० हून अधिक खोल्यांची निर्मिती कशी झाली ? त्यामुळे या सर्वांचे अन्वेषण झाले पाहिजे. विशाळगडावर जी अनधिकृत बांधकामे झाली आहेत, ती प्रशासनाने त्वरित हटवावीत; अन्यथा पश्चिम महाराष्ट्रातील सर्व शिवभक्त संघटना रस्त्यावर उतरतील, अशी चेतावणी हिंदु एकता आंदोलनाचे सातारा जिल्हाध्यक्ष श्री. विक्रम पावसकर यांनी दिली. विशाळगड येथील भगवंतेश्वर मंदिरामध्ये हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने महाअभिषेक आणि आरती करण्यात आली. त्या वेळी ते बोलत होते.
या प्रसंगी हिंदु धर्मावर आलेली विविध संकटे दूर व्हावीत यासाठी भगवंतेश्वराच्या चरणी साकडे घालण्यात आले. श्री. पावसकर पुढे म्हणाले, ‘‘आज विशाळगडावर सर्वत्र कोंबड्यांची पिसे, तसेच रिकाम्या बाटल्या कार्यकत्यांना स्वच्छ कराव्या लागतात. हे थांबले पाहिजे. गडावरील खोल्यांतून केले जाणारे अमली पदार्थाचे सेवन थांबवले पाहिजे.’’ या प्रसंगी पू. देवळेकर महाराज म्हणाले, ‘‘देव या मंदिरातून सर्वांना ऊर्जा देणार आहे. देव, देश आणि धर्म यांसाठी सर्वांनी एकत्र यावे.’’
क्षणचित्रे
१. या वेळी गडावर १०० पेक्षा अधिक पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. हिंदुत्वनिष्ठ गडावरून खाली येईपर्यंत अन्य कुणालाही विशाळगडावर सोडण्यात आले नाही.
२. पोलिसांनी हिंदुत्वनिष्ठांवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर केला होता.
३. विशाळगडावरील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती.
विशेष१. या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे श्री. बाबासाहेब भोपळे यांनी ‘विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समिती’ करत असलेल्या कार्याविषयी माहिती दिली. २. हिंदु जनजागृती समितीचे श्री. बाबासाहेब भोपळे आणि श्री. प्रसाद कुलकर्णी यांच्या हस्ते भगवंतेश्वराला अभिषेक करण्यात आला. या प्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. चेतन गुजर यांनी संकल्प सांगितला, तसेच पौरोहित्य श्री. हर्डीकर यांनी केले. |
उपस्थित मान्यवर
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. महेश विभूते, श्री. रूपेश वारंगे, श्री. उत्तम शिंगट्ये, सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे वंशज श्री. राजेंद्र मोहिते, जिवाजी सरकले यांचे वंशज श्री. योगीराज सरकले, बजरंग दल कोल्हापूर उपशहरप्रमुख श्री. अक्षय ओतारी, हिंदु एकताचे सातारा जिल्हा कार्याध्यक्ष श्री. राहुल जाधव, जिल्हा उपाध्यक्ष श्री. सतीश मुळे, पाटण तालुकाध्यक्ष श्री. गणेश पाटील, कराड-मलकापूरचे शहराध्यक्ष श्री. हिंदुराव पिसाळ यांसह २०० हून अधिक हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.